बुलढाणा : लोकार्पण पासून लहान मोठ्या अपघातानी गाजत असलेल्या समृद्धी महामार्गवरील अपघातांची मालिका अजूनही कायम आहे. अशाच एका अपघातात चालक ठार तर एक प्रवासी महिला गंभीर जखमी झाली आहे.

नागपूर येथून मुंबईकडे जात असताना डोणगाव शिवारात समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक २६२ वर भरधाव वेगातील कार ट्रकवर मागून आदळली. या दुर्घटनेत चालक जागीच ठार झाला असून प्रवासी महिला गंभीर जखमी झाली आहे. तीन नोव्हेंबरच्या रात्री साडे दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

यवतमाळ येथील भावीन जसवंत नंदा (वय ४०) व सोनी पांडे (वय ३०) हे कार (क्रमांक एमएच-२९-एआर-५७९२)ने नागपूरहून मुंबईकडे निघाले होते. डोणगाव शिवारातील चॅनेल क्रमांक २६२ वर चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे भरधाव वेगातील कार समोरील मालवाहू वाहनावर (ट्रकवर) आदळली. या अपघातात भावीन नंदा जागीच ठार झाले तर सोनी पांडे गंभीर जखमी झाल्या.

दुर्घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलीस ठाण्याचे पवन गाभणे व पोलीस अंमलदार चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह आणि जखमीस रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात नेले. गंभीर जखमी सोनी यांना पुढील उपचारार्थ संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.