07 March 2021

News Flash

हॉलीवूड लेन

माझ्या आईनं.. बीजीनं हट्ट धरला म्हणून आम्ही मुंबई सोडली नाही

पृथ्वीराज कपूर आणि कुटुंब

माझ्या आईनं.. बीजीनं हट्ट धरला म्हणून आम्ही मुंबई सोडली नाही; आणि आम्ही मुंबईकर झालो. देशाच्या फाळणीनंतर तर आम्हाला आमचं गावच उरलं नाही. पापाजी आधीच मुंबईत आले होते. मार्च १९४७ मध्ये एकूण परिस्थिती पाहून त्यांच्या इतर भावंडांनीही (आजच्या) भारतात स्थलांतर केलं. रावळपिंडीत जे काही होतं ते सारं सोडून ते इथे आले. मागे काहीच उरलं नाही. उरल्या त्या मनातल्या साठवणीतील आठवणी!

आमचं ‘प्रीतम’ सुरू झालं तेव्हाची मुंबई काही वेगळीच होती. आज जे मुंबईत पहिल्यांदा येतात त्यांना एक अफाट गर्दीचं महानगर दृष्टीस पडतं. रोंरावणारी वाहनं आणि हॉर्नचे कर्णकर्कश्श आवाज, प्रचंड गलका आणि गर्दीचं हरवलेपण! त्यांनी जर त्यावेळची मुंबई पाहिली असती तर त्यांना ती निर्जनच वाटली असती. पण मी पहिल्यांदा मुंबई पाहिली तेव्हाही मला हे शहर गर्दीचंच वाटलं होतं. त्यामुळे मी काहीसा गांगरून गेलो होतो. (आता ते आठवलं की हसू येतं.) मुंबईची लोकसंख्या तेव्हा सोळा लाखांच्या आसपास होती. आमचं रावळपिंडी हे मोठं शहर असलं तरी त्याच्यापुढे मुंबई महासागरच होती. पण ही मुंबई खूप सुंदर होती! प्रशस्त रस्ते होते. सुंदर बागांमध्ये फुलं आणि झाडं होती. नारळी-पोफळीच्या वाडय़ा होत्या. त्याकाळी मुंबईतले काळे कुळकुळीत डांबरी रस्ते भल्या पहाटे झाडले जायचे. नंतर पाण्याच्या टँकरच्या मागच्या बाजूला झारीसारखे पाइप असत, त्यांनी हे रस्ते रोज धुतले जायचे. सुस्नात सुंदरीसारखी मुंबई सकाळी सकाळी दिसायची. देखणी.. प्रेमात पडावं अशी!

‘त्या’ मुंबईतही धावपळ असायची; पण ती आजच्यासारखी जीवघेणी नव्हती. तिलाही जगायचं होतं; पण ती जगण्याचा आनंद लुटत होती. तिची आतासारखी कुतरओढ होत नव्हती. कुलाब्यापासून किंग्ज सर्कलपर्यंतच्या रस्त्यावरून ट्राम जायची. एक-दोन आण्यांत मुंबईकरांचा त्यातून प्रवास व्हायचा. घोडागाडय़ा होत्या. बग्ग्या होत्या. बैलगाडय़ाही होत्या. त्याकाळी मुंबईतल्या टॅक्सी या आजच्यासारख्या चिमुकल्या नव्हत्या. मोठय़ा फोर्ड, डॉज, डिसोटो, शेवरलेट कंपनीच्याही टॅक्सी तेव्हा असायच्या. मोटारबसेस होत्या. लोक सार्वजनिक वाहनांचाच जास्तीत जास्त वापर करीत. लोकांकडे स्वत:च्या मालकीच्या गाडय़ा फारशा नव्हत्या. ज्याच्याकडे गाडी असे तो श्रीमंत मानला जायचा. आमच्या ‘प्रीतम’मधून पाहिलं तरी किंग्ज सर्कलहून येणारी पापाजींची कार दिसत असे. पाच मिनिटांच्या आत ते किंग्ज सर्कलजवळील घरातून निघून दादरला पोचत. टेलिफोन ही चंगळ वाटायची- अशी ती मुंबई! त्यावेळी मुंबईत थंडीही कडाक्याची पडायची! आता डिसेंबर-जानेवारीतही अंगात स्वेटर घालावासा वाटत नाही.

