28 February 2021

News Flash

विमा.. विनासायास : विमाराशी निवडीचे गणितही गरजेचे!

साधारण ऑगस्ट २०२० च्या शेवटच्या आठवडय़ातील अनुभव या चिंताजनक स्थितीवर जास्त प्रकाश टाकतो.

|| भक्ती रसाळ

करोनाकाळात नोंदविल्या गेलेल्या मृत्युदाव्यांबाबत जाणवलेली चिंताजनक बाब, ती म्हणजे अत्यल्प विमाराशींची निवड! जीवनविमा योजनेची योग्य निवड करणे जितके महत्त्वाचे तितकेच महत्त्वाचे विमाराशी ठरवण्याचे गणित! कोविड-१९ च्या मृत्युदाव्यातील विमाराशींचे अवलोकन केले तर शोचनीय चित्र पुढे येते. सरासरी २,५०,००० रुपये  ते ५,००,००० रुपये इतकी जुजबी रक्कम विम्याद्वारे कुटुंबीयांना भरपाई म्हणून मिळविता आली आहे.

साधारण ऑगस्ट २०२० च्या शेवटच्या आठवडय़ातील अनुभव या चिंताजनक स्थितीवर जास्त प्रकाश टाकतो. रमेश िशदे (नाव बदलले आहे), वय वर्षे ७०, पेशा संगणक व्यवसाय, मृत्यूचे कारण करोना, विमाराशी ७५,००० रु., विमायोजना – युनिट लिंक्ड विमा योजना (युलिप), हप्त्याची रक्कम १५,००० रुपये. हा मृत्युदावा केवळ २४ तासात मान्य झाला. तीन दिवसात पसे िशदे यांच्या बँक खात्यात जमा झाले! परंतु ही रक्कम पुरेशी आहे का? वरील मृत्युदाव्याचे विश्लेषण केले तर लक्षात आले की, २००७ साली ‘गुंतवणूक विकल्प’ म्हणून युलिप योजना विकत घेतली गेली. विमा योजनेची मुदत १५ वर्षे ठेवून इक्विटी फंडात गुंतवणूक केली गेली. गुंतवलेली रक्कम ‘टॅक्स फ्री’ मिळावी म्हणून केवळ रुपये ७५,००० रुपये मृत्यू विमाराशी ठरवण्यात आली. बाजारातील तेजीच्या काळात इक्विटी फंडातून काही रक्कम बाहेर काढण्यात आली. परिणामी विमाराशीची जेव्हा मृत्युदाव्याद्वारे संकटात गरज पडली तेव्हा आजारपणातील खर्चाची परतफेड होईल एवढी देखील रक्कम हाती लागली नाही!

चुकीच्या विमा योजनांतील गुंतवणुकांमुळे कुटुंबाचे आर्थिक नुकसान होतेच, परंतु पुरेशा विमा सुरक्षा कवचाच्या अर्थात अत्यावश्यक संपत्ती रक्षणाच्या अभावी आयुष्यभर उभारलेली संपत्तीसुद्धा रिती करावी लागते. सदर मृत्युदाव्याच्या अनुभवाद्वारे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात येतो की, योग्य विमाराशी निवडण्याचे गणित मांडणे गरजेचे आहे.

आर्थिक नियोजनकार जेव्हा गुंतवणूकदाराला योग्य विमाराशीविषयी मार्गदर्शन करतात तेव्हा दोन गणिती पर्यायांचे अवलंबन केले जाते.

