म्युच्युअल फंड उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अॅम्फी)’ने निवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेले विद्यमान मुख्याधिकारी एच. एन. सिनोर यांच्या वारसदाराच्या शोधासाठी तीनसदस्यीय निवड समितीच्या स्थापनेचा निर्णय गुरुवारी जाहीर केला.
सिनोर यांचा नियोजित कार्यकाळ येत्या सप्टेंबरमध्ये संपुष्टात येत आहे. २०१० सालात तत्कालीन मुख्याधिकारी ए. पी. कुरियन यांच्या निवृत्तीनंतर सिनोर यांच्याकडे अॅम्फीचे म्होरकेपद आले. वस्तुत: डिसेंबर २०१४ मध्ये त्यांच्या पदाची मुदत संपली होती, परंतु पात्र उमेदवार मिळत नसल्याने त्यांनाच सप्टेंबपर्यंत सेवाकाळ वाढवून देणाऱ्या पुनर्नियुक्तीची घोषणा अॅम्फीने केली.
नवीन मुख्याधिकाऱ्याच्या शोधासाठी बनविल्या गेलेल्या निवड समितीत रिलायन्स म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी संदीप सिक्का, एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद बर्वे आणि बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे मुख्याधिकारी ए. बालासुब्रह्मण्यन या तिघांचा समावेश आहे. अॅम्फीच्या सप्टेंबरमध्ये होत असलेल्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत नव्या मुख्याधिकाऱ्याच्या नावाची घोषणा करून, त्यावर सभेत शिक्कामोर्तब घेतले जाणे आवश्यक आहे. तोपर्यंत सुयोग्य उमेदवाराच्या निवड व नियुक्तीची प्रक्रिया या समितीला पूर्ण करावी लागणार आहे. वित्तीय सेवा व्यवसायातील प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेल्या व्यक्तींच्या नावांची निवड समितीकडून चाचपणी केली जाणे अपेक्षित आहे.
खासगी क्षेत्रातील अग्रेसर आयसीआयसीआय बँकेत आणि त्यानंतर भारतीय बँक महासंघ (आयबीए)चे मुख्य कार्यकारी अशी कारकीर्द राहिलेले सिनोर यांच्या कार्यकाळात नियामक संस्था ‘सेबी’कडून केल्या गेलेल्या मोठय़ा फेरबदलांशी जुळवून घेणारा प्रचंड मोठय़ा संक्रमणाला म्युच्युअल फंड उद्योग सहजतेने सामोरा जाईल, यासाठी अॅम्फीच्या योगदानाची भूमिका चोख बजावली. म्युच्युअल फंड विक्रेत्यांना कमिशन हे एक टक्क्यांपेक्षा जास्त नसेल, या नियमाची त्यांच्याच पुढाकाराने अंमलबजावणी सुरू झाली. शिवाय गुंतवणूकदारांच्या शिक्षण जागरणासाठी प्रयत्नांना सिनोर यांच्याच पुढाकाराने सातत्यपूर्ण सुरू राहिलेल्या मोहिमेचे रूप प्राप्त झाले.