‘प्रीतम’चं हळूहळू नाव व्हायला लागलं. सर्वात उत्तम प्रसिद्धी म्हणजे तोंडी प्रसिद्धी! दादर भागात त्या काळात अनेक चित्रपट स्टुडिओ होते. चित्रपटसृष्टीत मोठय़ा प्रमाणावर पंजाबी मंडळी होती. त्यांचं प्रीतममध्ये येणं-जाणं सुरू झालं. हॉटेल सुरू होऊन दहा-पंधरा दिवस झाले होते. एक दिवस हॉटेलसमोर एक छोटीशी ओपल कार येऊन उभी राहिली.  कारच्या ड्रायव्हिंग सीटवरून एक अत्यंत देखणा, ग्रीक योद्धय़ासारखी दणकट देहयष्टी असलेला, उंचापुरा माणूस उतरला आणि पापाजींसमोर उभा राहिला.

त्यानं खर्जात विचारलं, ‘‘की ए होटल तुसी शुरु कीऽता है?’’

पापाजी म्हणाले, ‘‘हांजी.’’

ते म्हणाले, ‘‘मैं पृथ्वीराज कपूर, एथौ लंग रेहासी. इस होटल दी मशहुरी सुणके आया हां. की तुहांनु कोई दिक्कत है? मैं तुहाडे वास्ते एथे हां.’’

पापाजी म्हणाले, ‘‘वेलकम जी. तुम्ही आलात आणि आम्ही धन्य झालो.’’

इथूनच पापाजींची आणि पृथ्वीराजजींची दोस्ती सुरू झाली. पृथ्वीराजजींनी माझ्या पापाजींना ते जिथं राहत तिथं जवळच राहायला यायला सांगितलं. मग आम्ही खालसा कॉलेजजवळच्या त्या फिल्मी गल्लीत राहायला गेलो.

पृथ्वीराजजी इंडस्ट्रीत ‘पापाजी’ म्हणूनच ओळखले जायचे. त्यावेळी राज कपूरचा स्टार म्हणून उदय व्हायचा होता. शम्मी माझ्या वयाचा होता. आमच्या दोघांची गट्टी जमली. शशी तेव्हा खूपच लहान होता.

पृथ्वीराजजी माटुंग्याला खालसा कॉलेज रोडवरच्या एका इमारतीतल्या पहिल्या मजल्यावर पाच बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये राहायचे. त्यांच्यामुळे त्या भागात बरीच फिल्मी कुटुंबं वास्तव्याला आली. त्या गल्लीत महान गायक कुंदनलाल आणि महेंदर सैगल, जगदीश आणि सुदर्शन सेठी, चमन आणि मदन पुरी (अमरीश पुरीचा उदय व्हायचा होता!), मनमोहन कृष्ण, जे. के. नंदा, अनिल आणि आशालता विश्वास, के. एन. सिंग, जयंत (अमजद खानचे वडील), फणी मजुमदार, अरोरा, सितारादेवी अशी मंडळी राहत होती. त्या साऱ्यांचं मिळून एक कुटुंबच बनलं होतं. त्या गल्लीला पुढे ‘हॉलीवूड लेन’ असंच नाव पडलं. फाळणीनंतर तर त्यात मोठीच भर पडली. या सर्वाशी आमचं घट्ट नातं जुळलं. त्यातही कपूर कुटुंबाशी खासच! पापाजी आणि पृथ्वीराजजी, आमची बीजी आणि रमाचाचीजी (पृथ्वीराजजींची पत्नी), मी आणि शम्मी यांची खास दोस्ती झाली होती. राज माझ्यापेक्षा वयाने मोठा होता. बीजी आणि रमाचाची बाजारहाट करायला एकत्र जात. त्यांच्यात कोणताच स्टारपदाचा अहम् नव्हता. आमच्या ‘हॉलीवूड लेन’ कुटुंबाचे कुटुंबप्रमुख होते पृथ्वीराजपापा! कोणतीही अडचण निर्माण झाली की सारे जण त्यांच्याकडे जायचे, आपली अडचण सांगायचे. आणि चित्रपटातला हा ‘मोगल-ए-आझम’ आपल्या प्रजेचे प्रश्न हसतखेळत सोडवायचा.

