दहा दिवसांनी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या स्वागताची जोरदार तयारी भांडवली बाजाराने सुरू केली आहे. मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात आर्थिक सुधारणांचे चित्र उमटण्याच्या आशेवर गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सला सप्ताहारंभीच तब्बल ३१४ अंशांची झेप घेण्यास भाग पाडले. गेल्या पाच वर्षांतील या सर्वोत्तम तिमाही उडीने मुंबई निर्देशांकही २५,५०० नजीक जात पंधरवडय़ाच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स महिन्याची अखेर करताना ३१३.८६ अंश वाढ नोंदवीत २५,४१३.७८ वर पोहोचला आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही सोमवारी १०२.५५ अंश भर पडल्याने प्रमुख निर्देशांक ७,६११.३५ पर्यंत गेला. दोन्ही निर्देशांक गेल्या शुक्रवारच्या तुलनेत १.२५ टक्क्यांहून अधिक वधारले. १७  जूननंतरची सेन्सेक्सची सोमवारची बंदअखेरची कामगिरी राहिली.
मुंबई निर्देशांकाने संपूर्ण जूनमध्ये १,१९६ अंश वाढ नोंदविली आहे, तर एप्रिल ते जून या तिमाहीत सेन्सेक्स १३.५२ टक्क्यांनी (३,०२७.५१ अंश) उंचावला आहे. निर्देशांकात यापूर्वी सप्टेंबर २००९ च्या तिमाहीत तब्बल १८ टक्क्यांची वाढ राखली गेली आहे.
केंद्रात भाजपप्रणीत लोकशाही आघाडी सरकारला पूर्ण बहुमत मिळाल्याचे स्वागत गेले महिनाभर बाजारात झालेले दिसून आले.
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्याच तिमाहीत गुंतवणूकदारांची मालमत्ताही १६ लाख कोटी रुपयांनी वधारली आहे. ३० जूनअखेपर्यंत मालमत्ता ९०.१९ लाख कोटी रुपये झाली आहे. मार्च २०१४ अखेर ती ७४.१५ लाख कोटी रुपये होती.
आता सरकारच्या आगामी अर्थसंकल्पासाठी भांडवली बाजार सज्ज होऊ पाहत आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे यंदाचा अर्थसंकल्प १० जुलै रोजी संसदेत मांडणार आहेत. १६ व्या लोकसभेच्या निवडणुकांमुळे यापूर्वीच्या सरकारने केवळ चार महिन्यांसाठीचा हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता.
सोमवारच्या व्यवहारात २५,४६०.९६ पर्यंत नेऊन ठेवणाऱ्या मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्समधील आयसीआयसीआय बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो, आयटीसी, ओएनजीसी, एचडीएफसी, सन फार्मा, स्टेट बँक, टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी बँक यांचे समभाग मूल्य वधारले. ३० पैकी केवळ ६ समभाग घसरले. त्यातही बजाज ऑटो एक टक्क्यासह घसरला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा समभाग २.८८ टक्क्यांनी उंचावला. मिड व स्मॉल कॅपही अनुक्रमे १.८९ व १.८० टक्क्यांनी वधारले. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती स्थिरावत असल्याने बाजारातील सूचिबद्ध तेल व वायू कंपनी समभागही सोमवारी वधारले.

रुपयाची वर्षभरातील सुमार मासिक कामगिरी
जवळपास वर्षभरातील सुमार मासिक कामगिरी चलनाने जूनमध्ये नोंदविली आहे, तर गेल्या तिमाहीतील पहिली घसरण या महिन्यात राखली गेली आहे. जूनमध्ये रुपया १.७९ टक्क्यांनी घसरला आहे. यापूर्वी ऑगस्ट २०१३ मध्ये रुपया मोठय़ा फरकाने आपटला होता, तर एप्रिल ते जूनदरम्यानची त्याची घसरण ०.३ टक्के राहिली आहे. दरम्यान, डॉलरच्या तुनलेत रुपया महिन्याची अखेर करताना ९ पैशांनी घसरत ६०.१७ पर्यंत खालावला.