सगळ्या जगासाठी ‘ज्येष्ठ संपादक, लेखक’ अशी ओळख असलेल्या गोविंद तळवलकर यांचे त्यांचे धाकटे बंधू, चित्रकार मुकुंद तळवलकर यांनी जागवलेले हे हृद्य स्मरण..
आज गोविंद गेल्याचं सांगणारा पुतणीचा फोन आला आणि डोळय़ासमोर आम्ही दोघांनी एकत्र घालवलेलं आयुष्य आठवू लागलं. आम्हा तिघा भावांमधे अण्णा.. म्हणजे गोविंद.. सगळय़ात मोठा. मी चित्रकार झालो. माझ्याहून धाकटा अरविंद. तो टाटा मोटर्समधे पुण्याला होता. मोठा भाऊ या नात्यानं आमच्या सांस्कृतिक जाणिवा समृद्ध व्हाव्यात यासाठी अण्णा कायम दक्ष असे. मला अजूनही आठवतंय ही १९४७-४८ सालची गोष्ट असावी.
आम्ही त्यावेळी डोंबिवलीत रहायचो. अण्णा त्यावेळी २२ वर्षांचा होता आणि मी असेन १८-१९ वर्षांचा. त्यावेळी अण्णा मला व्हीटीला घेऊन आला होता.
मला घेऊन तो मेट्रो टॉकिजला गेला. कशसाठी? तर रोमिओ अँड ज्यूलिएट हा सिनेमा दाखविण्यासाठी. त्यावेळी मेट्रोचा पडदा मी पहिल्यांदा पाहिला. थरारूनच गेलो होतो मी त्या दृष्याने. नॉर्मा शीअरर, लेस्ली हॉवर्ड व जॉन बॅरीमोर यांची त्यात कामं होती. हा सिनेमा पाहिल्यानंतर अण्णाने शेक्सपिअर समजावून सांगितल्याचंही आता आठवतंय.
ही वाचनाची आवड त्याला आईपासून लागली. आमची आई त्या काळाचा विचार करता उत्तम वाचक होती. पुढे अण्णावर संस्कार झाले ते आमचे काका गोपीनाथ तळवलकर यांचे. काकांनी अण्णामधला वाचक घडवला. त्याच पुण्यातल्या काळात पुढे अण्णाचा संबंध श्री. के. क्षिरसागर यांच्यासारख्या विद्वानाशी आला. त्यामुळे त्याचा वाचनछंद चांगलाच बहरला. या वाचनाच्या सवयीमुळे अण्णाविषयी खूप गैरसमज तयार होत. तो माणूसघाणा आहे, तुसडा आहे वगैरे. पण यात तितका अर्थ नाही. याचं कारण अण्णाला गप्पा मारण्यात आनंद असे. पण त्या गप्पा कोणाशी मारायच्या याचं त्याचं भान पक्कं होतं. उगा वेळ घालवत शिळोप्याच्या गप्पा मारण्यात त्याला रस नसे. यापेक्षा आपल्याला इतकी सगळी पुस्तकं वाचायची आहेत, आपण ते करू या, असाच विचार त्याच्या मनात असे. त्यामुळे तो मनातून अशा ठिकाणांहून दूर होत असे. अशावेळी लोक म्हणत तो शिष्ट आहे वगैरे, पण त्यामागचं कारण हे होतं.
पण अण्णानं लोक काय म्हणतात याची कधीही फिकीर केली नाही. त्याच्या लिखाणाने अनेकजण दुखावत. पण तो शांत असे. अनेकदा आम्हाला त्याची काळजी वाटत असे. पण त्याच्यावर याचा काहीही परिणाम व्हायचा नाही. मला आठवतंय काही वेळा तर महाराष्ट्रातल्या ताकदवान राजकारण्यांनी अण्णाला संपादकपदावरनं काढावं यासाठी अनेक प्रयत्न केले. पण अण्णा होता तेथेच राहिला. त्याचं हे आपल्या विचारावरनं न ढळणं कौतुकास्पद होतं. मी अण्णाच्या टाइम्स समूहात लागलो. अनेकांचा असा समज आहे की, गोविंदरावांमुळे मी तेथे गेलो. पण तसं नाही. परंतु आपल्यामुळे आपला भाऊ येथे आहे, असा लोकांचा समज होईल, याचा अंदाज अण्णाला होता. त्यामुळे त्याने मला आडनाव लावायला बंदी केली होती. मी नुसतंच मुकुंद या नावानं चित्र काढत असे. पुढे अरूण टिकेकरांनी मला आडनाव दिलं.
