बुलढाणा : बुलढाणा विधानसभा मतदारसंघांचे आक्रमक आमदार संजय गायकवाड (शिवसेना शिंदे गट) आमदारकीच्या सुमारे सहा वर्षांच्या कार्यकाळात वादाचा केंद्रबिंदू ठरले. वादग्रस्त विधाने, हाणामारी, यांमुळे राज्यात गाजले, वादंगाचा विषय, विरोधी पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या टिकेचा विषय ठरले. आता ते दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांच्या वाहनाच्या ताफ्यात दाखल झालेल्या ‘डिफेन्डर’ या आलिशान व शाही वाहनामुळे चर्चा आणि टीकेचा विषय ठरले आहेत.

बुलढाण्याचे माजी आमदार आणि भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी यावरून आमदार गायकवाड यांच्यावर टिकेची तोफ डागली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून आमदार गायकवाड यांनीही शिंदेवर प्रहार केला आहे. मात्र, दोघांनीही थेट एकमेकांचा नामोल्लेख करण्याचे टाळले.

शिंदे काय म्हणाले…

डिफेन्डरबद्दल विचारणा केली असता, भाजपा जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी हल्लाबोल केला. मागील काळात माझ्यावर पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप करणाऱ्याने काल एक-दीड कोटी रुपयांची ‘डिफेंडर’ आणली आहे. ती एका ‘कॉन्ट्रॅक्टर’च्या नावावर आहे. ती कोणत्या कामातून कमिशन म्हणून मिळाली, याची चौकशी व्हावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. ‘डिफेन्डर’वरून त्यांची ‘गाडी’ नगर पालिकेकडे वळली.

मागील विधानसभा निवडणुकीनंतर मतदारांना ‘वारंगना’पेक्षा खराब म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींना जनता नाकारणार आहे, असा दावा त्यांनी नाव घेता बोलून दाखविला. भाषणबाजीतून बुलढाणा पालिकेसाठी भाजपा-शिवसेना (शिंदे गट) युती होणार नाही. त्यासाठी चर्चा करावी लागणार आहे. पालिका अध्यक्षपद भाजपला मिळाले तरच युती होईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

आरोप करणाऱ्या कुत्र्यांना…

आमदार संजय गायकवाड यांना ‘डिफेन्डर’वरून छेडले असता ते म्हणाले की, ज्या गाडीची चर्चा होत आहे, ती गाडी नीलेश ढवळे या कंत्राटदाराची आहे. तो माझा नातेवाईकही आहे आणि पक्षाचा कार्यकर्ताही आहे. त्याने शंभर टक्के कर्ज काढून ती गाडी घेतलेली आहे. आता मी काही दिवस वापरण्यासाठी ती गाडी माझ्याकडे बोलावली आहे एवढेच! माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर आमदाराचा ‘सिम्बॉल’ लावला आहे, त्यात काही गैर नाही. ज्यांनी माझ्यावर कमिशनचे आरोप केले त्या कुत्र्यांना मला उत्तर द्यायची गरज नाही.

शाही वाहन टीकेचा अन् कुतूहलचाही विषय

बुलढाण्याच्या राजकारणात कायम बऱ्या वादंगाचा विषय ठरणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लँड रोव्हर कंपनीची ‘डिफेंडर’ कार सध्या शहरात चर्चेचा मुख्य विषय बनली आहे. ही कार म्हणजे आरामदायक सुविधा, दणकटपणा आणि सुरक्षा यांचा संगम मानला जातो.

अत्यंत मजबूत, दमदार इंजिन असलेली ही गाडी बुलेटप्रूफ आहे. म्हणजेच खऱ्या अर्थाने ‘डिफेंडर’ तिच्या नावाला साजेशी! संजय गायकवाड यांच्या हजारो समर्थक, नागरिकांमध्ये गाडी पाहण्यासाठी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या नव्या गाडीचा नंबरही ३१३२ असा लक्ष वेधणारा आहे. मागील काळात माजी आमदार विजयराज शिंदे हे ‘डिफेंडर’ गाडीमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. अशी ही ‘डिफेंडर’ पुन्हा चर्चेत आली आहे.