सुहास सरदेशमुख
करोनाच्या भीतीमुळे देशातील प्रमुख शहरांतील फटका उत्पादनावर ५० टक्के परिणाम झाला असून या वर्षी चीनमधून येणाऱ्या फटाक्यांवरही निर्बंध आहेत. परिणामी अत्यल्प उत्पादन झाल्याचे फटाका उद्योजक सांगत आहेत. उत्पादन अत्यल्प असले तरी साथरोगामुळे ग्राहक फटाके घेण्यासाठी किती येतील, याचीही शंका या क्षेत्रातील उद्योजकांना आहे. प्रदूषण आणि थंडीमुळे करोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता असल्याने फटाका उद्योगाची उलाढाल खूप कमी होईल. देशभरातील ही बाजारपेठ पाच हजार कोटी रुपयांची असते. ती निम्म्यावर येण्याची शक्यता आहे.
देशात बहुतांश फटाके हाताने बनविले जातात. करोना विषाणूच्या भीतीमुळे अनेक उत्पादकांनी कामगारांना कामावर बोलावले नाही. काम सुरू झाले तेव्हा अतिवृष्टीमुळे फटाके वाळणे आणि त्याची पॅकिंग करणे शक्य नव्हते. परिणामी या क्षेत्रातील सारी गणिते बिघडली आहेत. या वर्षी करोनामुळे प्रदूषण रोखण्यासाठी फटाके उडवू नयेत असे आवाहन केले जात आहे. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहक येईल का, अशी शंकाही उत्पादकांच्या मनात आहे. तेरखेडा येथे मराठवाडय़ात सर्वाधिक फटका उत्पादक आहेत. येथील उद्योजक तैय्यब दारुवाला म्हणाले,‘ शिवकाशी येथे सर्वाधिक फटाक्याचे उत्पादन होते. तसेच मराठवाडय़ात तेरखेडा या गावात फटक्यांचे अनेक कारखाने आहेत. लातूर आणि बीड जिल्ह्यातही काही कारखाने आहेत. सुतळी बॉम्ब, फुलबाजी आणि वाजणारे तोटे आदी आम्ही तयार करतो. करोनाकाळात कामगारांना बोलावणे शक्य नव्हते. ज्या भागात हे कारखाने असतात तेथे वीजही घेता येत नाही. प्रत्येक उत्पादन तयार करण्यासाठी स्वतंत्र खोल्या लागतात. अशी पायाभूत सुविधा जमीन अधिक असेल तरच करता येते. या वर्षी संकटाची साखळीच सुरू आहे. त्यामुळे फटाक्याची उलाढाल फार होणार नाही.
शिवाकाशी येथून कच्चा माल खरेदी-विक्री करणाऱ्यांच्या मते तेथील सुमारे ५०० कारखाने बंद आहेत. त्यामुळे उत्पादन घटले आहे.’
* फुलबाजी, सुतळी बॉम्ब आणि आवाज करणारे तोटे यासाठी पोटॅशियम नायट्रेट, सल्फर आणि अॅल्युनियम भुकटी अशी संयुगे लागतात. त्याच्या किमतीमध्ये तशी फारशी वाढ नाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या दरामध्येच फटाके मिळतील. पण या वर्षी उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत घसरलेले आहे.
* बहुतांश फटाके हाताने बनविले जातात. कागदाची चौकोनी पुडी करून त्यात शोभेची दारू भरली जाते. त्याला वरून सुतळी गुंडाळली जाते. त्यानंतर हे फटाके वाळविले जातात. प्रत्येक फटक्यात कोणत्या प्रकारची शोभेची दारू वापरायची यावर तो फटका आवाजाचा असेल की नाही हे ठरविले जाते.
* या वर्षी फटाके उडविणे हे प्रदूषणाला वाढविणारे असल्याने फटाके उडवू नयेत, असे पर्यावरणप्रेमी आवर्जून सांगत आहेत. करोनाकाळात श्वास घेण्यास त्रास होईल अशीच ही कृती असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील मंडळीही सांगत असल्याने फटका व्यवसायाकडे ग्राहक किती येतील, या विषयी उत्पादकांच्या मनातही शंका होती.