सेन्सेक्समध्ये सलग सहावी सत्रआपटी; मुंबई निर्देशांक सप्ताहारंभी ३७,५०० वर

मुंबई : देशातील बँक, वित्त, गैर बँकिंग वित्त, गृह वित्त कंपन्यांमधील अर्थचिंता सप्ताहारंभीही कायम राहिली. आठवडय़ाच्या पहिल्या सत्रातही भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक घसरते राहिले. गुंतवणूकदारांच्या नफेखोरीच्या शेवटच्या तासाभरातील वाढत्या दबावाने सेन्सेक्ससह निफ्टीने सलग सहावी निर्देशांक आपटी नोंदविली. परिणामी मुंबई शेअर बाजाराचे या सहा व्यवहारात ६.२१ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

मुंबई शेअर बाजारात सहा व्यवहारांपासून निर्देशांक घसरण सुरू आहे. सोमवारी सेन्सेक्स १४१.३३ अंश घसरणीसह ३७,५३१.९८ वर येऊन ठेपला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४८.३५ अंश घसरणीने ११,१२६.४० पर्यंत स्थिरावला. सत्रात सेन्सेक्स ३८ हजाराच्या काठावर होता. तर ३७,४८०.५३ हा सत्रतळ राहिला.

निफ्टीतील ५० पैकी ३२ तर सेन्सेक्समधील ३० पैकी २४ समभागांचे मूल्य निर्देशांकांच्या घसरणीतील यादीत राहिले.

भांडवली बाजारात सप्ताहारंभी बँक, वित्तसह माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण क्षेत्रावर अखेरच्या क्षणी विक्री दबाव नोंदला गेला. आरोग्यनिगा, तेल व वायू, भांडवली वस्तू, पोलाद, स्थावर मालमत्ता, ऊर्जा, वाहन आदी क्षेत्रीय निर्देशांक २.५० टक्क्य़ांपर्यंत घसरले.

सेन्सेक्समध्ये ओएनजीसी, आयटीसी, टाटा स्टील, महिंद्र अँड महिंद्र, टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो, टीसीएस, सन फार्मा, एनटीपीसी, इंडसइंड बँक, टेक महिंद्र आदी ३ टक्क्य़ांपर्यंत घसरले. औषधनिर्माण क्षेत्रातील ऑरबिंदो फार्मा, ग्लेनमार्क, ल्युपिन आदींना तब्बल १९ टक्क्य़ांपर्यंत समभागमूल्य आपटीला सामोरे जावे लागेल.

तर नवीन गुंतवणुकीच्या घोषणेमुळे येस बँकेचा समभाग गेल्या काही सलग सत्रातील घसरणीनंतर सोमवारी ८ टक्क्य़ांपर्यंत झेपावला. त्याचबरोबर मुंबई निर्देशांकातील अ‍ॅक्सिस बँक, बजाज ऑटो, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, हीरो मोटोकॉर्प, बजाज फायनान्स आदी २.५३ टक्क्य़ांपर्यंत वाढले.

रुपया ७१ च्या तळात

डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलनाचे मूल्य ७१ पर्यंत खाली आले. येथील परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरसमोर रुपया सोमवारी १४ पैशांनी घसरत ७१.०२ वर स्थिरावला. दरम्यान, सराफा बाजारात मौल्यवान धातूचे दर आठवडय़ाच्या पहिल्या व्यवहारात घसरले. स्टॅण्डर्ड सोन्याचे दर तोळ्यासाठी ६५ रुपयांनी रोडावत ३८,०५० रुपयांवर स्थिरावले. तर चांदीचा किलोचा भाव २७५ रुपयांनी कमी होत ४४,८५० रुपयांपर्यंत येऊन थांबला.