News Flash

फड नासोंचि नेदावा..

राजकारणास इंग्रजी प्रतिशब्द आहे पॉलिटिक्स. त्याची व्युत्पत्ती होते ग्रीक भाषेतील पॉलिटिका या शब्दातून.

संग्रहित छायाचित्र

‘राजकारण करू नका’ असे आपल्याला सांगणारे सत्ताकारणी हे खरे तर, आपल्या प्रश्नांपासून त्यांचा स्वत:चा बचाव करीत असतात..

‘राजकारण बहुत करावे’ हे समर्थवचन. तसे समर्थानी सांगितले नसते, तरी राजकारण करणे का कोणी सोडले असते? ते तर पाचवीलाच पुजलेले असते आपल्या. जगात पाऊल ठेवल्याबद्दल एकदा टँहॅ फोडून झाल्यानंतर मनुष्याच्या पिल्लास आपोआपच ही समज येत असावी, की येथे जगावयाचे असेल तर राजकारणाशिवाय पर्याय नाही. ती समज आली की त्याचे जाणता-अजाणता जे सुरू असते ते राजकारणच. कळपात आपले अस्तित्व टिकविणे ही प्रत्येक प्राणिमात्राची स्वाभाविक प्रेरणा. त्यासाठी जे केले जाते ते राजकारण. वर्चस्वसंपादन हा त्यापुढचा भाग. तत्पूर्वी टिकणे महत्त्वाचे. त्यासाठीच आपल्या सर्वाचे राजकारण सुरू असते. एकदा टिकणे साधले की मग पुढे सत्ता, अधिकार यांचा ओढ निर्माण होते. कुटुंबात, कचेरीत, मित्रांच्या टोळक्यात, व्यवसायात आपलेच नाणे चालावे अशी इच्छा निर्माण होते मनात. त्यासाठी जमेल तसे प्रयत्न सुरू होतात. परंतु त्यातील मौज अशी, की त्या प्रयत्नांना कोणी राजकारणाचे नाव देत नाही. ‘राजकारण बहुत करावे, परंतु कळोच नेदावे’ हा समर्थउपदेश. तो याबाबतीत सारेच अमलात आणतात. किंबहुना अनेकांचा असाच भ्रम असतो, की आपण कधीही राजकारण करीत नाही. अनेक जण वर नाक करून तसे म्हणताना दिसतात. वस्तुत: हे आढय़ताखोर विधान म्हणजे राजकारणात अपयशी ठरल्याचा कबुलीजबाबच. त्यापरते त्यास मूल्य नाही. कारण आपण राजकारण करीत नाही या विधानाचा भावार्थ हाच असतो, की सत्तास्पर्धेत जिंकण्याचे कर्तृत्व आपल्यात नाही. तेथील अतुर्बलींपुढे आपले राजकारण कमी पडते. असे विधान केले जाते. याचे दुसरे कारण म्हणजे राजकारण या शब्दाचा आपण घेतलेला संकुचित अर्थ. तो अर्थ लक्षात घेतला, की मग ‘याचे राजकारण करू नका, त्याचे राजकारण करू नका’ अशा सल्ल्यांमागील राजकारणाचा उलगडा होईल.

