भारताची नोव्हेंबरमधील निर्यात सलग १२ महिन्यांत उतरती राहिली आहे. गेल्या महिन्यातील देशाची निर्यात २४.४३ टक्क्यांनी कमी होऊन २०.०१ अब्ज डॉलरवर आली आहे. तर आयातीत ३०.२६ टक्के घट होऊन ती २९.७९ अब्ज डॉलर राहिली आहे. परिणामी, आयात – निर्यातीतील दरी समजली जाणारी व्यापार तूट नोव्हेंबरमध्ये मासिक तुलनेत किरकोळ वाढून ९.७८ अब्ज डॉलर झाली आहे.
वाणिज्य खात्याने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते नोव्हेंबर या चालू आर्थिक वर्षांतील आठ महिन्यांत देशाची व्यापार तूट ८७.५४ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. वर्षभरापूर्वी याच दरम्यान ती १०२.५० अब्ज डॉलर होती. पेट्रोलियम उत्पादने, अभियांत्रिकी वस्तू, तांदूळ, रत्न व दागिने यांची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर रोडावल्याने निर्यात कमी झाली आहे. तर गेल्या महिन्यात सोन्याची आयात ३६.४८ टक्क्यांनी कमी होऊन ती ३.५३ अब्ज डॉलपर्यंत आली आहे.नोव्हेंबरमधील देशाची व्यापार तूट किरकोळ वाढली.