अमेरिका आणि चीनमध्ये मागच्या काही महिन्यांपासून सुरु असलेले व्यापार युद्ध संपुष्टात येण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे सोमवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकाने मोठी झेप घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स नव्या उच्चांकावर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकानेही नवी उंची गाठली. सेन्सेक्स ५२९.४२ अंकांनी उसळून ४०८८९.२३ अंकांवर बंद झाला.  निफ्टी १५९.४० अंकांनी वधारुन १२०७३.८० अंकांवर बंद झाला.

दिवसभराच्या ट्रेडिगच्या काळात सेन्सेक्सने ४०,९३१.७१ अंकांपर्यंत उसळी घेतली होती. मात्र त्यानंतर झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे तो काहीसा खाली आला. तरीही सेन्सेक्सने आपला सर्वकालीन उच्चांक कायम ठेवला आहे.

आजच्या दिवसभराच्या व्यवहारात निर्देशांक ५०० पेक्षा जास्त अंकांनी तर निफ्टी १५० अंकांनी वधारला. एचडीएफसी, भारती एअरटेल, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या दरात वाढ झाली.

अमेरिका आणि चीन या जगातील दोन मोठया अर्थव्यवस्थांमध्ये वर्षअखेरीस व्यापार करार होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी दोन्ही देशांमध्ये वर्ष अखेरीस व्यापार करार होईल, असा अंदाज व्यक्त केला.