* रिक्त पदांवर भरतीची मागणी
प्राप्तिकर विभागातील अधिकारी वर्गाच्या गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला मुंबईत १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला. या मागणीबाबत महिन्याच्या मध्यापर्यंत विचार न झाल्यास, कर संकलनाचे काम तसेच छाननी प्रक्रिया बंद करण्याचा इशारा ‘इन्कम टॅक्स एम्प्लॉईज फेडरेशन’ने दिला आहे. मुंबईत मरिन लाइन्स येथील प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात गुरुवारी शुकशुकाट होता. संपात मुंबईतील ६,००० हून अधिक कर्मचारी सहभागी झाल्याचे फेडरेशनने म्हटले आहे. आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी संघटनेच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची ११ ऑक्टोबरला बैठक होणार असून त्यानंतर कर वसुली न करण्याचे पाऊल उचलले जाईल, असे मुंबई विभागाचे सरचिटणीस रवींद्रन नायर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. प्राप्तिकर विभागात ६०० अधिकारी पदे  गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहेत.