News Flash

आधी कष्ट, मग फळ..

पक्षाच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करायला हवा, असे राहुल गांधी या पत्रात म्हणतात.

राहुल गांधी

‘अनेक मुद्दय़ांवर लढताना मी बऱ्याचदा एकटाच होतो,’ असे राहुल गांधी राजीनामा-पत्रात म्हणतात; त्याचा समाचार घेणे आवश्यक ठरते..

जी गोष्ट वा क्रिया करणे कधी शिकवले गेलेच नसेल तर ती गोष्ट वा क्रिया एखाद्या वा अनेक व्यक्तींकडून अपेक्षिणे हे अपेक्षाभंगास निमंत्रण देणारे असते. राहुल गांधी यांना सध्या या अपेक्षाभंगाचा जिवंत अनुभव येत असणार. त्यांनी प्रसृत केलेल्या चारपानी राजीनामापत्रास या अपेक्षाभंगाचा वास येतो. तथापि या अपेक्षाभंगास राहुल गांधी ज्या घराण्यात जन्मास आले त्याच्या किमान गेल्या दोन पिढय़ा जबाबदार आहेत याकडे डोळेझाक करता येणार नाही. गांधी यांच्या पत्रात ज्याप्रमाणे अपेक्षाभंग दिसतो त्याचप्रमाणे त्रागाही दिसून येतो. ताज्या निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी राहुल गांधी आपल्या शिरावर घेतात, ही बाब योग्यच. पक्षाध्यक्ष या नात्याने त्यांचे ते कर्तव्यच ठरते. या संदर्भात त्यांनी याआधी भाष्य केलेच होते. त्यामुळे पत्रातील या मुद्दय़ात नवीन काही नाही.

नवीन आहे तो अपेक्षाभंग. ‘अनेक मुद्दय़ांवर लढताना मी बऱ्याचदा एकटाच होतो,’ असे राहुल गांधी या पत्रात म्हणतात. त्याचा समाचार घेणे आवश्यक ठरते. याचे कारण अलीकडच्या काळात कोणत्या काँग्रेसाध्यक्षाने आपल्या सहकाऱ्यांचे काही ऐकले आहे? किंबहुना आपल्या पक्षाध्यक्षाच्या कानास जे मधुर वाटेल त्याखेरीज त्यास अन्य काही सांगण्याचे धर्य अंगी असलेले किती काँग्रेसजन सध्या हयात आहेत? असतील तर त्यांचा किती उपयोग गांधी यांनी आपल्या अध्यक्षीय काळात करून घेतला? ते हयात नसतील तर ते का नाहीसे झाले? एके काळी आपले पणजोबा पं. जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या तोंडावर चार बोल सुनावणारे नेते आपल्या पक्षात होते, हे राहुल गांधी यांना ठाऊक असेल. पुढे आपल्या पक्षीयांचा पाठीचा कणा नाहीसा का होत गेला, असा प्रश्न राहुल गांधी यांना पडला नसेल? डार्वनिचा उत्क्रांतिवाद सांगतो की एखाद्या अवयवाचा उपयोग करणे थांबले की काळाच्या ओघात नंतरच्या पिढय़ांतून तो अवयव नाहीसा होतो. तेव्हा आपल्या पक्षबांधवांतून हा कणा नाहीसा झाला आहे काय, हे तपासण्याचे कष्ट राहुल गांधी यांनी कधी घेतले काय? ते तसे घेतले गेले असते तर अनेक मुद्दय़ांवर आपणास एकटे राहावे लागले नसते हे त्यांना उमगले असते.

आता ते आपल्यानंतरचा अध्यक्ष काँग्रेसजनांनी स्वत:हून निवडावा असे सांगतात. त्यांचा सल्ला योग्यच. पण ते पाळण्यासाठीची किमान तयारी काँग्रेसजनांची आहे काय, हे त्यांनी आधी तपासायला हवे. याचे कारण असे की या अशा स्वतंत्र बाण्याच्या अध्यक्षाबाबत काँग्रेसचा इतिहास अभिमान बाळगावा असा नाही. तो तपासून पाहण्यासाठी निजलिंगप्पा वगरेंपर्यंत मागे जाण्याची गरज नाही. राहुल गांधी यांनी आपल्या मातोश्रींच्या काळात काय घडले ते पाहिले तरी पुरे. सोनियांच्या इच्छेविरोधात पंतप्रधानपदी नरसिंह राव असताना पक्षाध्यक्षपद सांभाळणारे सीताराम केसरी यांना किती तारेवरची कसरत करावी लागली, हे सर्वश्रुत आहे. त्या वेळी दिवंगत राजीव गांधी यांचे निष्ठावान सतीश शर्मा आदी गणंग राव आणि केसरी यांच्या विरोधात काय उचापती करीत ते राहुल गांधी यांनी जाणून घ्यावे. म्हणजे त्यांना पक्षाध्यक्षपदासाठी कोणी का पुढे येत नाही, ते कळेल.

याचे कारण आपणास खरे, सर्व अधिकारांसह असे अध्यक्षपद मिळणार आहे की केवळ नामधारी याचा अंदाजच तूर्त काँग्रेसजनांस नाही. अध्यक्षपद स्वीकारायचे आणि सर्व काही राहुल, प्रियंका यांना काय वाटेल याचा विचार करत करत वागायचे हे अद्याप स्पष्ट नाही. त्यापेक्षा ‘.. आगे बढो हम तुम्हारे साथ है,’ अशी  घोषणा देणे सोपे असते, हे समस्त काँग्रेसजनांना कळून चुकलेले आहे. तसे केल्याने आपणास काही निर्णय घ्यावा लागत नाही. सारे श्रेय जो कोणी मध्यवर्ती गांधी आहे त्यास दिले की झाले, हे ते जाणतात. तेव्हा सुखातला जीव दु:खात टाकाच कशाला असा विचार काँग्रेसजनांनी केल्यास त्यांना दोष देता येणार नाही.

तो अशासाठी की लोकशाही हे मूल्य असून ते धर्माधता, आळस, कामचुकारपणा, लबाडी यांसारखे आपोआप वा सहज अंगी बाणवले जात नाही. दैनंदिन व्यायामाच्या सवयीप्रमाणे लोकशाहीचीदेखील प्रयत्नपूर्वक सवय करावी लागते. ती; राजकीय पातळीवर अलीकडे नामशेष झालेले समाजवादी आणि त्याच मार्गावर असलेले डावे सोडले तर अन्य कोणत्याही पक्षांस नाही. पण समाजवादी आणि डावे यांचे जे काही झाले त्याचा परिणाम एकंदरच राजकारणावर झाला. तो असा की मतभिन्नता हा जणू जीवघेणा आजार आहे, असेच सर्व राजकीय पक्ष मानू लागले. सर्वच राजकीय पक्षांनी या आजारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मतभिन्नतेस चार हात दूरच ठेवले. त्यामुळे काँग्रेसजनांस या मतभिन्नतेची आणि एकंदरच पक्षांतर्गत लोकशाहीची सवय नसावी यात आश्चर्य काही नाही. काँग्रेसपुरती ती राहुल गांधी यांच्या आजींची पुण्याई. आपणास आव्हान देऊ शकतील अशी झाडे वाढूच द्यायची नाहीत, हा त्यांचा खाक्या. त्यामुळे काँग्रेसमध्ये फक्त होयबांची भाऊगर्दी होत गेली. ज्यांना होयबा होणे जमले नाही आणि काँग्रेसही सोडवली नाही, ते तोंड दाबून गप्प बसले. सत्तेची सद्दी होती तोपर्यंत काँग्रेस नेतृत्वास त्यांची आठवण झाली नाही. आता ती झाली. कारण बराच काळ सत्तेशिवाय राहायची वेळ आली. तथापि सावरण्याची संधी कायमचीच हातून गेलेली नाही.

पक्षाच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करायला हवा, असे राहुल गांधी या पत्रात म्हणतात. तो करण्याचे पुण्यकर्म राहुल यांनी करावेच. त्याची सुरुवात खराखुरा, स्वतंत्र अध्यक्ष निवडून करावी. म्हणजे हा अध्यक्ष नामधारी, त्या खुर्चीतील धुगधुग राहुल वा प्रियंका आसनस्थ होईपर्यंत कायम ठेवण्यापुरताच नसावा. तसे करायचे असेल तर मल्लिकार्जुन खरगे, सुशीलकुमार शिंदे अशा वयोवृद्धांहाती अध्यक्षपद देऊ नये. अशा वृद्धांचे काय करायचे असते ते भाजपने दाखवून दिले आहे. निदान याबाबत तरी काँग्रेसने भाजपचे अनुकरण करण्यास हरकत नाही. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमिरदर सिंग, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट अशा कोणाहाती अध्यक्षपदाची सूत्रे द्यावीत. या तिघांत सिंग हे वडीलधारी खरे. पण देशातील मोदी लाट रोखण्याची कामगिरी त्यांच्या खाती नोंदलेली आहे. खेरीज या जबाबदारीसाठी आवश्यक ती रगदेखील पुरेशा प्रमाणात- कदाचित जास्तच- त्यांच्या अंगी आहे. ज्योतिरादित्य, पायलट तरुण आहेत. अशांहाती पक्ष देणे म्हणजे भविष्यास साद घालणे.

ती घालून राहुल यांनी पक्षप्रचारास स्वत:ला वाहून घ्यावे. कोणास आवडो वा न आवडो; गांधी घराण्याची म्हणून काही एक पुण्याई देशात अजूनही आहे. ती वाया न घालवता राहुल गांधी यांनी कामी आणावी. याचाच एक भाग म्हणून शरद पवार यांच्यासारख्या जास्तीत जास्त माजी काँग्रेसजनांना जोडून घेण्याचा प्रयत्न करावा. जे झाले ते झाले. त्याबाबत आता आणखी त्रागा करून काहीही होणारे नाही. पण त्याची पुनरावृत्ती मात्र त्यांना निश्चितच टाळता येईल. या देशात मध्यममार्गी आणि प्रामाणिक निधर्मी विचार अजूनही जिवंत आहे. त्या विचारधारेच्या पुनस्र्थापनेसाठी कष्टाची मात्र गरज आहे. लोकशाहीप्रमाणेच ही मूल्येदेखील बिंबवण्यासाठी कष्ट करावे लागतात. ते राहुल यांनी करावेच. आधी कष्ट मग फळ, कष्टची नाही ते निर्फळ.. हे चिरंतन सत्य राजकीय पक्षांनाही लागू पडते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 1:01 am

Web Title: loksatta editorial on rahul gandhi resignation as congress president zws 70
Next Stories
1 विशेष संपादकीय : बोलाचीच वृद्धी, बोलाचाच मार्ग..
2 आजारनिर्मिती
3 भिंत खचली, कलथून खांब गेला ..
Just Now!
X