दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन जायबंदी असल्याने भारताविरुद्धच्या त्याच्या समावेशाबद्दल साशंकता होती, तेव्हा भारतीय चाहते सुखावले होते, पण त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आहे. स्टेन खणखणीत बरा झाला असून भारताविरुद्धच्या सामन्यासाठी त्याने जोरदार सराव केला. त्यामुळे भारतीय संघापुढे स्टेन नामक मोठी समस्या असेल.
स्टेनला सर्दी आणि श्वसनाबाबत समस्या जाणवत होती, पण शुक्रवारी तो पूर्ण तयारीनिशी सरावासाठी मैदानात उतरला होता. अध्र्या तासापेक्षा त्याने क्विंटन डी कॉक, हशिम अमला आणि डेव्हिड मिलर यांना गोलंदाजी केली. गोलंदाजीमध्ये त्याने विविध गोष्टींचे प्रयोग करून पाहिले. स्टेनने या वेळी उसळी घेणाऱ्या चेंडूंबरोबरच संथ चेंडू टाकण्यावर भर दिला. सरावादरम्यान डी कॉक स्टेनच्या चेंडूवर चकित झाला.
दुसरीकडे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यामध्ये दमदार खेळी साकारणाऱ्या फलंदाज डेव्हिड मिलरने नवी क्लृप्ती लढवत सराव केला. मिलरने या वेळी बॅटच्या मदतीने सराव करणे टाळले, तर त्याने एक स्टम्प घेत फलंदाजी करण्याला प्राधान्य दिला.