उद्धव यांच्या भाषणाच्या वेळी मूठभर उद्योगपती, बाकी सारे शिवसैनिकच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटन समारंभाला येण्याचे टाळणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मेक इन मुंबई’ चर्चासत्राला हजेरी लावली खरी, पण त्यांचे विचार ऐकण्याकरिता मूठभरच उद्योगपती उपस्थित होते, सारे सभागृह शिवसैनिकांनीच भरलेले होते. मग शिवसेनेचा मेळावा असल्याप्रमाणे घोषणाबाजी करण्यात आली तसेच ठाकरे यांच्या सादरीकरणात सारी शिवसेनेची छाप होती. ‘मेक इन मुंबई’ऐवजी ‘मेक इन शिवसेना’ असेच स्वरूप या चर्चासत्राला आले होते.
‘मेक इन मुंबई’ या चर्चासत्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. तेव्हा ‘जीव्हीके’चे संजीव रेड्डी, ‘सिस्को’चे दिनेश मलकानी, ‘येस बँके’ राणा कपूर, ‘रिलायन्स’चे निखिल मेसवानी, चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत यांच्यासह उद्योग क्षेत्रातील अनेक नामवंतांची हजेरी होती. मुख्यमंत्री उपस्थित असताना सारे सभागृह उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींनी भरलेले होते. जसे मुख्यमंत्र्यांचे भाषण आटोपले तसे उद्योग क्षेत्रातील उच्चपदस्थांनी काढता पाय घेतला. ठाकरे यांच्या आगमनापूर्वी शिवसैनिक जमू लागले होते. सभागृहात प्रवेश मिळावा म्हणून महिला आघाडीच्या काही कार्यकर्त्यांचा आवाज चढला होता. उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले तेव्हा काही मूठभर उद्योगपती सभागृहात होते व सारे सभागृह शिवसैनिकांनी भरून गेले होते. ठाकरे यांच्या भाषणाच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस हे आवर्जून उपस्थित होते.
भाषणापूर्वी ठाकरे यांनी त्यांच्या स्वप्नातील मुंबईचे सादरीकरण केले. मुंबईकरांना सागरी मार्ग, अत्याधुनिक सेवा असलेल्या सुविधा, पूर्व किनारपट्टी खुली करावी याचा समावेश होता. या सादरीकरणाच्या अखेरीस शिवसेना व धनुष्यबाण या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा उल्लेख होता. सरकारने आजच सहा लाख कोटींचे करार केले आहेत. माझे स्वप्न साकार करण्याकरिता मुख्यमंत्री मी तुमच्याशी करार करीत आहे, असे ठाकरे यांनी सांगितले असता मुख्यमंत्र्यांनी मान डोलावून त्याला होकार दिला.
महापौरांचे इंग्रजीतून भाषण
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्योग क्षेत्रातील अनेक नामवंत हजर असल्यानेच महापौर स्नेहल आंबेकर यांनी इंग्रजीत लिहून आणलेले भाषण वाचून दाखविले.