१.    ह्य़ुमन लाईफ व्हॅल्यू  (एचएलव्ही) – विमाराशी ठरवण्याच्या या पद्धतीद्वारे कुटुंबप्रमुखाची किंवा विमित व्यक्तीची ‘आर्थिक किंमत’ किंवा तिच्या मृत्युद्वारे होणारे कुटुंबाचे एकूण आर्थिक नुकसान ठरवले जाते. गुंतवणूकदाराची भविष्यातील मिळकत, कुटुंबाचा वार्षकि खर्च, चालू कर्जे, सध्याची एकूण गुंतवणूक या बाबींचा विचार एचएलव्ही ठरवताना केला जातो. कुटुंबप्रमुखाने ठरविलेली आर्थिक उद्दिष्टे अबाधित राहावी हा विचार एचएलव्हीद्वारे विमाराशी ठरवताना प्रामुख्याने केला जातो. कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा अपमृत्यू क्लेशदायक असतो. घरातील कर्त्यांच्या अपमृत्यूनंतर येणारे आर्थिक संकट तर आपत्तीकारक ठरते ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. करोनाकाळात आरोग्यसंकटाबरोबरीनेच नोकर कपात, बेरोजगारी, टाळेबंदी, उद्योगधंद्यातील नुकसान असे अभूतपूर्व संकट समोर आले आणि अशा समयी योग्य विमाराशीची निवड ही कुटुंबाच्या आर्थिक आरोग्यासाठी अनन्यसाधारण महत्त्वाची आहे, हे देखील अनेकांना अनुभवाअंती पटले असेल.

एचएलव्हीद्वारे वर्तमान काळातील कुटुंबाच्या आर्थिक उद्दिष्टांचे चलनवाढीचा दर लक्षात घेऊन समीकरण मांडता येते. चालू विमाराशी आणि प्रसंगी कोणत्या आर्थिक गुंतवणुकांचा वापर कुटुंबप्रमुखाच्या मृत्युपश्चात करता येईल या बाबींचा विचार विमा योजनांद्वारे सम अ‍ॅश्युअर्ड म्हणजेच मृत्यू कवच ठरवताना केला जातो. विमा कंपन्यांच्या वेबसाइटवर ह्य़ुमन लाईफ व्हॅल्यूद्वारे विमाराशी ठरवण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत.

२. विमाराशी खर्चाद्वारे ठरवणे (एक्सपेन्स मेथड)  –

सर्वसाधारणपणे गुंतवणूक सल्लागार भविष्यातील खर्चाचा अंदाज घेऊन त्याद्वारे विमाराशी ठरवतात.

एक्स्पेन्स रिप्लेसमेंट म्हणजेच कुटुंबाचा मासिक दैनंदिन खर्च, मुलांच्या भविष्यातील शैक्षणिक गरजांची सध्याची किंमत, गृहकर्जे, वाहनकर्जे, जोडीदाराचे वय, आतापर्यंत केलेल्या गुंतवणुकांची वर्तमानातील बाजारमूल्ये या बाबींचा विचार करून मांडलेले हे गणित असते. खर्चाच्या याद्यांमुळे कुटुंबप्रमुखाच्या किंवा पोशिंद्याच्या अपमृत्यूमळे किती आर्थिक तोटा होईल याचा अंदाज बांधता येतो. दैनंदिन खर्च चलनवाढीमुळे वाढत असताना, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक खर्चही किमान १५ टक्के ते २० टक्के दरवर्षी वाढत आहेत. ‘केवळ एक कोटी विमाराशीद्वारे कुटुंब सुरक्षित करा’ असा जाहिरातीतील उल्लेख म्हणजेही योग्य विमा सल्ला नव्हे! विमाराशीची निवड कुटुंबसापेक्ष बदलत असते. योग्य मार्गदर्शकाद्वारे ही रक्कम ठरवणे गुंतवणूकदाराच्या हिताचे आहे.

करोनाकाळात आपण आप्तस्वकीयांचे अपमृत्यू बघून हळहळलो. परंतु त्याचबरोबर व्यक्ती म्हणून, एक समाज म्हणून आपल्या मर्यादाही ओळखल्या आहेत!

‘नवसामान्य’ जीवनशैलीत कुटुंबाची आर्थिक सुरक्षा ही योग्य विमा निवडीने दृढ करणे हा संकल्प त्याचमुळे महत्त्वाचा!

लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आणि व्यावसायिक विमा सल्लागार.

bhakteerasal@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 12:03 am

Web Title: corona virus lockdown the math of insurance selection is also needed akp 94
Next Stories
1 बाजाराचा तंत्र-कल : बाजाराने खरेच उच्चांक साधला काय?
2 रपेट बाजाराची : विक्रीवाल्यांचा जोर
3 करावे कर-समाधान : घराचा ताबा मिळाल्यावरच, गृह कर्ज व्याजाची कर वजावट!
Just Now!
X