scorecardresearch

Premium

रपेट बाजाराची : सावध आशावाद

शुक्रवारी जागतिक बाजारांच्या बरोबरीने देशांतर्गत भांडवली बाजारातही नफावसुली झाली. त्यामध्ये परदेशी गुंतवणूकदारदेखील सामील झाले.

stock market prediction
(संग्रहित छायाचित्र)

सुधीर जोशी

अमेरिकी मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्ह अर्थव्यवस्थेला विनासायास पूर्वपदावर आणू शकेल, या वाढत्या आशावादामुळे अमेरिकी बाजारात सरलेल्या सप्ताहात सकारात्मक वातावरण होते. त्याचेच पडसाद देशांतर्गत बाजारात पाहायला मिळाले. गेल्या काही सत्रांत तेजीत असलेल्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक- सेन्सेक्सने साठ हजारांचा टप्पा गाठला, पण तो त्यावर टिकू शकला नाही. शुक्रवारी जागतिक बाजारांच्या बरोबरीने देशांतर्गत भांडवली बाजारातही नफावसुली झाली. त्यामध्ये परदेशी गुंतवणूकदारदेखील सामील झाले. केंद्र सरकारने इंधनावर लावलेल्या अतिरिक्त उत्पादन शुल्कामुळे निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात घसरण झाली. विशेषत: बँका आणि गेल्या काही सत्रांत वेगाने वर गेलेल्या काही कंपन्यांच्या समभागात गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केला. तरीही बाजार साप्ताहिक स्तरावर सकारात्मक बंद झाला.

* बजाज इलेक्ट्रिकल्स:  वॉटर हीटर, मिक्सर, मायक्रो ओव्हन, रूम एअर कूलर, इस्त्री, रूम हीटर्स, गॅस स्टोव्ह आणि इलेक्ट्रिक किटल्स, इलेक्ट्रिक फॅन्सची विस्तृत श्रेणी, दिवे, टॉर्च, टय़ूबसारख्या उपकरणांच्या निर्मितीमध्ये बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड गुंतलेली आहे. कंपनी लायटिंग, कंझ्युमर डय़ुरेबल्स, इंजिनीअरिंग आणि प्रॉजेक्टच्या व्यवसायातदेखील कार्यरत आहे. कंपनीच्या अग्रणी नाममुद्रांमध्ये मॉर्फी रिचर्डस आणि निर्लेपसारख्या नावांचा समावेश आहे.  जूनअखेर सरलेल्या तिमाहीत विक्रीमध्ये ४३ टक्के वाढ झाली. गतवर्षांच्या तिमाहीमधील तोटय़ाच्या पार्श्वभूमीवर कंपनीला ४१ कोटींचा नफा झाला. कंपनीने इंजिनीअरिंग आणि प्रॉजेक्टच्या कंत्राटी कामावरून आपले लक्ष घरगुती उपकरणावर वळवले आहे. कंपनीच्या विश्वासार्ह नाममुद्रेच्या जोरावर कंपनी या क्षेत्रात चांगली कामगिरी करेल. कंपनीचे समभाग थोडे खाली येण्याची वाट पाहून १,१६० ते १,१७० रुपयांच्या पातळीवर समभागात खरेदीची संधी आहे.

* हिंडाल्को: हिंडाल्कोने जूनअखेरच्या पहिल्या तिमाहीमध्ये उत्तम कामगिरी बजावली. कंपनीच्या विक्रीमध्ये वार्षिक तुलनेत ४० टक्के, तर नफ्यात ३७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. नोवालिस या युरोपमधील हिंडाल्कोच्या उपकंपनीने या कामगिरीला हातभार लावला होता. कंपनीला कोळशाच्या वाढीव किमतीचा सामना करावा लागेल. मात्र सध्या जागतिक बाजारात अ‍ॅल्युमिनियमच्या मागणीत आणि किमतीमध्ये वाढ होत आहे. चीनमधील विजेच्या वाढत्या मागणीमुळे अ‍ॅल्युमिनियम कारखान्यांनी उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे पुरवठा कमी झाला आहे. संवाहकाच्या पुरवठय़ात होणारी वाढ आणि  बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे वाहन क्षेत्रामध्ये अ‍ॅल्युमिनियमची मागणी वाढत आहे. कंपनीने जास्त व्याजाने घेतलेल्या कर्जाची परतफेड केली आहे. त्यामुळे व्याजाच्या खर्चात या वर्षी बचत होईल. सध्याची समभागाची पातळी एक वर्षांच्या गुंतवणुकीसाठी योग्य वाटते.

* लेमन ट्री: लेमन ट्री हॉटेल्स ही भारतातील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सची सर्वात मोठी श्रृंखला आहे. कंपनी वाजवी दरात आधुनिक निवास आणि फिटनेस सेंटर, स्विमिंग पूल, बिझनेस सेंटर आणि मीटिंगरूमसह उच्च दर्जाच्या सुविधा पुरविते. देशभरात ५२ शहरांमध्ये कंपनीची किफायतशीर सेवा देणारी एकूण ८४ हॉटेल्स आहेत. करोनाकाळात कंपनीने त्यांचे आधुनिकीकरण केले असून आता या क्षेत्रातील मागणीसाठी ती सज्ज झाली आहेत. सध्या सरासरी ७० टक्क्यांपर्यंत त्यांचे आरक्षण होत आहे. जूनच्या तिमाहीपासून हॉटेल व्यवसायाला मागणी वाढली असून कंपनीच्या उत्पन्नात वाढ होत आहे. पहिल्या तिमाहीचे उत्पन्न आधीच्या वर्षांच्या तिमाही तुलनेत पाचपट वाढून ६५ कोटी झाले होते. या क्षेत्रातील वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी ७० ते ७२ रुपयांचा हा समभाग २५ टक्क्यांपर्यंत वाढ देऊ शकेल.

परदेशी गुंतवणूकदारांचा सातत्यपूर्ण सक्रिय सहभाग हा सध्याच्या तेजीचा कणा आहे. परदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक अमेरिकेतील व्याजदर वाढीशी निगडित असते. जशी दरवाढ कमी होत जाईल तशी त्यांच्याकडून गुंतवणुकीत भर पडेल. चलनवाढीमुळे बेजार झालेल्या इतर देशांच्या मानाने भारतीय अर्थव्यवस्थेने दाखविलेल्या मजबुतीमुळे त्यांना आपला बाजार परत आकर्षित करत आहे. भू-राजकीय कारणांबद्दल कसलाही आडाखा बांधता येत नाही. भारतामध्ये मजबूत माहिती तंत्रज्ञान कंपन्या, उभरत्या वित्तीय सेवा कंपन्या आणि स्थानिक मागणीमध्ये होणारी वाढ या जमेच्या बाजू आहेत. त्यांना अनुकूल अशी ध्येय-धोरणे राबवली जात आहेत. महागाई नियंत्रणात राहील व विकासाला खीळ बसणार नाही यासाठी रिझव्‍‌र्ह बँक बारीक लक्ष ठेवून आहे. एकीकडे चलनवाढ आणि दुसरीकडे मागणी कमी झाल्यामुळे घसरणारे औद्योगिक उत्पादन (स्टॅगफ्लेशन) याचा धोका प्रगत देशांत अजूनही आहे. मध्यवर्ती बँकांच्या व्याजदरवाढीसाठी झालेल्या बैठकीतील चर्चेचा तपशील शुक्रवारी समोर आल्यावर बाजाराने सावध पवित्रा घेतला यामधून हेच अधोरेखित झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी नफावसुलीची संधी घेऊनच वाटचाल करायला हवी.

सरलेल्या सप्ताहातील ठळक घटना:

*  स्विच मोबिलिटी या अशोक लेलॅंडच्या उपकंपनीने मुंबईतील बेस्ट उपक्रमासाठी तयार केलेल्या पहिली दुमजली (डबलडेकर) बसचे लोकार्पण झाले. कंपनीकडे  बेस्टने २०० बसेसची मागणी नोंदवली आहे. इतर राज्यांतूनही कंपनीला अशा मागण्या मिळण्याची शक्यता आहे. अशोक लेलॅंडसाठी ही सकारात्मक घटना आहे.

*  आयआरसीटीसीला सरकारने प्रवाशांच्या माहितीचे विपणन करून पैसे उभारायला परवानगी दिली. याशिवाय तिकिटविक्रीच्या खिडक्या टप्प्याटप्प्याने कमी करून संगणकीय प्रणालीवर भर द्यायचा रेल्वेचा विचार आहे. आयआरसीटीसीची संगणकीय पद्धतीने रेल्वे तिकिटविक्री करण्याची मक्तेदारी आहे. भारतीय रेल्वेच्या अशा पुरोगामी धोरणांचा आयआरसीटीसीला फायदाच होईल.

sudhirjoshi23@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian share market updates stock market prediction for next week zws

First published on: 22-08-2022 at 05:15 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×