‘हॉलीवूड लेन’मधल्या पाटर्य़ा या फिल्मी पाटर्य़ा नसत. जेवणाच्या ऑर्डरी हॉटेलात दिल्या जात नसत, तर घरातल्या स्त्रियाच अन्न शिजवीत. सगळे जण एकत्र येऊन जेवत. एखाद्या घरी लग्न असलं तरी ‘केटरर’ नसे, तर हलवाई येऊन जेवण बनवून देई. आणि आम्ही सारे जेवण वाढत असू. कायम हा असाच माहौल असे. लग्नाला पृथ्वीराजजी रमाचाचींना घेऊन स्वत: जातीने हजर राहत असत. घरातल्या वडीलधाऱ्या माणसासारखं लग्नात बारीकसारीक बाबींत त्यांचं लक्ष असे. ते आल्या- गेल्याची वास्तपुस्त करत असत. त्यांना स्वत: जेवण वाढत असत. एखाद्या पंजाबी कुटुंबातल्या मुलीचं लग्न असेल तर ते त्या मुलीच्या कुटुंबातलेच एक होऊन जात. सर्वाना आग्रह करकरून वाढत. मात्र, ते स्वत: त्या लग्नात कधीही जेवत नसत. त्याकाळी तशी रीत होती! मुलीच्या लग्नात तिच्या घरातील ज्येष्ठ जेवत नसत. कोणी खूपच आग्रह केला तर ते नम्रपणे सांगत, ‘‘माझ्या मुलीचं लग्न आहे, मी इथं कसं जेवणार?’’ या लग्नांत वरपक्षाच्या लोकांच्या थाळ्या ते स्वत: उचलत असत. ‘बरसात’ प्रदर्शित झाल्यानंतरही आमच्या एका पंजाबी लग्नात राज कपूरला जेवण वाढताना आणि थाळ्या उचलताना मी पाहिलं आहे.

सगळं कपूर खानदान पृथ्वीराजपापांच्या शिस्तीत अतिशय नम्रतेनं व्यवहार करत असे. स्टारडम होतं, पण परिचितांच्या बाबतीत ते कधीही आड आलं नाही. सभ्यता, सुसंस्कृतता हे उत्तम व्यक्तीचे केवळ दागिने असतात असं नाही, तर तो त्यांच्या अंगभूत गुणांचा भाग असतो, हे पृथ्वीराजपापाजींकडे पाहिलं की जाणवे. माझे पापाजी आणि त्यांचा खूप मोठा प्रभाव आमच्यावर आजही आहे. त्यामुळे कितीही नावलौकिक मिळाला तरी त्याने माजायचं नाही, ही शिकवण आम्हाला घरातच मिळाली.

