महिन्याला तीन नवीन ‘युनिकॉर्न’ची भर

नवउद्यमी उपक्रमशीलतेत भारताचे विक्रमी ‘चापल्य’!

नवउद्यमी उपक्रमशीलतेत भारताचे विक्रमी ‘चापल्य’!

मुंबई : विद्यमान २०२१ सालात प्रत्येक महिन्याला नवीन तीन ‘युनिकॉर्न’ची भर पडत आहे. नवउद्यमी (स्टार्टअप) उपक्रमशीलतेत ‘युनिकॉर्न’ म्हणजे एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक उलाढालीची पातळी गाठली जाणे असून, हा यशाचा महत्त्वाचा टप्पा गाठणाऱ्या नवउद्यमींची एकूण संख्या ऑगस्ट २०२१ अखेर दुप्पट होत ५१ वर पोहोचली आहे.

हुरुन इंडियाने गुरुवारी भविष्यातील युनिकॉर्नची सूची २०२१ प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, अडचणीच्या ठरणाऱ्या भारतातील काही नियमांमुळे नवउद्यमी उपक्रमांना भारत सोडून इतर देशांत बस्तान हलवावे लागत होते. मात्र आता परिस्थितीत सुधारणा होत आहे. सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या ‘स्टार्टअप इंडिया’सारख्या उपक्रमांमुळे नवउद्यमींसाठी अनुकूल वातावरणनिर्मितीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. परिणामी ‘युनिकॉर्न’ होऊ घातलेल्या नवउद्यमींचे एकूण मूल्यांकन ३६ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. जे दिल्लीच्या सकल राज्य उत्पादन अर्थात जीडीपीच्या एकतृतीयांश आहे. ‘युनिकॉर्न’ची संख्या गेल्या आठ महिन्यांत झपाटय़ाने वाढली आहे.

हुरुन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संशोधक अनास रहमान जुनैद यांच्या मते, भारतात सध्या ६० कोटींहून अधिक इंटरनेट वापरकर्ते असून, ही संख्या २०२५ पर्यंत ९० कोटींवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर वाढल्याने तंत्रज्ञानाधारित नवउद्यमी उपक्रमांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. मोबाइलच्या माध्यमातून देयक व्यवहार, विमा, ब्लॉकचेन, समभाग व्यवहार आणि डिजिटल कर्ज व्यवहार अशा क्षेत्रात कार्यरत ‘फिनटेक’ कंपन्याना इंटरनेटचा वाढता वापर उपकारक ठरणार आहे.

सर्वाधिक ‘युनिकॉर्न’ असणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. अमेरिका आणि चीन अनुक्रमे ३९६ व २७७ ‘युनिकॉर्न’सह आघाडीवर आहेत. तर ब्रिटनमध्ये ३२ आणि जर्मनीमध्ये १८ ‘युनिकॉर्न’ आहेत. हुरून इंडियाच्या मते, भारतातील ‘युनिकॉर्न’ची संख्या जास्त असू शकते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hurun india released the list of future unicorn 2021 zws