मुंबई : अ‍ॅमेझॉन इंडियाने मुंबईतील चार रेल्वे स्थानकांवर तिची वितरण प्रणाली मजबूत करणारी पिकअप केंद्रे सुरू केली आहेत. त्यासाठी कंपनीने भारतीय रेल्वेशी सहयोग केला आहे.

दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या उपनगरी रेल्वेच्या जाळ्याचा वापर करून अ‍ॅमेझॉन ग्राहकांना त्यांनी मागणी नोंदविलेल्या वस्तू रेल्वे स्थानकावरच जलद व सोयीस्कररीत्या मिळविण्याची सोय यातून होणार आहे. अ‍ॅमेझॉन ई-पेठेवर सणोत्सवानिमित्त खरेदी वाढणे अपेक्षित आहे, परंतु अ‍ॅमेझॉनच्या वस्तू पोहचत्या करण्याच्या सूचीत ग्राहकांचा पत्ता स्वीकारला जात नसल्याने अनेकांचा हिरमोड होतो, अशा लोकांना रेल्वे स्थानकांवर पसंतीच्या वस्तू मिळविता येतील.

सुरुवातीला सीएसटीएम, ठाणे, दादर व कल्याण या स्थानकांवरील पादचारी पुलांवर हा उपक्रम राबवण्यात येईल आणि नंतर देशभरात तो राबविण्याची उभयतांची योजना आहे. अ‍ॅमेझॉनवर खरेदी करतेवेळी ग्राहक ऑर्डरच्या चेकआऊट पेजवर पिक-अपचे ठिकाण म्हणून या केंद्रांची निवड करू शकतील.

‘फ्लिपकार्ट’चा विक्री उत्सव २९ सप्टेंबरपासून

मुंबई : आघाडीची ई-पेठ फ्लिपकार्टने सणासुदीत ग्राहकांना सवलतीच्या वस्तू खरेदी करता याव्यात, यासाठी २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत ‘द बिग बिलियन डेज’ या विक्री उत्सवाची घोषणा केली आहे. लाखो विक्रेते आणि कारागिरांकडून ग्राहकांसाठी मोठय़ा सवलती, शिवाय अ‍ॅक्सिस बँक डेबिट व क्रेडिट कार्डधारक आणि आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डधारकांना खरेदीवर विशेष सवलती यातून मिळविता येतील. सुलभ व जलद वितरणासाठी देशभरातील ३० हजार किराणा विक्रेत्यांशी फ्लिपकार्टने या निमित्ताने भागीदारी केली आहे.