स्थानिक उत्पादनाच्या दुप्पट खरेदीचे लक्ष्य!

‘आयकिया’च्या पहिल्या दालनाची नवी मुंबई कोनशिला

आयकियाच्या नवी मुंबईतील दालनाचे  भूमिपूजन गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. आयकिया इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुवेन्शियो मेट्झू, स्वीडनच्या महासंचालिका करिन ओलोफ्सडॉटर यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी यावेळी फावडे हाती घेऊन प्रतिकात्मक श्रमदान केले.

आयकियाच्या पहिल्या दालनाची नवी मुंबई कोनशिला; पुण्यात वितरण केंद्र

देशात एकल किराणा नाममुद्रेकरिता थेट विदेशी गुंतवणूक क्षेत्र खुले झाल्यानंतर सर्वप्रथम प्रतिसाद देणाऱ्या स्वीडनच्या ‘आयकिया’ने स्थानिक स्तरावरून दुप्पट उत्पादन खरेदीचे लक्ष्य जाहीर केले आहे. सध्याच्या २,००० कोटी रुपयांवरून, २०२० पर्यंत ही खरेदी ४,२०० कोटी रुपये होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कंपनीचे देशातील पहिले वितरण केंद्र पुणे येथे असेल.

जागतिक स्तरावर फर्निचर विक्रीमध्ये आघाडीवर असलेल्या आयकियाच्या नवी मुंबईतील दालनाचे भूमिपूजन गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. आयकिया इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुवेन्शियो मेट्झू, स्विडनच्या महासंचालिका करिन ओलोफ्सडॉटर आदी या वेळी उपस्थित होते. मेट्झू यांनी या वेळी सांगितले की, भारतातून केले जाणाऱ्या उत्पादन खरेदीचे प्रमाण २०२० पर्यंत ४,२०० कोटी रुपयांहून अधिक होईल. तर महाराष्ट्रात येत्या काही वर्षांमध्ये परवडणाऱ्या दरातील घरांची संख्या २० लाख होणार असून आयकियासारख्या आघाडीच्या कंपनीने अशा घर खरेदीदारांकरिता गृहोपयोगी साहित्य, उपकरणे उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

आयकियाचे तुर्भे, नवी मुंबई येथील हे दुसरे दालन असेल. ठाणे – बेलापूर मार्गावरील ४.३० लाख चौरस फूट जागेवरील हे दालन जानेवारी २०१९ मध्ये सुरू होईल. कंपनीने यासाठी १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून यामार्फत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष २,००० रोजगार निर्माण होणार आहेत. आयकियाच्या या दालनामध्ये ९,५०० हून अधिक विविध फर्निचर उपलब्ध होणार असून दालनस्थळी एकाच वेळी १,५०० वाहनक्षमता आहे.

कंपनीचे देशातील पहिले दालन आंध्र प्रदेशमधील हैदराबाद येथे २०१८ मध्ये सुरू होईल. तर पहिले वितरण केंद्र महाराष्ट्रातील पुण्यात असेल. २०२५ पर्यंत भारतात २५ दालने सुरू करण्याचा मानस कंपनीने व्यक्त केला आहे. या दरम्यान एकूण १३,००० रोजगारनिर्मिती  होईल. कंपनीच्या आगामी दालनांमध्ये पुण्याचाही समावेश आहे.

७० टक्के स्विडिश कंपन्या भारतात समाधानी

भारतातील व्यवसायपूरक वातावरण वृद्धिंगत होत असून येथे गुंतवणूक करणाऱ्या १०० हून अधिक कंपन्यांपैकी ७० टक्के कंपन्यांनी येथील व्यवसायाबाबत समाधान व्यक्त केल्याचे स्विडनच्या महासंचालिका करिन ओलोफ्सडॉटर यांनी या वेळी सांगितले. उभय देशांमधील व्यापार २०१५-१६ मध्ये २.१६ अब्ज डॉलर नोंदला गेला असून युरोपीय देशांमधून भारताला डिसेंबर २०१६ पर्यंत १.२६ अब्ज डॉलर थेट विदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून मिळाले आहेत.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Foreign direct investment devendra fadnavis ikea

ताज्या बातम्या