मोदी सरकार दाऊद इब्राहिमला ठार मारण्यासाठी गोपनीय कारवाईचा विचार करीत आहे. सरकारसमर्थकांच्याच नव्हे तर सर्वच भारतीयांच्या मनाला सुखावणारी अशी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. आता अशा गोपनीय कारवायांची कोणी जाहीर वाच्यता करीत नसते. परंतु ‘इंडिया टुडे’चे व्यवस्थापकीय संपादक आणि ‘आज तक’चे ज्येष्ठ पत्रकार राहुल कँवल यांचे कौशल्य असे की त्यांच्या ‘सीधी बात’ कार्यक्रमात केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी ही माहितीही प्रसारित केली. ही मोठीच बातमी – दूरचित्रवाणीच्या भाषेत ब्रेकिंग न्यूज- होती. त्यामुळे राहुल कँवल यांनी तातडीने आपल्या ट्विटर खात्यातूनही तिची जाहिरात केली. मोदी सरकारमधील एक मंत्री पहिल्यांदाच उघडपणे असे बोलत आहे आणि तेही आपल्या कार्यक्रमातून म्हटल्यावर राहुल यांचा आनंद गगनात मावेनासा होणे स्वाभाविकच होते. त्या आनंदाला आणखी एक किनार होती. ती म्हणजे राहुल यांच्या मोदीप्रेमाची. माध्यमांचे काम हे विरोधी पक्षाचे असते. त्यांनी सरकारच्या प्रेमात पडून चालत नसते. परंतु राहुल यांचे सरकारप्रेम गेल्या दोन वर्षांत वारंवार दिसले आहे. त्यामुळेच मोदी सरकार दाऊद आणि हाफिज सईद या भारतरिपूंच्या विरोधात काही तरी करीत आहे हे सांगण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. राठोड यांची मुलाखत हा त्याचा एक भाग होता. वस्तुत: या मुलाखतीचा विषय होता सनिकांसाठीची एक श्रेणी-एक निवृत्तयोजना. तेथे दाऊद वा हाफिजविरोधातील कारवाईबद्दल विचारणे चूक होते. तरीही राहुल यांनी सवाल केलाच की, मणिपूरसारखी कारवाई आपण दाऊदच्या विरोधात का करीत नाही? त्यावर राठोड काय बोलले? ते म्हणाले, ‘‘हो सकता है, करें. लेकिन करने से पहले चर्चा नही होगी. करने के बाद हो सकता है, हो जाए. हो सकता है, ना भी हो.. ये (गोपनीय वा खास कारवाई) सरकार का निर्णय है. हो सकता है, अभी हो रही हो. हो सकता है, नही हो रही हो.’’ म्हणजे राठोड यांनी यात कुठेही सरकार अशा कारवाईचा विचार करीत आहे असे म्हटलेले नाही. अशा प्रश्नांवर कोणता मंत्री म्हणेल की आम्ही देशाच्या दुश्मनांना ‘गार करण्या’साठी (व्यावहारिक भाषेत ठार मारण्यासाठी) तयार नसतो? राठोड हे काही संरक्षणमंत्री वा गृहमंत्री नाहीत. तेव्हा त्यांचे वक्तव्य अधिकृतही मानता येणार नाही. तरीही राहुल यांनी, सरकारचा जणू गोपनीय कारवाईचा विचार सुरू आहे अशा बातम्या पेरल्या. जे आपल्याला हवे तेच समोरच्याकडून वदवून घ्यायचे किंवा त्याच्या विधानांचा विपर्यास करायचा, ही सनसनाटी पत्रकारिता झाली. राठोड यांच्या मुलाखतीची चित्रफीत उपलब्ध आहे. खुद्द राठोड यांनी आपण तसे म्हणालो नसल्याची ट्विप्पणी केली आहे. तरीही हे घडले. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनीही असेच केले होते. सलमान मुस्लीम असल्याने त्याच्यावर टीका होते, असे विधान सलीम खान यांनी केल्याचे त्यांनी म्हटले होते. तेथेही सलीम खान यांच्या वक्तव्याचा आपणास हवा तो अर्थ काढण्यात आला होता. हे केवळ सनसनाटीपणाच्या हव्यासातून होते, असे म्हणणे हा बालिशपणा होईल. पत्रकारांच्या एकूणच हेतूंबद्दल शंका यावी अशीच ही प्रकरणे सातत्याने घडताना दिसत आहेत. माध्यमवीरच माध्यमांच्या विश्वासार्हतेचे वैरी ठरणे, हे अधिक भयंकर आहे.