बुलढाणा : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशारने बुट मारला. दुसरा वकील अनिल मिश्रा संविधान संपविण्याचा आणि संविधान निर्माते बाबासाहेबांचे विचार संपविण्याची भाषा करतो. आता हा अपमान सहन केला जाणार नाही. ‘त्याने बूट मारला, आम्ही बुलेट मारू, गाली का जबाब गोलियोसे दिया जाएगा,’ असा इशारा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी आज जनआक्रोश मोर्चाप्रसंगी दिला.

सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकील राकेश किशोर आणि अनिल मिश्रा यांच्याविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, त्यांची सनद रद्द करावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आज (१७ ऑक्टोबर) भीम आर्मीच्या वतीने सतीश पवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

‘त्याने बूट मारला, आम्ही बुलेट मारू!’ – सरन्यायाधीशांवरील हल्ल्याविरोधात बुलढाण्यात भीम आर्मीचा आक्रमक मोर्चा.

तत्पूर्वी जिजामाता प्रेक्षागार मैदानावर झालेल्या सभेला संबोधित करताना येथून पुढे होणारे अन्याय, अत्याचार सहन केले जाणार नाही, असा इशारा सरकारला देण्यात आला.

सुरुवातीला संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. सुरेश जाधव, अनंता मिसाळ, कैलास खिल्लारे, शैलेश वाकोडे, प्रकाश धुंदळे, संतोष वानखडे यांनी मोर्चात आपले सडेतोड विचार मांडले. मल्हारी गवई यांनी मनुवादी विचारसरणीवर आधारित गीत सादर केले. संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार लाइन, कारंजा चौक या मार्गाने घोषणाबाजी करीत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

सरकार आणि मनुवादी धोरणा राबविणाऱ्यांवर चौफेर टिका करीत सतीश पवार म्हणाले, दोन्ही वकील मनोविकृत आहे. यापूर्वी सर्वोच्च पदावर बसलेले हिदायतऊल्ला खान यांच्यावरही हल्ला झाला होता, याचाही दाखला त्यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित, पीडित वर्गाला जगण्याचा अधिकार दिला.

आजही बुरसटलेले विचार कायम आहेत. त्यातून मागासवर्गीयांवर अन्याय, अत्याचार केला जात आहेत. कितीही शिकून मोठे झाले तरी चातुर्वण्य व्यवस्थेनुसार तुम्ही लायकी ही आमच्या पायातील पायताणात आहे, असे आम्ही समजतो हे मनुवाद्यांना दाखवून द्यायचे आहे. परंतु, यापुढे आम्ही शांत बसणार नाही. आमच्यावरील अन्याय, अत्याचार खपवून न घेता प्रतिकार करण्याची ताकद आमच्यात आहे, हेदेखील सतीश पवार यांनी ठणकावून सांगितले.

लक्षवेधी प्रतीकात्मक देखावा

गळ्यात मडके, कंबरेला झाडू बांधलेल्या पाच व्यक्तींचा प्रतीकात्मक देखावा सादर करण्यात आला. या जिवंत देखाव्यातून जसा अत्याचार पूर्वी व्हायचा, तीच मागील परिस्थिती आणण्याचा प्रयत्न सध्या मनुवादी विचारसरणीतून आणल्या जाणार असल्याचे वास्तव दर्शविण्यात आले. तसेच या मोर्चात दंडाला काळ्या फिती बांधून सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.

…तर पोलिस ठाण्याला घेराव

आम्ही जातीवाद मानत नाही, सामनता मानतो. मिश्रा आणि किशोर या वकिलांविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तीन दिवसांत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; नाहीतर हजारोंच्या संख्येने पोलिस ठाण्याला वेढा घालू, असा इशाराही सतीश पवार यांनी दिला.