मुंबई : आशियाई बाजारातील सकारात्मक संकेत आणि देशांतर्गत आघाडीवर, राजकीयदृष्टय़ा महत्त्वपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा सलग दुसऱ्यांदा विजय आणि इतर तीन राज्यांमध्येदेखील या पक्षाचे वर्चस्व कायम दाखविखणारा कौल या अनुकूल घडामोडींनी भांडवली बाजाराला गुरुवारी तेजीचे इंधन पुरविले. सलग तिसऱ्या सत्रात परिणामी प्रमुख निर्देशांकांनी वरच्या दिशेने झेप कायम ठेवली.

सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,५९५.१४ अंशांनी म्हणजेच जवळपास तीन टक्क्यांची आघाडी घेत उसळला होता. त्या समयी ५६,२४२.४७ अशी दिवसभरातील उच्चांकी पातळीही त्याने गाठली होते. मात्र मध्यान्हानंतर खुल्या झालेल्या युरोपीय बाजारांचे कमकुवत संकेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात दोन दिवस नरमलेल्या खनिज तेलाच्या किमती पुन्हा भडकल्याने स्थानिक बाजारातही चलबिचल निर्माण केली. दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा नफावसुली झाल्याने सेन्सेक्सची उच्चांकी पातळीपासून घसरण झाली. तरी गुरुवारच्या सत्रात दिवसअखेर प्रमुख निर्देशांक दीड टक्क्यांची वाढ साधून बंद झाले.

सेन्सेक्स ८१७.०६ टक्क्यांच्या वाढीसह ५५,४६४.३९ पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २४९.५५ अंशांची भर पडली.  तो १.५३ टक्क्यांनी वाढून १६,५९४.९० पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये हिंदूस्तान युनिलिव्हर, टाटा स्टील, स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, बजाज फिनसव्‍‌र्ह, नेस्ले आणि मारुती सुझुकीचे समभाग प्रत्येकी ५.१७ टक्क्यांपर्यंत तेजी दर्शवीत होते. दुसरीकडे टेक मिहद्र, डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज आणि टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसच्या समभागात घसरण झाली.

मात्र देशांतर्गत विधानसभा निवडणुकांचा राजकीय कौलाचा बाजारावर दीर्घकाळ प्रभाव न राहता, बाजाराचे मुख्य लक्ष रशिया-युक्रेन आणि त्यातून संभवणाऱ्या आर्थिक परिणामांवरच राहील. कारण अजूनही या पातळीवर अनिश्चितता कायम आहे.

अमेरिकेतील बेरोजगारी तसेच महागाईची आकडेवारी लवकरच जाहीर होणे अपेक्षित आहे. तेथील मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हच्या आगामी बैठकीतील व्याज दरवाढीचे प्रमाण किती असेल, हाही बाजाराचा कल ठरविणारा एक महत्त्वाचा घटक असेल. यामुळे फेडच्या बैठकीपर्यंत बाजार अस्थिर राहण्याची शक्यता आहे, असे मत स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे संशोधनप्रमुख संतोष मीणा यांनी व्यक्त केले.

बाजार-तेजीला चालना कशामुळे?

देशांतर्गत भांडवली बाजारात तेजीवाल्यांनी पुन्हा एकदा पकड घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. रशिया-युक्रेन युद्ध भडक्यावर लवकरच तोडगा निघण्याची आशा पल्लवित झाल्याने जगभरातील भांडवली बाजारांमध्ये तेजीचे वातावरण होते. तर खनिज तेलाच्या आंतराष्ट्रीय किमती आणि इतर कमोडिटीच्या किमती कमी झाल्याने त्याचे देशांतर्गत पातळीवर याचे सकारात्मक पडसाद उमटले. देशात राजकीयदृष्टय़ा महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तरप्रदेशसह, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या तीन राज्यांमध्ये केंद्रातील सत्तारूढ पक्षालाच पुन्हा बहुमत मिळणे हे नाजूक बनलेल्या आर्थिक वातावरणात अत्यावश्यक असलेल्या राजकीय स्थिरतेचा पैलूला मजबूत करणारे ठरेल, असा गुंतवणूकदारांचा एकंदर दृष्टिकोन दिसून आला. ही सर्व कारणे गुरुवारी निर्देशांकांच्या मोठय़ा वाढीला चालना देणारी ठरली.