मध्यान्य भोजनाची अंमलबजावणी पाणीटंचाईने अवघड

औरंगाबाद : शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे गुणपत्रक हाती दिल्यानंतर महाराष्ट्र दिनापासून गावागावांत विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिले जावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, आटलेल्या विंधन विहिरी, पिण्याच्या पाण्यासाठी गावोगावी ओरड सुरू असताना खिचडी शिजविण्यासाठी आणि नंतर भांडी धुण्यासाठी पाणी आणायचे कोठून, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

उन्हाळय़ाच्या सुटीमध्ये ग्रामीण भागात केवळ खिचडी खाण्यासाठी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असते. माध्यान्ह भोजन करण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात साहित्यही पोहचविले जाते. मात्र, या वर्षी खरी अडचण आहे ती पाण्याची.

खिचडी शिजविण्यासाठी २५ विद्यार्थ्यांमागे एक हजार तर सर्वाधिक ९०० पेक्षा अधिक विद्यार्थी एका शाळेत असतील तर चढत्या क्रमाने मानधन दिले जाते. विशेषत: महिला बचत गटामार्फत हे काम केले जाते. पण आता माध्यान्ह भोजनासाठी पाणीच नाही. ते मिळवायचे कसे, याचे उत्तर कुणाकडेही नाही.

मराठवाडय़ातील जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी या जिल्हय़ात ही समस्य़ा गंभीर असल्याचे शिक्षकांनी सांगितले.  औरंगाबाद जिल्हय़ात  पहिली ते पाचवीच्या २८०७ शाळा आहेत, तर ६ ते ८ वी च्या १५२७ शाळा आहेत. यामध्ये एक लाख ८५ हजार ३९७ विद्यार्थी शिक्षण घेतात.

अन्न शिजवण्यास फारसे पाणी लागत नाही. बहुतांश वेळा पहिले काही दिवस विद्यार्थी खिचडीसाठी म्हणून येतात. नंतर मामाच्या गावाला किंवा लग्नासाठी ते निघून जातात. त्यामुळे जेवढी मुले आहार घेतात तेवढय़ाच्याच नोंदी घेतल्या जातात. गेल्या वर्षी पहिल्या टप्प्यात ४५० मुले आली होती नंतर ती बंद झाली. एवढय़ा मुलांसाठी बादलीभर पाणी मिळू शकतेच.

– सुरजकुमार जैस्वाल,  प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, औरंगाबाद 

अंमलबजावणी कठीण..

तांदूळ, डाळ, सोयाबीन तेलापासून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी १३७ ग्रॅम वजनाची व ५०१ उष्मांक असणारी, तर इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना ६०४ ग्रॅम वजनाची व ५४६ ग्रॅम वजनाची खिचडी देण्यात यावी, असे निर्देश आहेत. पण दुष्काळ इतका उग्र आहे की खिचडी बनवण्यासाठी पाणी मिळवणे अवघड बनले आहे. सध्या खायला अन्न नाही, अशी स्थिती कोठेच नाही. मात्र, माध्यान्ह भोजन सुरूच ठेवावे, असा सरकारचा आग्रह शिक्षकांना तापदायक ठरू लागला आहे. दुष्काळी जिल्हय़ासाठी माध्यान्ह भोजन देणे अनिवार्य केल्याने त्याची अंमलबजावणी कठीण बाब बनली आहे.