मुंबईत स्वातंत्र्योत्तर काळातल्या ‘मुंबईकर इंग्रजी लेखकां’ची जातकुळी भले निरनिराळी असेल, पण काहीएक प्रकारचा बेधडकपणा हे या साऱ्या मुंबईकर इंग्रजी लेखकांचं समान वैशिष्ट्य (तरी लोकांना मात्र शोभा डेच आठवतात!) निस्सीम इझिकेल, आदिल जस्सावाला आणि रणजित होस्कोटे हे तिघे, तीन पिढ्यांतले कवी; पण त्यांच्या बोलण्यातला थेटपणा, नेमकेपणा किंवा तीक्ष्णपणा विविध प्रकारे नजरेत भरतोच. दिवंगत (मराठीप्रमाणेच इंग्रजीतही लिहिणारे) कवी अरुण कोलटकर यांच्या तर कवितांतूनच हा थेट मुद्द्यावर येण्याचा गुण दिसायचा. शांता गोखले, जेरी पिंटो यांच्या स्वत:बद्दलच्या लिखाणात तो दिसतो, जीत थायिल यांच्या कादंबऱ्यांत दिसतो… हाच गुण, अनिल धारकरांमध्ये ओतप्रोत होता. धारकरांनी अनेक भूमिका मुंबईच्या इंग्रजी साहित्य क्षेत्रात वठवल्या. पण ते संपादक असोत की लेखक किंवा संघटक असोत, धारकरांचा थेटपणा कायम धारदार राहिला. या धारदार थेटपणाचं एक उत्तुंग उदाहरण, इतिहासानं नोंद घ्यावी असं : ‘सण्डे ऑब्झर्व्हर’ या साप्ताहिकात धारकर हे ‘चित्रवाणी समीक्षक’ या नात्यानं एक सदर लिहीत. ‘दूरदर्शन’चं राष्ट्रीय प्रसारण नुकतं सुरू झाल्याचा तो काळ, तेव्हा ही अशी सदरं फार गांभीर्यानं वाचली जात. त्या सदरामध्ये धारकरांनी एका आठवड्यात लिहिलेला एक संपूर्ण लेख फक्त दोनच शब्दांचा वापर करणारा होता. ‘राजीव गांधी’ हे ते दोन शब्द! जप केल्यासारखे अख्ख्या दोन-तीन रकाने भरून जागेत तेच शब्द दिसत होते. ‘हेच हल्ली दिसतं’ हा त्या दोनशब्दी जपामागचा खुलासा. थेटपणा आक्रस्ताळा नसतो, त्यातही शैली असू शकते, याचं हे उदाहरण. पुढे धारकरांच्या चित्रवाणीविषयक लेखांचं पुस्तक प्रकाशित झालं, त्याच्या नावातच ‘पीएम-दर्शन’ हे शब्द होते.
अध्ययनानंतर ग्लासगोमध्ये अध्यापनही करताना अनिल धारकरांना इम्तियाझ भेटल्या. ‘पाकिस्तानी स्कॉटिश’ अशी स्वत:ची ओळख करून देणाऱ्या इम्तियाझ आणि अनिल, दोघे मुंबईत राहू लागले आणि अनिल धारकरांनी ‘एनएफडीसी’मध्ये वरिष्ठपदी संघटनकार्याचा बराच अनुभव मिळवला असला तरी, लेखक म्हणून त्यांची चमक त्यांच्या सदर लेखनातून दिसू लागली. १९८०-९० चा तो काळ इंग्रजी नियतकालिकांच्या बहराचा. त्या क्षेत्रात अनिल धारकर संपादक म्हणून स्थिरावले. ‘सण्डे मिड-डे’चे संपादक म्हणून त्यांनी आज प्रभावी मानले जाणारे अनेक स्तंभलेखक घडवले. ‘वाङ्मयीन’ ठरावं असं ललितलेखन अनिल धारकरांनी कधी केलं नाही (किंवा, अखेरपर्यंत ते कुणाला दाखवलं नाही… त्यांची पाचही पुस्तकं ललितेतरच आहेत) हे खरं; पण संघटकाची भूमिका आणि त्यातून येणारी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी मुंबईच्या साहित्य क्षेत्रावर छाप उमटवली. ‘टाटा लिटलाइव्ह’ म्हणून गेली काही वर्षं ओळखल्या जाणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय साहित्योत्सवाचे गुंफणकार (क्युरेटर) म्हणून त्यांनी जी उत्तम कामगिरी केली, ते त्यांचं ‘साहित्यिक योगदान’च आहे. या साहित्योत्सवात यंदाच विजय प्रशाद नोम चॉम्स्कींची मुलाखत घेणार होते, ती ‘प्रायोजक टाटांवर टीका असल्यामुळेच’ रद्द झाल्याचा आरोप प्रशाद यांनी केला. धारकरांनी आपलं म्हणणं कायम ठेवलं- ‘मुलाखत पुस्तकाबद्दल होती, मग इतका बाहेरचा विषय ओढूनताणून का आणावा?’- यात धारकरांना ‘दमनशहा’ ठरवलं गेलं. हा एक प्रसंग वगळता, मुक्त अभिव्यक्तीला वाव कसा द्यावा याचं विद्यापीठ होते ते.