अण्णांची अभिरूची उच्च दर्जाची होती. केसरबाई केरकर, बालगंधर्व यांचं त्याला खूप प्रेम होतं. पु. भा. भावे, गदिमा, पुल, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी अशा निवडक मित्रमंडळींत अण्णा खुलत असे.
भावनांच्या जाहीर प्रदर्शनाचा त्याला मनापासून तिटकारा होता. याचा अर्थ त्याला भावना नव्हत्या असं नाही. त्याच्या व्यक्तिमत्वाकडे बघून आता कोणाला खरं वाटणार नाही, पण अण्णाचा प्रेमविवाह होता. डोंबिवलीची शकुंतला गोरे ही त्याची बायको आणि आमची वहिनी. त्यावेळी त्या दोघांमधल्या चिठय़ा आणण्याची-पोहोचवण्याची जबाबदारी माझ्याकडे असायची. सन २०१४ मध्ये वहिनी गेली. तिच्या अंत्यविधीत विद्युतदाहिनीचा शेवटचा खटका पडला आणि अण्णा उन्मळून पडला. अगदी ओक्साबोक्शी रडला. त्याला असं रडताना बघण्याची ही पहिलीच वेळ. गेले काही दिवस तो आजारीच होता. शेवटी शेवटी तो आईची खूप आठवण काढत असे. आमची आई १९४८ सालीच वारली. त्यानंतर आमचा सांभाळ अण्णानेच केला. आता अण्णाही गेला.. माझ्यासमोर आई आणि रडणारा अण्णा हे चित्र काही हटायला तयार नाही.
श्रद्धांजली
वैचारिक व्यासपीठच..
ज्येष्ठ पत्रकार आणि साक्षेपी संपादक असलेले गोिवदराव तळवलकर हे एक वैचारिक व्यासपीठ होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रगल्भ संपादकाला मुकला आहे. तळवलकर हे एम. एन. रॉय यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या विचारवंतांचे प्रतिनिधी होते. ज्यांच्या लिखाणांची चर्चा घरोघरी होत असे, अशा संपादकांमध्ये तळवलकरांचा अवश्य उल्लेख करावा लागेल. त्यांचे अग्रलेख एकेकाळी चच्रेचे विषय असत. १९७८ मध्ये त्यांनी लिहिलेला अग्रलेख ‘हे राज्य जावे ही श्रींची इच्छा’ किंवा ‘संन्याशाचा सदरा’ अशा अनेक अग्रलेखांची सर्वसामान्यांमध्ये चर्चा होत असे. गोविंदरावांचे वैशिष्टय़ म्हणजे विविध प्रश्नांवरचे त्यांचे लेखन व साहित्याचे प्रगाढ वाचन. मग ते साहित्य महाराष्ट्राचे असो व इतर देशांतील लेखकांचे. पाश्चिमात्य विचारवंतांशी तर गोिवदरावांचा विशेष घरोबा होता. भारतातील विद्वानांशी त्यांचा अखंड सुसंवाद असे. यशवंतराव चव्हाण, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. गोवर्धनदास पारेख, अ. भि. शाह यांच्यापासून पु. ल. देशपांडे यांच्यापर्यंत त्यांचा मोठा गोतावळा होता. स्वातंत्र्याचा इतिहास आणि न्या. रानडे यांच्या विचारदर्शनाबाबत त्यांनी सखोल व अभ्यासपूर्ण लेखन केले. त्यांच्या निधनाने वैचारिक व्यासपीठ हरपले. – शरद पवार
तळवलकरांचे लेखन महाराष्ट्राचा वैचारिक ठेवा
