|| आशीष ठाकूर

सरलेल्या सप्ताहात सेन्सेक्स ५१,००० चा आणि निफ्टी १५,००० चा ‘महत्त्वाचा वळणबिंदू स्तर’ पार करण्यात अपयशी ठरल्याने आता नाण्याची दुसरी बाजू म्हणजे निर्देशांकाचे खालचे लक्ष्य समजून घेणे क्रमप्राप्त ठरते. ही दुसरी बाजू निर्देशांकाचे खालचे लक्ष्य, व त्या लक्ष्यपूर्तीचा कालावधी अशा स्वरूपात समजून घेतली तर या संकल्पनेची रंजकता आणखी वाढेल. या पाश्र्वाभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ४९,५९१.३२

निफ्टी : १४,८३४.८५

निर्देशांक अर्थात सेन्सेक्स ५१,००० आणि निफ्टी १५,००० च्या स्तराखाली सातत्याने राहिल्यास निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर ४८,९५० ते ४८,२०० आणि निफ्टीवर १४,५०० ते १४,२००, तर द्वितीय लक्ष्य सेन्सेक्सवर ४६,८०० ते ४६,००० आणि निफ्टीवर १३,८०० ते १३,५०० असे असेल.

आज आपण तांत्रिक विश्लेषणातील ‘लक्ष्य व लक्ष्यपूर्तीचा कालावधी’ यांची सांगड घालायचा प्रयत्न करूया. या संबंधातील तांत्रिक विश्लेषणातील सुभाषित… ‘लक्ष्य हे किमती स्वरूपात आणि कालावधी स्वरूपात साध्य झाले पाहिजे’ (टार्गेट शूड अचीव्ह टाइम वाइज अ‍ॅण्ड प्राइस वाइज) आज आपण कालावधी जाणून घेऊया.

२४ मार्च २०२० ते १६ फेब्रुवारी २०२१ हा तेजीचा कालावधी होता, अवघ्या अकरा महिन्यांत निर्देशांकाची वाढ नीचांकापासून दुप्पट झाली. सेन्सेक्स २५,६३८ ते ५२,५१६ आणि निफ्टी ७,५११ वरून १५,४३१. या वाढीला भूमिती श्रेणीतील वाढ असे संबोधतात (अतिजलद स्वरूपातील वाढ). जसे की, दीर्घ पल्ल्याच्या धावण्याच्या मॅरेथॉन शर्यतीत धावपटूंनी दीर्घ पल्ल्याच अंतर कापल्यानंतर त्याला जो थकवा येतो, तेव्हा त्याला विश्रांतीची गरज असते. विश्रांती घेऊन, ताजातवाना होऊन नंतर तो पुढचे अंतर कापतो. तसेच काहीसे निर्देशांकाचे झाले आहे. आता निर्देशांकाला थोडी विश्रांतीची गरज आहे. आज आपण निर्देशांकाच्या विश्रांतीच्या कालावधीचा (कालाय तस्म्यै नम:) आढावा घेऊया.

निर्देशांकाच्या विश्रांतीच्या कालावधीला तीन पर्याय आहेत – 

१) अकरा महिने निर्देशांकात सातत्याने वाढ झाल्याने, अकरा महिन्यांची विश्रांती (वाढीचा कालावधी = विश्रांतीचा कालावधी)

२) अकरा महिने निर्देशांकाच्या वाढीच्या अर्धे, साडेपाच महिने विश्रांतीचा कालावधी.

३) ११ महिने निर्देशांकाच्या वाढीच्या ३३ टक्के (१/३ वेळ ) म्हणजे साडेतीन महिने विश्रांतीचा कालावधी

आता येणाऱ्या दिवसातील निर्देशांकाचे खालचे लक्ष्य व ते साध्य होण्याचा कालावधी याची सांगड घालूया.

पहिला पर्याय :

प्रथम माफक कालावधी – साडेतीन महिने. आताच्या घडीला १६ फेब्रुवारीला सेन्सेक्सवर ५२,५१६ आणि निफ्टीवर १५,४३१ चा उच्चांक नोंदवत घसरण सुरू झाली व ही घसरण येणारे साडेतीन महिने अपेक्षित असून, १६ फेब्रुवारीपासून, मे अखेरपर्यंत निर्देशांकांचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ४८,२०० ते ४६,८०० आणि निफ्टीचे खालचे लक्ष्य हे १४,२०० ते १३,८०० असे असेल.

दुसरा पर्याय :

साडेपाच महिन्यांचा कालावधी म्हणजे जुलै अखेरपर्यंत सेन्सेक्स ४६,००० ते ४४,३०० आणि निफ्टी निर्देशांक १३,५०० ते १३,००० पर्यंत घसरेल.

 तिसरा पर्याय :

हा पर्याय म्हणजे घसरणीसाठी अकरा महिन्यांच्या कालावधीचा. अर्थात १६ जानेवारी २०२२ पर्यंत सेन्सेक्सचे खालचे लक्ष्य ४२,७०० आणि निफ्टीवर ते १२,५०० असे असेल.

आताच्या घडीला प्रथम आपण माफक अशा मे महिन्याच्या अखेरपर्यंतच्या कालावधीतील निर्देशांकांची विश्रांती ही सेन्सेक्सवर ४८,२०० ते ४६,८०० आणि निफ्टीवर १४,२०० ते १३,८०० अशी गृहीत धरून वाटचाल करूया.

निकालपूर्व विश्लेषण

आता आपण गुंतवणूकदारांच्या आवडत्या समभागांचे निकालपूर्व विश्लेषण जाणून घेऊया.

१) टीसीएस लिमिटेड    

’ तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, १२ एप्रिल

’ ९ एप्रिलचा बंद भाव – ३,३२२.२० रु.

’ निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ३,१५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,१५० रुरपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,४०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,६०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ३,१५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,९०० रुपयांपर्यंत घसरण.

२) इन्फोसिस टेक्नॉलॉजीज लिमिटेड

’ तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, १४ एप्रिल

’ ९ एप्रिलचा बंद भाव – १,४४०.७५ रु.

’ निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,३२० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,३२० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,४८० रुपये, द्वितीय लक्ष्य १,६०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,३२० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,२५० रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966 @gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.