आचार्य चाणक्य यांनी व्यक्तीच्या अनेक पैलूंवर भाष्य केले आहे. त्यांना राजकारण, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र इत्यादी विषयांचे सखोल ज्ञान होते. त्यामुळे त्यांनी तेव्हा सांगितलेल्या अनेक गोष्टी आजही नेहमीच प्रासंगिक वाटतात. चाणक्य यांचे धोरण अंगीकारले तर जीवन आणखीनच समृद्ध होऊ शकते. कारण त्यांच्या प्रत्येक संदेशात अद्भुत जीवनमूल्ये आहेत. जे रोजच्या जीवनासाठी मार्गदर्शक म्हणून काम करतात. यात आचार्य चाणक्य यांनी पालकांनाही काही महत्वाचे संदेश दिले आहे. यात पालकांनी मुलांसमोर करू नयेत अशा काही गोष्टी सांगितल्या आहे. ज्या आपण जाणून घेऊ…

आक्षेपार्ह भाषा वापरू नका

लहान मुलं ही देवाघरची फुलं असे म्हटले जाते. कारण मुलांचे मन हे ओल्या मातीच्या भिंतीसारखे असते. ज्यामुळे त्यांचे संगोपन मोठ्या प्रेमाने केले पाहिजे. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत प्रत्येक गोष्ट मुलांना प्रेमाने समजावून सांगितली पाहिजे. मुलं फार निरागस असतात, जी जाणूनबुजून चुका करत नाहीत. त्यामुळे चुकलेच तर त्यांना काय चूक, काय बरोबर हे प्रेमाने शिकवले पाहिजे. तुमची मुलं तुम्हाला बघून शिकत असतात. यामुळे जर मुलांना सभ्य आणि सुसंस्कृत बनवायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमची भाषा सुधारली पाहिजे. तसेच मुलांसमोर सभ्य आणि प्रमाण भाषेचा वापर केला पाहिजे.

दोष शोधत बसू नका

आचार्य चाणक्य यांच्या मते, मुलं पाच वर्षांची झाल्यावर त्यांना काही प्रमाणात गोष्टी समजू लागतात. अशावेळी पालकांनी मुलांच्या चुका चारचौघात नाही तर त्यांना एकट्यात सांगितल्या पाहिजे. तसेच मुलांना सर्वांसमोर ओरडताना काळजी घेतली पाहिजे. कारण या गोष्टींचा मुलांना त्रास होत असतो.

आदराने वागा

चाणक्य नीतीनुसार पालकांना एकमेकांबद्दल आदर, सन्मान आणि तितकेच प्रेम असणे महत्वाचे आहे, ज्यामुळे मुलंही तुमच्याप्रमाणे एकमेकांचा आदर करायला शिकतील. तसेच त्यांना कुटुंबाबद्दलही आदर, प्रेम राहील. आधी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही कारणास्तव मुलांसमोर अपमानास्पद शब्द किंवा अपमानास्पद भाषा वापरू नये. यामुळे तुमच्या मुलांना भविष्यात समस्या निर्माण होऊ शकतात. अशावेळी मुलांना सुसंस्कृत बनवण्याची जबाबदारी पालकांची आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खोटे बोलू नका

खोटे बोलणे हे नेहमीच चुकीचे असते, हाच संदेश आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रात पालकांना दिला आहे. कोणत्याही कारणास्तव खोटे बोलू नका, असे पालकांनी आपल्या मुलांना प्रेमाने सांगणे आवश्यक आहे. कधीकधी पालक त्यांच्या मुलांशी खोटे बोलतात किंवा स्वत:च्या स्वार्थासाठी मुलांशी खोटं बोलतात. मुलांसमोर पालक खोटं बोलत असतील तर मोठे झाल्यावर मुलांनाही तीच सवय लागण्याचा धोका असतो.