जांभेकर, टिळक, आगरकर, गोखले.. अशा संपादकांनी जी श्रेष्ठ अशी परंपरा निर्माण करून दिली, त्या परंपरेतील गोविंदराव तळवलकर हे एक होते. महाराष्ट्रासह देशपातळीवरील राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि यासोबत साहित्य, कला, संस्कृती, सामाजिक प्रश्न अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने तळवलकरांनी अग्रलेखासह विविध लेखमालेतून मांडले. ग्रंथप्रेमी असा हा माणूस शब्दकळा, शैली सगळे घेऊन अग्रलेख व लेख लिहिणारा संपादक होता. त्यांच्या लेखनाचा दबदबा होता. अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणी आणि त्यांनी सूचना केलेल्या गोष्टी या राज्यकर्त्यांनासुद्धा मार्गदर्शक ठरल्या. यशवंतराव चव्हाणांच्या संबंधी लिहिलेला त्यांचा ग्रंथ आणि अनेक राजकीय, सामाजिक प्रवाहांचे त्यांचे लेखन हा महाराष्ट्राचा मोठा वैचारिक ठेवा आहे. साहित्य संमेलने किंवा साहित्य महामंडळे यातील चुकीच्या गोष्टी व उत्सवी स्वरूपावर त्यांनी प्रहार केले. साहित्य संमेलनाची निवड प्रक्रियाच सुधारली पाहिजे आणि सन्मानाने अध्यक्ष केला पाहिजे यासाठी त्यांनी सातत्याने लिखाण केले. महाराष्ट्राला त्यांनी वैचारिक बैठक दिली. – ना. धों. महानोर (ज्येष्ठ कवी)
‘‘गोविंद तळवलकर यांचा औरंगाबादमधील विविध ज्ञानक्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींशी संपर्क असे. ते जेव्हा जेव्हा औरंगाबादला येत, तेव्हा तेव्हा विद्यापीठातील काही मोजक्या प्राध्यापकांना जेवणासाठी बोलवत. त्यांच्या समवेत ही बैठक दोन-अडीच तास चाले. महाराष्ट्र टाइम्सच्या स्वरुपाबाबत जसे बातम्या, अग्रलेख कसे वाटतात या विषयी ते प्रतिक्रिया जाणून घेत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ज्ञानक्षेत्रातील घडामोडींविषयी चर्चा करत. त्यांच्या या बैठकांना मी प्रत्येक वेळी हजर राहिलो आहे. अनंत भालेराव आणि गोविंद तळवलकर हे दोघेही ज्ञानक्षेत्रातील विविध व्यक्तींशी कायम संपर्कात राहात. दोघांच्याही शैलीमध्ये तसे काही समान घटक होते. दोघांच्याही अग्रलेखामध्ये अद्ययावत स्वरुपाची सामग्री प्रकट होत असे. त्यामुळे त्यांचे अग्रलेख कधीच शिळे वाटले नाहीत.’’ – डॉ. सुधीर रसाळ, ज्येष्ठ समीक्षक
द्वा. भ. कर्णिकांची परंपरा पुढे नेली
गोविंद तळवलकर हे आधी ‘लोकसत्ता’मध्ये होते. तिथून ते ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आले. ‘मटा’चे पहिले संपादक द्वा. भ. कर्णिक यांनी ‘मटा’चा मूळ पाया घातला. कर्णिकांनी घालून दिलेली परंपरा तळवलकर यांनी पुढे सुरू ठेवली. त्यांचा स्वभाव मुळातच अबोल होता. ते फारसे कोणाशी बोलायचे नाहीत. तळवलकर आणि मी दादरला ओरिएन्टल हायस्कूलमध्ये एकत्र होतो, अशी एक आठवण आहे. पुढे ‘मटा’मध्ये आम्ही एकत्र आलो आणि आमची पुन्हा गाठ पडली. – दिनू रणदिवे, पत्रकार
अग्रलेख चिंतामणीला सलाम