पृथ्वीराजजींचा आणि आमचा परिचय झाला तेव्हा मी तरुण होतो. माझा विवाह झाला होता. आम्हा सर्वाना त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती वाटत असे. पृथ्वीराजजी वाघासारखे होते. त्यांच्यासमोर कोणीही काहीही बोलू शकत नसे. ते फार कमी बोलत. किंबहुना, न बोलताच ते खूप काही बोलून जात. कसं कोण जाणे, पण माझ्याबरोबर मात्र त्यांचा संवाद एखाद्या मित्रासारखा असे. कधी कधी माझ्या खांद्यावर हात टाकूनही ते बोलत असत. त्यावेळी हॉटेलच्या कॅश काऊंटरवर मी बसत असे. पण बऱ्याचदा पृथ्वीराजपापाजी अशा वेळी प्रीतममध्ये येत, की त्यावेळी मी घरी जायला निघालेलो असे. प्रीतमजवळच त्यांचा राव टेलर म्हणून एक शिंपी होता. त्यांच्याकडे ते येत, मग आमच्याकडे. त्यांची छोटी ओपल गाडी ते स्वत:च चालवत यायचे. मला ते हाक द्यायचे. पैरीपोना केल्यानंतर ते सगळी चौकशी करायचे. बीजी-पापाजींबद्दल विचारायचे. त्यातही सभ्य गृहस्थाप्रमाणे पहिली चौकशी ते बीजीची करायचे. मग पापाजींची आणि नंतर माझी. सर्वात शेवटी माझ्या मुलाची.. अमरदीपची- टोनीची. ते पाठीवर थाप द्यायचे आणि निघायचे. त्यांना सर्व प्रकारचं पंजाबी जेवण आवडत असे. त्यातही ‘कडा’ (प्रसादाचा पंजाबी हलवा) त्यांचा लाडका! कडा ते भरपूर खात असत.

त्यांनी चित्रपट खूप केले असले तरी नाटक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. ते आपली नाटक कंपनी घेऊन देशभर प्रयोग करत असत. प्रारंभी राज, शम्मी हे पृथ्वीराजजींबरोबर नाटकात काम करायचे; नंतर शशीने ती जबाबदारी उचलली आणि अत्यंत सामर्थ्यांने पार पाडली. हॉलीवूड गल्लीमधून सर्वात आधी राज बाहेर पडला. त्याने चेंबूरला स्टुडिओ थाटला आणि नंतर तिथंच त्याने एक बंगला भाडय़ाने घेतला. राज हा शम्मी व शशीपेक्षा बराच मोठा होता. सर्वच भावंडं त्याचा पृथ्वीराजपापाजींएवढाच आदर करत असत. या तिघांनाही अभ्यासात मुळीच रस नव्हता. त्यांना चित्रपटातच काहीतरी करायचं होतं.

आमची पंजाबी लोकांची एक असोसिएशन होती. पृथ्वीराजजी या असोसिएशनचे अध्यक्ष होते. ते सर्वाना मनापासून मदत करत. परंतु मदत करताना कधीही ‘मी मदत करतोय’ असा त्यांचा आविर्भाव नसे. चंदा- म्हणजे देणग्या गोळा करताना आम्ही सर्वात आधी त्यांच्याकडे जायचो. ते प्रथम आमचं आगतस्वागत करायचे आणि मग आलिंगन देऊन आशीर्वाद द्यायचे. नंतर खाऊपिऊ घालून दोन्ही हातांच्या ओंजळीत अत्यंत विनम्रपणे नव्याकोऱ्या एक-एक रुपयाच्या शंभर नोटांची थप्पी आणि त्यावर चांदीचा एक रुपया ठेवून ती ओंजळ आमच्यापुढे करायचे. देणगी देतानाही ती देणगी आम्ही स्वीकारावी, असा नम्र भाव त्यांच्या चेहऱ्यावर असे.

इसवी सनापूर्वी सव्वातीनशे वर्ष आधी होऊन गेलेल्या, नीतिमत्तेची शिकवण देणाऱ्या अ‍ॅरिस्टॉटलचा शिष्य सिकंदर बादशहाचा तो विसाव्या शतकातला अवतार होता.

कुलवंतसिंग कोहली

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2018 2:25 am

Web Title: kulwant singh kohli articles in marathi on unforgettable experience in his life part 2
Next Stories
1 मुंबईसंगे आम्ही(बि)घडलो!
Just Now!
X