यंदाच्या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि पगारदारांच्या पदरी प्रत्यक्ष काही पडले नसले, तरी अर्थसंकल्पातील वृद्धीपूरक तरतुदींना ध्यानात घेत रिझव्र्ह बँकेने सामान्य कर्जदार ग्राहकांना मात्र व्याजदरात कपातीचा नजराणा बहाल करून रंगोत्सव साजरा केला आहे. बँकांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज आणि अन्य ग्राहक कर्जाचे व्याजाचे दर कमी केले जातील, अशा पद्धतीने रेपो दरात पाव टक्क्य़ांची कपात करणारा सुखद निर्णय रिझव्र्ह बँकेने बुधवारी सकाळी जाहीर केला. मात्र बँका ताबडतोब कर्जाचे व्याजदर कमी करतील, याबद्दल खुद्द गव्हर्नर राजन यांनीच साशंकता व्यक्त केली आहे. रिझव्र्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा पाव टक्क्य़ांची दरकपात केली आहे.
बँकांना अल्पमुदतीसाठी वितरित केल्या जाणाऱ्या कर्जाचे दर अर्थात रेपो दर पाव टक्क्य़ांनी कमी करून ७.५० टक्क्य़ांवर आणत असल्याचे रिझव्र्ह बँकेने बुधवारी जाहीर केले. गेल्या काही महिन्यांपासून घसरलेला महागाई दर आणि अर्थसंकल्पातून मिळालेले वित्तीय तुटीवर नियंत्रणाचे ठोस दिशानिर्देश अशी कारणे रिझव्र्ह बँकेने त्यासाठी दिली. मात्र, रेपो दर कपातीचा लाभ सामान्य कर्जदारांपर्यंत बँका लगोलग मिळणार नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात व्याजदर कपातीसाठी एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. व्याजदर कपातीसंबंधाने प्रत्यक्षात निर्णय एप्रिलमध्येच होण्याचे संकेत बँकांकडूनही देण्यात आले. त्यामुळे एप्रिलपासून, कर्जाचे हप्ते काहीसे हलके होतील, अशी शक्यता आहे.
शेअर बाजारात धुळवड ..११
व्याजाचे दर वाढविताना बँका जी घाई करतात तशी कमी करताना दाखवीत नाहीत. त्यामुळे व्याजदर कपातीसाठी एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
– रघुराम राजन,
गव्हर्नर, रिझव्र्ह बँक
कोणत्याही नियामकास पंगू करणे हाच कोणत्याही सरकारचा हेतू असतो. आता रिझव्र्ह बँकेची पाळी असल्याचे मत लोकसत्ताने ‘पांगळेपणाचे डोहाळे’ या संपादकीयामध्ये बुधवारीच (ता. ४) मांडले होते. त्यानंतर काही तासांतच रिझव्र्ह बँकेने रेपो रेट कमी केल्याचे वृत्त आले.
‘सेन्सेक्स’ची तीस हजारी उसळी
रिझव्र्ह बँकेच्या रेपो दरात कपातीच्या घोषणेने, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ व्यवहाराच्या प्रारंभीच अभूतपूर्व ३०,०००ची झेप घेतली. निफ्टीने ९१०० अशा सार्वकालिक उच्चांकाला गवसणी घातली. अर्थसंकल्पानंतर सलग चौथ्या दिवशी अपवादाने दिसून आलेली निर्देशांकांची घोडदौड मात्र दिवसाच्या व्यवहारात तग धरू शकली नाही. वरच्या स्तरावर समभाग विकून नफा गाठीशी बांधण्याचा सपाटा बाजाराच्या उत्तरार्धातील व्यवहारात सुरू झाला आणि दोन्ही निर्देशांक त्यांच्या ऐतिहासिक उंचीवरून झपाटय़ाने ओसरेल. सेन्सेक्स त्याच्या दिवसातील उच्चांकावरून ४९९ अंश खाली म्हणजे, २१३ अंशांच्या घसरणीसह स्थिरावला.
व्याजाचे दर वाढविताना बँका जी घाई करतात तशी कमी करताना दाखवीत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षात व्याजदर कपातीसाठी एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
– रघुराम राजन,
गव्हर्नर, रिझव्र्ह बँक