मुख्यमंत्र्यांचे ‘एमएमआरडीए’ला आदेश

मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम तातडीने हाती घेऊन लवकर पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कासव गतीने सुरू असलेल्या कोपरी पुलाचे काम आता वेग घेईल, अशी चिन्हे आहेत. कोपरी पुलाच्या रुंदीकरणानंतर या मार्गावरील वाहतूक कोंडी टळणार आहे.

ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावर कोपरी पूल असून तो मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर आहे. या पुलाखालून मध्य रेल्वेची वाहतूक सुरू असते. मुंबई आणि ठाणे शहरातील वाहतुकीसाठी हा मार्ग महत्त्वाचा मानला जात असून या मार्गावर वाहनांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ सुरू असते. मुंबई-नाशिक महामार्ग आठ पदरी असला तरी कोपरी पुलावर मात्र चार पदरी रस्ता आहे. या चिंचोळ्या मार्गामुळे कोपरी पुलावर वाहतूक कोंडी होऊन त्याचा परिणाम शहरातील अंतर्गत रस्त्यांवर होतो. दररोज सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत पुलाच्या परिसरात वाहनांच्या मोठय़ा रांगा लागतात. ही कोंडी सोडविण्यासाठी कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. या निर्णयामुळे पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, या कामाच्या प्रस्तावास मध्य रेल्वेकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या पुलाचे काम प्रत्यक्षात सुरूहोण्यास उशीर होत आहे. या कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना मात्र वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. या पाश्र्वभूमीवर खासदार विनय सहस्रबुद्धे, त्यांचे प्रतिनिधी सुजय पत्की आणि इतरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी कोपरी पुलाच्या कामाबाबत चर्चा केली. या कामासाठी महापालिका, रेल्वे आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामध्ये समन्वय करून या पुलाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी खासदार सहस्रबुद्धे यांनी यावेळी केली. यावेळी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडेही उपस्थित होते. जुन्या पुलाच्या बाजूने चार पदरी नवीन पूल उभारण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर निविदा काढून पावसाळ्यानंतर पुलाचे काम सुरू करण्यात येईल, असे दराडे यांनी बैठकीत सांगितले.