केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. ‘हम दो, हमारे दो’ म्हणत चार लोक देशाला चालवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. या आरोपाचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी समाचार घेतला. दोन लोक पार्टीची काळजी घेतायेत आणि आणखी दोन लोक आहेत ज्यांची काळजी आम्हाला घ्यायची आहे, असं म्हणत अर्थमंत्र्यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं.

सर्वसाधारण अर्थसंकल्प क्रोनी कॅपिटालिस्ट केंद्री असल्याचा आरोप करत विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांचा आरोप खोडून काढला. सीतारामन यांनी आकडेवारी वाचून दाखवत विरोधकांचा आरोप तथ्यहीन असल्याचा दावा केला. लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या,”अर्थसंकल्प क्रोनी कॅपिटालिस्ट केंद्रीय असल्याचा हा विरोधकांचा आरोप चुकीचा असून, गरीबांना मदत करणारा आहे. अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीला गती मिळणार असल्याचा दावा सीतारामन यांनी केला.

आणखी वाचा- “हा देश फक्त चार लोक चालवतात,” लोकसभेत राहुल गांधी आक्रमक

अर्थमंत्री म्हणाल्या,”हम दो, हमारे दो याचा अर्थ असा आहे, दोन व्यक्ती पक्षाची चिंता करत आहेत आणि आणखी दोन व्यक्ती आहेत, मुलगी आणि जावई. ज्यांची काळजी आम्हाला घ्यायची आहे. पण, आम्ही असं करत नाही. सरकारने पंतप्रधान स्वनिधी योजनेतंर्गत ५० लाख स्ट्रीट वेंडर्संना एका वर्षांसाठी १० हजार कोटी रूपये देण्यात आले. ते लोक क्रोनी भांडवलदार नाहीत,” असा टोला सीतारामन यांनी काँग्रेसला लगावला.

आणखी वाचा- राहुल गांधींनी मोदी सरकारला विचारले तीन प्रश्न, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान स्वनिधी योजनेमुळे गरिबांना फायदा झाला आहे. मागास आणि मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समूहांना फायदा झाला आहे. आम्ही यांच्यासाठी काम करतो, जावयासाठी नाही. आम्हाला क्रोनी कॅपिटालिस्ट म्हणतात? शशी थरूर इथे उपस्थित आहेत. जेव्हा केरळमध्ये यांचं सरकार होतं, तेव्हा यांनी एका भांडवलदाराला बोलवलं होतं. कोणतीही निविदा नाही. आमचा क्रोनी सर्वसामान्य माणूस आहे. ज्यांना घर मिळतं. स्वनिधी योजनेचा फायदा मिळतो,” असं म्हणत अर्थमंत्र्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागलं.