दिल्लीतील एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाला गतवर्षी दिवंगत नेते अरुण जेटली यांचे नाव दिले गेले. आता एक पाऊल पुढे जात, जेटली यांचा पुतळाच या मैदानात उभारण्याचे ठरले आहे..

सुनील गावस्कर, कपिलदेव, सचिन तेंडुलकर यांच्या नावे भारतवर्षांत एकही मैदान उभारले गेलेले नाही. प्रकाश पडुकोण, पी. टी. उषा, मिल्खासिंग यांच्या नावे एकही क्रीडा संकुल आपल्याकडे आढळणार नाही. स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदकवीर खाशाबा जाधव यांच्या नावेही दखलपात्र असे काही उभे राहिलेले दिसत नाही. त्यातल्या त्यात ध्यानचंद सुदैवी. त्यांच्या नावे किमान एक मैदान तरी आहे. तसाच सुदैवी बायचुंग भुतिया. त्याच्याही नावे सिक्कीममध्ये फुटबॉल मैदान आहे. आपल्याकडे क्रीडा संस्कृती अजूनही बाल्यावस्थेत आहे. त्यातही क्रिकेटने अधिक बाळसे धरलेले दिसते. पण म्हणून उपरोल्लेखित तिघे किंवा इतर क्रिकेटपटूंची नावे मैदानांना दिली गेली आहेत असे अजिबातच घडलेले नाही. दिल्लीची क्रिकेट संस्कृती मुंबई किंवा बंगालइतकी सशक्त नाही. तरी मन्सूर अली खान पतौडी, बिशनसिंग बेदी, मोहिंदर अमरनाथ, वीरेंदर सेहवाग, विराट कोहली, अंजूम चोप्रा असे प्रतिभावान दिल्लीकडून खेळले. परंतु दिल्लीतील एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाला- पूर्वीचे फिरोजशहा कोटला स्टेडियम- नाव दिले गेले आहे, दिवंगत अरुण जेटलींचे! दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (डीडीसीए) अध्यक्षपदावर जेटलींची १९९९ ते २०१३ या काळात जवळपास अनिर्बंध हुकमत होती. गेल्या वर्षी त्यांचे निवर्तणे अनेकांसाठी क्लेशकारक ठरले. जेटलींनीच फिरोजशहा क्रिकेट मैदानाच्या विकासात मोलाचे योगदान दिले असा त्यांच्या समर्थकांचा दावा. तो विवाद्य ठरतो. पण या समर्थकांनी आता एक पाऊल पुढे टाकत, जेटलींचा पुतळाच कोटला मैदानात उभारण्याचे ठरवले आहे. जेटलींचे चिरंजीव रोहन हे डीडीसीएचे विद्यमान अध्यक्ष आहेत. संघटनेच्या संचालक समितीत यासंबंधीचा प्रस्ताव बिनविरोध संमत झाला असे त्यांचे म्हणणे. परंतु आपल्या जादूई फिरकीइतकेच रोखठोक   मतप्रदर्शनासाठीही ओळखले जाणारे भारताचे विख्यात माजी कर्णधार आणि अनेक अर्थानी अस्सल ‘दिल्लीकर’ बिशनसिंग बेदी यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी डीडीसीएशी सर्व संबंध तोडून टाकले आहेतच, शिवाय मैदानातील एका स्टॅण्डला त्यांचे नाव देण्यात आले होते, तेही काढून टाकावे अशी विनंती केली आहे. याबाबत त्यांनी लिहिलेले पत्र जगजाहीर झाले असून, देशातील क्रिकेट संस्कृतीविषयीची त्यांची निरीक्षणे अभ्यासनीय ठरतात. त्याचबरोबर, खेळाच्या मैदानांना कोणाची नावे दिली जावीत आणि त्याही पुढे जाऊन, कोणाचे पुतळे उभारले जावेत किंवा जाऊ नयेत, याविषयीदेखील चर्चेला नव्याने सुरुवात झाली आहे.

