प्रसिद्ध लेखक आनंद यादव यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ आणि ‘लोकसखा ज्ञानेश्वर’ या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर असल्याच्या कारणावरून या पुस्तकांच्या प्रती चक्क फाडून टाकण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

तसेच लेखक आणि प्रकाशक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. या दोन्ही पुस्तकांतून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांची बदनामी झाल्याचा आरोप संत तुकाराम यांचे वंशज जयसिंह मोरे यांनी केला होता. पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर असल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या जयसिंह मोरे यांनी प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी लेखक आनंद यादव आणि प्रकाशक सुनील मेहता यांना पुस्तकातल्या आक्षेपार्ह मजकूराबाबत पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते परंतु, दोघांनीही कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. या दोन्ही कादंबरी असल्यामुळे लेखकाला स्वत:चे मत मांडण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यात पुरावे कसे सादर करणार असे प्रकाशक मेहता यांनी सांगितले. त्यामळे अखेर न्यायालयाने या पुस्तकांच्या प्रती फाडून टाकण्याचे आदेश दिले. तसेच लेखक आणि प्रकाशक यांच्यावर प्रत्येकी २० हजार रुपयांची दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.