आरटीजीएस, एनईएफटी तसेच आयएमपीएस शुल्कांमध्ये कपात

मुंबई : स्टेट बँकेच्या रोकडरहित निधी हस्तांतरण व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. देशातील सर्वात मोठय़ा बँकेने आरटीजीएस, एनईएफटी तसेच आयएमपीएस या निधी हस्तांतरण सुविधांसाठी शुल्क कमी केले आहेत.

आरटीजीएस व एनईएफटीमार्फत होणाऱ्या व्यवहारांवरील शुल्क कपातीचा लाभ १ जुलैपासून तर आयएमपीएस मार्फत होणाऱ्या आंतरबँक निधी हस्तांतरण व्यवहारावरील शुल्क कपात येत्या १ ऑगस्टपासून लागू होणार आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या मूल्याचे हस्तांतरण व्यवहार एनईएफटीद्वारे होतात. तर त्यापेक्षा अधिक मूल्याकरिता आरटीजीएस हा पर्याय आहे.

स्टेट बँकेने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन म्हणून हे पाऊल टाकले असून, प्रत्यक्ष शाखेत जाऊन करणाऱ्या व्यवहारांसाठी मात्र स्वंतत्र शुल्करचना निश्चित केली आहे. इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग तसेच योनो अ‍ॅपचा वापर करून होणारे व्यवहार नि:शुल्क करण्यात आले आहेत. तर शाखांमध्ये जाऊन केल्या जाणाऱ्या आरटीजीएस व एनईएफटी शुल्कांमध्ये बदल करण्यात आले आहेत. खातेसंलग्न बँक शाखेमध्ये २५,००१ रुपयांवरील निधी हस्तांतरणासाठी शुल्क वाढविण्यात आले आहे. तर २५,००१ रुपयांपासून तसेच १,००,००१ ते २,००,००० रुपये व्यवहारांसाठीचे शुल्क २० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत.

स्टेट बँकेचे ६ कोटींहून अधिक ग्राहक इंटरनेट बँकिंग वापरत असून १.४१ कोटी मोबाइल बँकिंग ग्राहक आहेत. पैकी एक कोटी ग्राहक हे योनो मोबाइल अ‍ॅपधारक आहेत. मोबाइल बँकिंग व्यवहारात स्टेट बँकेचा १८ टक्के हिस्सा आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेच्या २२,०१० शाखा असून ५८,००० हून अधिक एटीएम आहेत.

आरटीजीएस, एनईएफटीद्वारे होणाऱ्या निधी हस्तांतरणावर शुल्कमाफीची घोषणा रिझव्‍‌र्ह बँकेकडून जूनमध्ये पतधोरण आढावा बैठकीनंतर करण्यात आली होती. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही अर्थसंकल्प मांडताना रोकडरहित व्यवहारांसाठी प्रोत्साहन म्हणून या रिझव्‍‌र्ह बँकेच्या या घोषणेचा पुनरूच्चार केला होता