लाइफबॉय, लक्स, डव्ह साबण स्वस्त

मुंबई : ग्राहकांकडून मागणी नसल्याने ्रग्राहकोपयोगी उत्पादन निर्मिती समूह हिंदुस्थान युनिलिव्हरने त्याच्या काही उत्पादनांच्या किंमती कमी केल्या आहेत. यानुसार कंपनीचे लाइफबॉय, लक्स, डव्ह या साबणांच्या किमती ३० टक्क्यांपर्यंत कमी झाल्या आहेत.

पीअर्स, आयुष आदी साबणही हिंदुस्थान युनिलिव्हरमार्फत तयार केले जातात. कंपनीने जुलैमध्येही काही निवडक साबणांच्या किमती काही प्रमाणात कमी केल्या होत्या. कच्चा मालाचे दर कमी असल्याने कंपनीला उत्पादनांच्या किमती कमी करता आल्या आहेत.

भारतातील साबण बाजारपेठ २०,९६० कोटी रुपयांची आहे. देशात विकल्या जाणाऱ्या साबणांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हरच्या लक्स व लाइफबॉय या नाममुद्रा अव्वल स्थानी आहेत. या दोन्ही साबणांसह प्रीमियम गटातील डव्ह साबणाच्या किंमतीही कंपनीने कमी केल्या आहेत.

याचबरोबर हिंदुस्थान युनिलिव्हरने फेअर अ‍ॅण्ड लव्हली, पाँड्स, पीअर्स आणि डव्ह आदी नाममुद्रांची फेस वॉश उत्पादने मात्र महाग केली आहेत. त्यांच्या किमती ४ ते १४ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.

हिंदुस्थान युनिलिव्हरची या गटात आयटीसी, विप्रो, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सबरोबर स्पर्धा आहे. समूहाला जवळपास निम्मा महसूल तिच्या सौंदर्यप्रसाधने व व्यक्तिगत आरोग्यनिगा उत्पादन विक्रीतून मिळतो.