राजकारणास इंग्रजी प्रतिशब्द आहे पॉलिटिक्स. त्याची व्युत्पत्ती होते ग्रीक भाषेतील पॉलिटिका या शब्दातून. म्हणजे नगरांचा व्यवहार. पूर्वी नगरराज्ये होती, हे लक्षात घेतले की आपल्या ‘राजकारण’ या शब्दाचाही तोच अर्थ होतो हे ध्यानात येते. कोशातही हा शब्द राज्य, सत्ता आणि नागरिक यांच्याशीच जोडला गेलेला आहे. त्यामुळे अनेकांचा समज असा, की राज्याच्या सत्तेच्या संदर्भात जे जे केले जाते, तेवढय़ासच राजकारण म्हणावे. त्यामुळे ‘तुमचं पॉलिटिक्स काय’ हा प्रश्नच त्यांना समजत नाही. एकदा राजकारणाची गाठ सरकारशी, सत्तेशी लावून दिली, की मग आपले स्वत:चे राजकारण अशी काही भानगड उरण्याचा सवालच येत नाही, असे त्यांना वाटत असावे. परंतु राजकारणाचा परीघ इतका मर्यादित नाही. समर्थानी तर लोकसंग्रहासाठी ‘दुसरें तें राजकारण’ असे म्हटलेले आहे. ‘जनसमुदाय अनन्य’ राहावा यासाठी ते राजकारण आवश्यक मानतात. परंतु आपले व्यक्तिमत्त्व अनन्य राहावे यासाठीही ज्याच्या-त्याच्याकडे त्याचे स्वत:चे ‘पॉलिटिक्स’ असणे हेही गरजेचे आहे. टिकणे ही मनुष्याची प्राथमिक प्रेरणा असेल, तर त्या टिकण्यासाठी प्रथमत: त्याचे व्यक्तिमत्त्व अबाधित राहणे आवश्यक असते. ते तसे राखायचे असेल, तर त्याला विचारांची, भूमिकांची जोड द्यावीच लागते. आजूबाजूच्या परिस्थितीला प्रश्न विचारून तिला भिडावेच लागते. हे भिडणे हेही राजकारण असते. लोकांनी परिस्थितीला तसे भिडू नये ही काहींची इच्छा असू शकते. तो त्यांच्या सत्ताकारणाचा भाग असू शकतो. लोकांची विचारशक्तीच बधिर करून टाकणे हा त्याचा उपाय असू शकतो. तसे प्रयत्न केले जातातही. आवश्यकता आहे ती त्यापासून सावध राहण्याची. विद्यार्थ्यांनी राजकारण करू नये, शिक्षकांनी राजकारणात पडू नये, सामान्य नागरिकांनी त्यापासून सावध राहावे, असे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा वरवर पाहता हे सत्तेच्या राजकारणाबद्दल बोलले जात आहे असे वाटू शकते. परंतु अनेकदा ते तसे नसते. बहुधा परिस्थितीचे जैसे-थेपण कायम ठेवणे हाच त्या उपदेशामागचा हेतू असतो. हा हेतू पडताळून पाहण्याची एक साधी कसोटी आहे. राजकारण करू नका, असा सल्ला कोणाकडून येतो ते पाहावे. तो सत्तेवर असलेल्यांकडून येत असेल, तर समजून जावे की विद्यमान व्यवस्थेतील हितसंबंधच त्या उपदेशाआडून आपल्याला आदेश देत आहेत आणि लोकांचे राजकारण आणि त्यांचे सत्ताकारण यांच्यात संघर्ष निर्माण झालेला आहे. एरवी सामान्य जनतेच्या जगण्या-मरण्याशी, त्यांच्या समाज-संस्कृतीशी निगडित जे जे महत्त्वाचे प्रश्न वाटतात, ते विचारले गेले की वरून उपदेशाची वर्षां झालीच नसती, की राजकारण करू नका.. दुष्काळ हा दुष्काळच आहे, बलात्कार हा बलात्कारच आहे, त्याचे राजकारण करू नका. हे म्हणणे एका मर्यादेपर्यंत योग्यच असते, की कोणताही गुन्हा हा गुन्हाच असतो. कोणतीही आपत्ती ही आपत्तीच असते. तेथे टाळूवरचे लोणी कोणी खाऊ नये. झुंडीला हिंसाप्रवृत्त करण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ नये. परंतु याचा अर्थ असा नव्हे, की नागरिकांनी त्या घटनांचा निषेधही करू नये वा त्याबाबत प्रश्नही उपस्थित करू नयेत. ते विचारले गेलेच पाहिजेत. तेच खरे आपले ‘राजकारण’ असते. वैयक्तिक जीवनात आणि सामाजिक आयुष्यातही ते केलेच पाहिजे. अगदी सत्ताकारणातही – तेथे आपला पक्ष कोणताही असो – हे ‘राजकारण’ असले पाहिजे. सत्ताधारी पक्ष आपला असेल तेव्हा मौनाची धुळाक्षरे गिरवावीत आणि विरोधी पक्षात असलो की आरोळ्या ठोकत निघावे हा पक्षपात या राजकारणात असता कामा नये. कारण अंतिमत: राष्ट्राचा आणि समाजाचा गाडा चालत असतो तो याच राजकारणावर. तसा पक्षपात आपण करीत असू, तर हे ओळखून जावे की आपण करतो ते आपले राजकारण नाही. कोणाच्या तरी सत्ताकांक्षेपोटी मांडण्यात आलेल्या कपटखेळातले आपण एक खेळगडी बनलेलो आहोत. त्यातून कदाचित आपल्या तथाकथित पक्षीय भूमिकांचा विजयही झाल्याचे दिसेल, परंतु ते आपल्या व्यक्तिमत्त्वाचे मरण असेल.

तेव्हा मुळात सत्तेचे कपटखेळ हेच राजकारण हा गैरसमज काढून टाकला पाहिजे. या गैरसमजातूनच राजकारण या संकल्पनेविषयी भल्याभल्यांच्या मनात घृणा आणि तिरस्कार निर्माण झाला आहे. आपल्याला राजकारण करू नका असे सांगणे त्यामुळे सत्ताकारण्यांनाही सोपे झाले आहे. ते जेव्हा हे सांगतात, तेव्हा आपल्याला वाटते, की ते एका वाईट गोष्टीपासून आपल्याला वाचवत आहेत. वस्तुत: ते आपल्या विचार करण्यापासून, आपल्या प्रश्न विचारण्यापासून, आपल्या ‘राजकारणा’पासून स्वत:चा बचाव करीत असतात. त्यांचा हा बचाव अंतिमत: लोकहितविरोधीच असतो. कारण एकदा लोकांनी राजकारण सोडले, की मग उरतात त्या फक्त सत्तापिपासू टोळ्या. वर्चस्वसंपादन ही जरी स्वाभाविक प्रेरणा असली, तरी त्यासाठी केले जाते तेवढेच राजकारण नसते. सत्ता हीच राजकारणाची अंतिम मर्यादा नसते. ती तेवढीच आहे असे भासवून राजकारणाचा फड नासविण्याचे काम करणारे विपुल आहेत. ते आपल्या मानेपर्यंत पोचू नयेत, यासाठी हा ‘फड नासोंचि नेदावा’ हे आपले कर्तव्य ठरते. ‘राजकारण बहुत’ करणे आवश्यक आहे ते त्या कर्तव्यपूर्तीसाठीच..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 3:42 am

Web Title: a rape is a rape there should be no politics over issue
Next Stories
1 ‘धर्मा’ची चौकट
2 होऊन जाऊ द्या..!
3 स्टॉक एक्स्चेंज आणि संघशाखा
Just Now!
X