बेदी काही महत्त्वाची उदाहरणे देतात. उदा. जगद्विख्यात लॉर्ड्स मैदानाबाहेर डब्ल्यू. जी. ग्रेस यांचा पुतळा आहे. सर गॅरी सोबर्स यांचा पुतळा बार्बेडोसच्या किंग्जटन ओव्हल मैदानाची शान वाढवतो. सिडनी क्रिकेट ग्राऊंडबाहेर सर डॉन ब्रॅडमन यांचा पुतळा आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानाबाहेर शेन वॉर्नचा पुतळा आहे. पण हे उल्लेख त्रोटक आहेत. मेलबर्नच्या मैदानाबाहेर कीथ मिलर, डेनिस लिली हेदेखील अभिमानाने उभे दिसतात. सिडनीतील क्रिकेट मैदानाजवळ फ्रेड स्पोफोर्थ, रिची बेनॉ, स्टीव्ह वॉ आणि मायकेल क्लार्कही उभे आहेत. ऑस्ट्रेलियातील या प्रसिद्ध मैदानांजवळ क्रिकेटेतर खेळाडूंचे पुतळेही उभे आहेत. न्यूझीलंडमधील ऑकलंड येथील ईडन पार्क मैदान. तेथे क्रिकेट आणि रग्बी हे दोन्ही खेळले जाते. तिथे पहिला पुतळा उभा राहिला, मायकेल जोन्स याचा. क्रिकेटप्रेमींना हे नाव ठाऊक नसावे. कारण तो रग्बी खेळायचा. पण त्याचाच पुतळा पहिला का? तर पहिल्या रग्बी विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंडतर्फे पहिला गोल (ट्राय) त्याने झळकवला, म्हणून! आपल्याकडे क्रिकेटच्या मैदानांजवळ क्रिकेटपटूंचे पुतळे उभारण्याची पद्धत प्रचलित नाही. पुण्यात प्रा. दि. ब. देवधर किंवा विशाखापट्टणम येथे कर्नल सी. के. नायडू असे काही मोजके आणि सन्माननीय अपवाद. जेटली यांनी केवळ चमचेगिरी आणि खुशमस्करेगिरी करणाऱ्यांचे वर्तुळ वाढवले, हा बेदी यांचा आक्षेप पूर्वीपासून होता. आज जेटली या जगात नाहीत, त्यामुळे त्यांनी दिल्ली क्रिकेट संघटनेसाठी काय केले याची चर्चा करणे येथे अप्रस्तुत ठरते. परंतु ही पुतळे संस्कृती कुठवर जाईल, याची चुणूक दिल्ली क्रिकेट संघटनेने नक्कीच दाखवून दिली आहे आणि म्हणून बेदींच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहावे लागते.

ज्या प्रवेशद्वाराच्या आत जेटली यांचा पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे, त्या प्रवेशद्वाराचे नाव वीरेंदर सेहवाग प्रवेशद्वार. परवा भारताचा ज्येष्ठ कसोटीपटू इशांत शर्मा त्या प्रवेशद्वारातून आत जाऊ लागला, त्या वेळी त्याला बाहेरच अडवण्यात आले आणि ‘दुसरीकडून आत या’ असे सांगितले गेले! अशा पद्धतीची संस्कृती देशात सर्वत्र फोफावू लागली आहे. जेटली यांचे नाव कोटला मैदानाला दिले गेले, तरी राजकारणी किंवा प्रशासकांची नावे मैदानांना दिली जाणे यात नवीन काही नाही. आपल्या देशात काही मोठय़ा मैदानांना क्रिकेट प्रशासकांची नावेही दिली गेली आहेत. उदा. मुंबईतील वानखेडे, चेन्नईतील चिदम्बरम, बेंगळूरुतील चिन्नास्वामी किंवा चंडीगड-मोहाली येथील बिंद्रा स्टेडियम. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची नावे तर किती तरी आढळतील. क्रिकेटपटूंची नावे मात्र प्रेक्षकांचे बसण्याचे स्टॅण्ड किंवा प्रवेशद्वारे यांच्यापुरतीच मर्यादित दिसतात. इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्याप्रमाणे प्रसिद्ध क्रिकेटपटूंचे, त्यांच्या सुपरिचित मुद्रेतील पुतळे उभारण्याचे आम्हाला का सुचू शकत नाही? गावस्करांचा स्ट्रेट ड्राइव्ह, सचिनचा कव्हर ड्राइव्ह, कपिल यांचा ‘नटराज’ मुद्रेतील फटका, विश्वनाथ यांचा स्क्वेअर कट, बेदी यांची गोलंदाजी करतानाची एखादी मुद्रा.. ही यादी किती तरी मोठी होऊ शकते. ऑकलंडच्या मैदानाबाहेर मायकेल जोन्स याचा पुतळा झेपावणाऱ्या अवस्थेतील आहे. आमच्याकडे मातब्बर क्रिकेटपटू किंवा क्रीडापटूंची उणीव नाही. पण खेळ आणि क्रिकेट प्रशासनाला खुशमस्करेगिरीची वाळवी लागली, सौंदर्यदृष्टीचा पूर्णपणे अभाव असला, की मग खेळाच्या मैदानावर खेळाडू सोडून बाकीच्यांचेच पुतळे आता सर्वत्र दिसू लागतील! क्रिकेट आणि क्रिकेटपटूंच्या बाबतीत राजकारणी मंडळींचा प्रतिपाळभाव वाढायला दोनेक दशकांपूर्वीपासून सुरुवात झालेलीच आहे. पूर्वी सरंजामदार क्रिकेटचे पालक असायचे, आता राजकारणी मंडळी असतात, हाच काय तो फरक.

फिरोजशहा कोटला मैदानातील एका स्टॅण्डवर बिशनसिंग बेदी यांचे नाव आजही दिमाखाने झळकत आहे. बेदींनी त्यांचा हेका सोडला नाही, तर त्या मैदानातून बेदी हद्दपार होतील आणि जेटली प्रस्थापित होतील! ही घडामोड म्हणजे प्रतीकात्मकता नसून ‘नवनित्य’ वास्तव आहे हे स्वीकारण्यावाचून दुसरा पर्याय आपल्या हातात नाही. इशांत शर्माला सांगितले, तसे इतरही मातब्बर क्रिकेटपटूंना मुख्य नव्हे, तर आडदरवाजातून मैदानात यावे लागेल. हे व्हायचे नसेल, तर बेदींच्या पत्राचा गांभीर्याने विचार करावाच लागेल.