विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात वाद घालणारा पाकिस्तानी वेगवान गोलंदाज वहाब रियाझ व ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दंड ठोठावला आहे. रियाझच्या सामन्याच्या मानधनाच्या ५० टक्के तर वॉटसनच्या १५ टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यात येणार आहे. मैदानावर अर्वाच्य भाषेचा वापर केल्याप्रकरणी रियाझवर ठपका ठेवण्यात आला, तर खेळभावनेचा अनादर केल्याप्रकरणी वॉटसनवर कारवाई करण्यात आली.