पन्नास वर्षांपेक्षा अधिक संपादकीय कार्यकाळ, तोही एका प्रचंड वाचक वर्ग असलेल्या जबाबदार वृत्तपत्रात. निष्कलंक संपादक अशी प्रतिमा. हा योगायोग किंवा अपघात नाही. हे आहे त्यांच्या चारित्र्यसंपन्न पत्रकारितेचे फलीत. प्रचंड वाचन, अमर्याद स्मरणशक्ती आणि धारदार लेखनशैली असलेला एकोणिसाव्या शतकातील राजकीय, सामाजिक, वैचारिक घटनांचा साक्षीदार आणि विश्लेषक असलेला डोंगराएवढा मोठा गोविंद तळवलकर नावाचा पत्रकार आपल्या कर्तृत्वाचा आणि शैलीचा ठसा मराठी पत्रकारितेवर कोरून गेला आहे. या अग्रलेख चिंतामणीला एक मित्र या नात्याने अखेरचा दंडवत. – वनाधिपती विनायकदादा पाटील
पत्रकारितेतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व
तळवलकर यांच्या निधनाने पत्रकारितेतील एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तळवलकर यांनी मराठी पत्रकारितेलाच एक नवा आयाम दिला. स्वातंत्र्योत्तर मराठी पत्रकारितेत ‘संपादक’ या शब्दालाच त्यांनी एक वलय प्राप्त करून दिले. मराठी पत्रकारितेला दिशा देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
तळवलकर यांची साहित्य संपदा
- अग्निकांड (‘युद्धाच्या छायेत’ या स्तंभलेखनाचा पुस्तकरूपी संग्रह)
- अग्रलेख
- अफगाणिस्तान
- अभिजात (१९९०)
- अक्षय (१९९५)
- इराक दहन :- सद्दाम हुसेन यांच्या पाडावाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेने पुकारलेल्या लढय़ाचा ताळेबंद.
- Gopal Krishna Gokhale Gandhi’s Political Guru
- ग्रंथ सांगाती (१९९२)
- डॉ. झिवागोचा इतिहास (लेख ललित दिवाळी अंक, २०१५)
- नियतीशी करार
- नेक नामदार गोखले
- नौरोजी ते नेहरू (१९६९)[२]
- परिक्रमा (१९८७)
- पुष्पांजली (व्यक्तिचित्रे, मृत्युलेख संग्रह), खंड १ व २.
- प्रासंगिक
- बदलता युरोप (१९९१)
- बहार
- बाळ गंगाधर टिळक (१९७०)
- भारत आणि जग
- मंथन
- यशवंतराव चव्हाण: व्यक्तित्व व कर्तृत्व
- विराट ज्ञानी – न्यायमूर्ती रानडे
- लाल गुलाब
- वाचता वाचता (पुस्तक परीक्षणांचा संग्रह, खंड १, २) (१९७९,९२)
- वैचारिक व्यासपीठे (वैचारिक, माहितीपर)
- व्यक्ती आणि वाङ्मय (व्यक्तिचित्रणे)
- शेक्सपियर – वेगळा अभ्यास (लेख – ललित मासिक, जानेवारी २०१६)
- सत्तांतर (खंड १-१९७७ , २-१९८३, व ३-१९९७)
- सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त (खंड १ ते ४)
- सौरभ (साहित्य आणि समीक्षा, खंड १, २)
पुरस्कार [संपादन]
- उत्कृष्ट पत्रकारितेचे ‘दुर्गा रतन’ व ‘रामनाथ गोएंका’ पुरस्कार
- लातूर येथील दैनिक एकमत पुरस्कार
- न.चिं केळकर पुरस्कार (‘सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त’ पुस्तकासाठी)
- इ.स. २००७ चा जीवनगौरव पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारचा लोकमान्य टिळक पुरस्कार
- सामजिक न्यायाबद्दल रामशास्त्री पुरस्कार