मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्बंधांखाली असलेल्या पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह अर्थात पीएमसी बँकेचे युनिटी स्मॉल फायनान्स बँकेमध्ये (युनिटी एसएफबी) विलीनीकरण मंजूर करण्यात आले असून रिझव्‍‌र्ह बँकेकडून मंगळवारी या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

पीएमसी बँकेच्या सर्व शाखा मंगळवारपासून (२५ जानेवारी) युनिटी एसएफबीच्या शाखा म्हणून काम करतील, असे रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वी या विलीनीकरणाला तत्त्वत: मंजुरी देऊन, २२ नोव्हेंबर २०२१ रोजी त्या संबंधाने योजनेचा मसुदा जाहीर केली होती. १० डिसेंबर २०२१ पर्यंत हा प्रस्ताव सार्वजनिक अभिप्राय, दुरुस्ती सूचना आणि हरकतींसाठी खुला ठेवण्यात आला होता. त्या सूचना-हरकती लक्षात घेऊन रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी, पीएमसी बँकेचे तिच्या मालमत्ता, दायित्वे आणि सर्व ठेवींसह युनिटी एसएफबीमध्ये विलीनीकरण योजनेला मंजुरी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर्थिक अनियमितता आढळल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेने सप्टेंबर २०१९ मध्ये पीएमसी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून कारभार ताब्यात घेतला होता. त्या बरोबरीने या बँकेच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्नही मध्यवर्ती बँकेचे सुरू होते. महाराष्ट्राबरोबरच दिल्ली, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश अशा सहा राज्यांमध्ये मिळून पीएमसी बँकेच्या १३७ शाखा आहेत. २००० साली या बँकेला शेडय़ुल्ड दर्जा बहाल करण्यात आला होता. सेंट्रम समूह आणि देयक व्यासपीठ असलेल्या भारतपे यांनी एकत्र येत युनिटी स्मॉल फायनान्स बँकेची स्थापना केली असून, तिचे अलीकडेच मुंबईत कालिना, सांताक्रूझ येथे शाखेसह कार्यान्वयनही सुरू झाले आहे. किमान २०० कोटी रुपयांच्या भांडवल राखण्याच्या नियामकांचे बंधन असताना, ही बँक १,१०० कोटी रुपयांच्या भांडवलासह सुरू झाली आहे.