स्मिथच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या रायझिंग पुणे सुपरजाएंट्स दमदार खेळाच्या जोरावर आयपीएल स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवले आहे. एकेकाळी पुण्याचे नेतृत्व करणारा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुण्याच्या संघात स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसतोय. मात्र, नेतृत्वाची धुरा स्मिथकडे असताना पुण्याच्या संघातून खेळणाऱ्या इंग्लडच्या अष्टपैलू बेन स्ट्रोकने धोनीला हिरो म्हणून पसंती दिली आहे. तर कर्णधार स्मिथला त्याने खलनायक संबोधले आहे.

रायझिंग पुणे सुपरजाएंट्समधील कोणत्या दोन खेळाडूंना नायक आणि खलनायक म्हणून पसंती देशील, असा प्रश्न बेन स्ट्रोकला विचारण्यात आला होता. या प्रश्नावर बेन स्ट्रोकने धोनीला नायक म्हणून तर स्मिथला खलनायक म्हणून पसंती दिली. इंग्लडचा बेन स्ट्रोक आयपीएल स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार स्मिथच्या संघात असला तरी या स्पर्धेनंतर इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिका रंगणार आहे. इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही मालिका चांगलीच प्रतिष्ठेची असते. त्यामुळे बेनने स्मिथला नायक म्हणणे फारसे खटकणारे नाही.

‘गल्फ ऑईल इंडिया’च्या लॉकर रुम प्रश्नावलीमध्ये अजिंक्य रहाणे, बेन स्ट्रोक आणि महेंद्रसिंग धोनी यांना प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी धोनीला खासगी गोष्ट सांगायची असल्यास कोणावर विश्वास ठेवशील असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी धोनीने स्वत:वरच विश्वास ठेवतो, असे सांगत स्वत:चा मुखवटा चेहऱ्यावर लावला. याच प्रश्नावर अजिंक्य रहाणे या प्रश्नावर महेंद्रसिंग धोनी तर बेन स्ट्रोकने ड्युप्लेसीला पसंती दिली.

प्रश्नावलीच्या रंगलेल्या खेळात बेनला बॉलिवूडमध्ये कोणाला नायक म्हणून पसंती देशील असे विचारण्यात आले होते. यावेळी त्याने धोनीला नायक म्हणून पसंती दिली. तर खलनायक म्हणून त्याने स्मिथचा मुखवटा चेहऱ्यावर लावला. बुधवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि रायझिंग पुणे सुपरजाएंट्स यांच्यात लढत होणार आहे. पुण्याने नुकत्याच झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सवर सनसनाटी विजय नोंदविला होता. त्यामुळे या दोन संघांमध्ये आयपीएलच्या स्पर्धेतील आजचा सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे.