scorecardresearch

रपेट बाजाराची : व्यवहार चातुर्य गरजेचे!

चांगल्या कार्यक्षमतेमुळे नफा कमावणाऱ्या खासगी बँकांमध्ये आयसीआयसीआय बँक आघाडीवर आहे

सुधीर जोशी – sudhirjoshi23@gmail.com

महागाईमुळे अस्थिर बनलेल्या परिस्थितीच्या परिणामांबाबत बाजारच काय, धोरणकर्त्यांमध्येदेखील अनभिज्ञता आहे. तरीही बाजारात संयम, शिस्त व  भीती न बाळगता गुंतवणूक, त्याचप्रमाणे संधी मिळेल तेव्हा नफावसुलीचे चातुर्य, चपळता दाखविता आली पाहिजे..

जागतिक पातळीवर पुन्हा एकदा इंधन दरवाढ सुरू झाल्याने आणि भारतात डिझेलच्या घाऊक दरातील वाढीमुळे आणि इंधनाच्या किमती वाढण्यास सुरुवात झाल्यामुळे सरलेल्या सप्ताहात बाजाराने आधीच्या दोन सप्ताहांच्या तेजीतून माघार घेतली. बँकिंग व एफएमसीजी क्षेत्राला त्याचा सर्वात जास्त म्हणजे तीन टक्के फटका बसला.

’ एचडीएफसी लिमिटेड : एचडीएफसीने या वर्षी दोन लाख कोटी रुपयांची विक्रमी गृहकर्जे मंजूर केली. वाढते शहरीकरण, सरकारचे गृहनिर्मितीला प्रोत्साहनाचे धोरण, कमी व्याज दर व गेली काही वर्षे स्थिर असलेले स्थावर मालमत्तांचे दर अशा कारणांमुळे गृह कर्जाची मागणी वाढलेली आहे. चांगले प्रवर्तक असलेल्या या कंपनीचे समभाग संधी मिळेल तेव्हा आपल्या पोर्टफोलियोमध्ये जमवून ठेवावेत.

’ पीव्हीआर : करोनाचा प्रादुर्भाव व निर्बंध कमी होत आहेत. यातून घराबाहेर पडून चित्रपट पाहण्याची संधी लोकांना मिळत आहे. गेल्या दोन वर्षांत सर्वात जास्त परिणाम झालेल्या काही उद्योगांपैकी एक चित्रपट उद्योग आहे. बाजारात सूचिबद्ध असलेल्या पीव्हीआर आणि आयनॉक्स या कंपन्यांचे बाजारमूल्य गेल्या दोन वर्षांत ६० टक्के घसरले. आता पुन्हा एकदा त्यांच्या मिळकतीमध्ये वाढ होऊ लागली आहे. जरी घरबसल्या चित्रपट पाहण्याची सवय ओटीटी प्लॅटफॉर्मने लावली असली तरी बहुतांश नवे चित्रपट आधी चित्रपटगृहात प्रदर्शित होतात. पीव्हीआरची भारतात ८५७ पडद्यांची क्षमता आहे. सिनेपोलीसबरोबरचा करार सफल झाला तर ही संख्या १,३३७ वर जाईल. अर्थात या बाजारपेठेचा ४० टक्के वाटा कंपनीकडे असेल. पुढील वर्षांत बिग बजेट चित्रपटांची मोठी संख्या अपेक्षित आहे. पीव्हीआरच्या समभागांवर नजर ठेवायला हवी.

’ आयसीआयसीआय बँक : चांगल्या कार्यक्षमतेमुळे नफा कमावणाऱ्या खासगी बँकांमध्ये आयसीआयसीआय बँक आघाडीवर आहे. बँकेच्या किरकोळ क्षेत्रातील कर्जवाटपात मोठी वाढ होत आहे. बँकेने माहिती तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली सर्वच व्यवसायात अंगीकारून एक ग्राहकाभिमुख डिजिटल परिसंस्था तयार केली आहे. बँकेच्या कर्जाच्या आकडेवारीत लक्षणीय सुधारणा होत आहे. ८६० रुपयांच्या उच्चांकावरून समभाग ७०० रुपयांच्या टप्प्यावर आला आहे जी खरेदीची संधी आहे.

’ हटसन अ‍ॅग्रो : हटसन अ‍ॅग्रो ही खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी दूधप्रक्रिया करणारी कंपनी आहे. कच्चे दूध संकलन व प्रक्रिया करण्यासाठी कंपनीकडे स्वत:च्या पायाभूत सुविधा आहेत. अरुण व आरोस या नाममुद्रांखाली कंपनी आइसक्रीम, सुवासिक दूध, लोणी, तूप, पनीर अशी अनेक दुग्धजन्य उत्पादने विकते. यावर्षी तापमानात झालेल्या वाढीमुळे अमूल, मदर डेअरीसारख्या उत्पादकांच्या आइसक्रीमच्या खपात मार्चमध्ये ३० ते ३५ टक्के वाढ झाली. टाळेबंदी संपुष्टात आली असल्यामुळे देखील दुधाच्या तयार उत्पादनांची मागणी वाढली आहे. कंपनीने गेल्या पाच वर्षांत मिळकतीमध्ये व नफ्यात स्थिर कमाई केली आहे. कंपनीच्या प्रवर्तकांकडे भांडवलाचा ७५ टक्के हिस्सा आहे. कंपनीच्या समभागात सध्या झालेल्या घसरणीचा फायदा घेऊन अल्प मुदतीत नफा कमावता येऊ शकतो.

सरल्या सप्ताहात करोनामुळे जाहीर झालेल्या टाळेबंदीला दोन वर्षे पूर्ण झाली. दोन वर्षांपूर्वी बाजारात झालेल्या तुफानी विक्रीमुळे बाजार दोनदा खालचे सर्किट लागून बंद ठेवावा लागला होता. पण गेल्या दोन वर्षांच्या काळात धाडस दाखवून गुंतवणूक करणाऱ्यांना दामदुप्पट फायदा झाला आहे. गेल्या दोन वर्षांत निफ्टीमध्ये १२९ टक्के परतावा तर त्यामधील काही मोठय़ा कंपन्यांच्या वाढीची टक्केवारी टाटा मोटर्स ५६५ टक्के, टाटा स्टील ३८० टक्के, िहडाल्को ५७५ टक्के अशी विक्रमी आहे. मिड कॅप कंपन्यांच्या परताव्याची टक्केवारी देखील अदानी टोटल गॅस २०१२ टक्के, टाटा एलेक्सी १२८० टक्के तर दीपक नाईट्राईट ५९६ टक्के अशी आहे. शेअर बाजारात अशा संधी दुर्लभ असतात. पण वेळ साधून थोडे धाडस दाखविले तर विक्रमी नफा मिळतो.

येणाऱ्या नव्या आर्थिक वर्षांची सुरुवात युद्धाचे सावट तसेच इंधन, धातू, कृषीमाल, खते, खाद्यतेल अशा कच्च्या मालाच्या महागाईमुळे वाढलेल्या अस्थिर परिस्थितीने होणार आहे. व्याजदर वाढीचा वाढणारा आलेखही जवळपास निश्चित आहे. या सर्व परिस्थितीबाबत बाजारच काय पण धोरणकर्त्यांमधेध्येदेखील अनभिज्ञता आहे. तरीही बाजारात संयम, शिस्त व  भीती न बाळगता केलेली गुंतवणूक चांगला परतावा देईल. त्यासाठी आपले लक्ष मोठय़ा कंपन्यांकडे (ज्या उत्पादनांची किंमत वाढवून वाढलेला खर्च सहज वसूल करू शकतात) असायला हवी. धातू क्षेत्रातील कंपन्याही चांगला फायदा मिळवून देतील. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला कच्च्या मालाच्या दरवाढीची झळ थेट बसत नाही व त्यांच्याकडे भरपूर मागण्या आहेत त्यामुळे हे क्षेत्रही चांगला नफा मिळवून देईल. मात्र अधूनमधून नफावसुलीचे व्यवहारचातुर्य दाखविता आले पाहिजे. 

दुर्लभ संधी.. दोन वर्षांच्या काळात, विशेषत: करोना टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर झालेल्या भीषण पडझडीच्या समयी धाडस दाखवून गुंतवणूक करणाऱ्यांना दामदुप्पट फायदा झाला आहे. या काळात निफ्टीमध्ये १२९ टक्के परतावा, तर त्यामधील काही मोठय़ा कंपन्यांच्या वाढीची टक्केवारी टाटा मोटर्स ५६५ टक्के, टाटा स्टील ३८० टक्के, हिंडाल्को ५७५ टक्के अशी विक्रमी आहे. मिड कॅप कंपन्यांच्या परताव्याची टक्केवारी देखील अदानी टोटल गॅस २०१२ टक्के, टाटा एलेक्सी १२८० टक्के तर दीपक नाईट्राईट ५९६ टक्के अशी आहे. अशा दुर्लभ संधी शेअर बाजारातच असतात..

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Stock market analysis investment in stock market zws

ताज्या बातम्या