24 September 2020

News Flash

रुग्ण वाढल्याने राज्यात प्राणवायूसाठी धावाधाव

गरज भासल्यास उद्योगाचा पुरवठा बंद करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण

(संग्रहित छायाचित्र)

सुहास सरदेशमुख

करोनाचे रुग्ण वाढल्याने राज्यभर प्राणवायूचा तुटवडा भासत आहे. मराठवाडय़ात मागणी आणि पुरवठय़ामध्ये तफावत आहे. राज्यातील २४ उत्पादक कंपन्या आणि ६४ द्रवरूप ऑक्सिजनचे वायुरूप प्राणवायू भरून देणाऱ्या उत्पादकांमार्फत १०३० मेट्रिक टन उत्पादन क्षमता असून त्यापैकी ८६० मेट्रिक टन प्राणवायू आता आरोग्य क्षेत्रालाच लागत आहे. त्यातच कंपन्यांनी त्याचे दरही वाढविले आहेत. या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध संचालक अरुण उन्हाळे, आरोग्य विभागाचे संचालक रामस्वामी आणि प्रादेशिक परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून ‘जेएसडब्ल्यू’ कंपनीने त्यांचा औद्योगिक वापरासाठीचा ७५ मे. टन प्राणवायूचा पुरवठा रुग्णालयांकडे वळविला आहे. आवश्यकता भासल्यास उद्योगाला होणारा पुरवठा पूर्णत: थांबवला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

ऑक्सिजननिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी तीन हजार १०० रुपये घनमीटरपासून ते काही रुग्णालयांना ४८०० रुपयांपर्यंत दर वाढवला आहे. अशा पद्धतीने दर वाढविता येणार नाहीत. या अनुषंगाने केंद्र सरकारलाही पत्र लिहिले असल्याचे टोपे यांनी सांगितले. ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठय़ात  तफावत निर्माण झाल्याने त्याचा फटका शनिवारी औरंगाबादसह मराठवाडय़ातील जिल्ह्य़ांना बसला. औरंगाबाद विभागात ७४ टन ऑक्सिजनची गरज होती. शुक्रवारी ३३, तर शनिवारी २१ टन ऑक्सिजन उपलब्ध झाला. द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा पुणे जिल्ह्य़ातून होतो. आयनॉक्स कंपनीकडे करण्यात आलेली मागणी खूप मोठी आहे. त्यामुळे जेएसडब्ल्यू कंपनीकडून ७५ मे. टन ऑक्सिजनचा उद्योगाला होणारा पुरवठा आता आरोग्य विभागाकडे वळविला आहे. दरम्यान, राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांत द्रवरूप ऑक्सिजनचे टँक बनविण्याची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले.

मागणीपत्राचे काम सुरू

काही जिल्ह्य़ांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर भरून देणारी यंत्रणाही नाही. मराठवाडय़ातील करोना रुग्णांच्या २० टक्के रुग्णांना ऑक्सिजन लागेल असे गृहीत धरून मागणीपत्र तयार करण्याचे काम विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हाती घेतले आहे.

राज्यातील ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. पण गरज भासली तर औद्योगिक वापराचा ऑक्सिजनपुरवठा शून्यावर आणला जाईल. राज्यातील ऑक्सिजन साठा पुरेसा आहे. १७ हजार ७५३ जंबो सिलिंडर, बी-टाइपचे १५ हजार ४७३ सिलिंडर तसेच २३० डुरा सिलिंडर आहेत. १४ ठिकाणी द्रवरूप ऑक्सिजनच्या टाक्या आहेत, तर १६ ठिकाणी काम सुरू आहे. येत्या काळात पुणे येथे नवी कंपनी सुरू करण्याच्या हालचाली सुरू असून ऑक्सिजन पुरवठादारांची यादी सरकारकडे आहे.

– राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यात एक हजार ३० मेट्रिक टन उत्पादन क्षमता असणारे २४ प्राणवायू उत्पादक आहेत. तसेच द्रवरूप ऑक्सिजन सिलिंडरमध्ये भरून देणाऱ्या ६६ कंपन्या आहेत. गेल्या काही दिवसांत ऑक्सिजनची मागणी ८६० मेट्रिक टनापर्यंत गेली आहे. अलीकडेच जेएसडब्ल्यू कंपनीस अतिरिक्त ७५ ते ८० टन उत्पादनाची परवानगी दिल्यानंतर त्यांच्याकडूनही पुरवठा सुरू झाला आहे. टँकरची संख्या वाढविण्याबरोबरच पुरवठा सुरळीत व्हावा असे प्रयत्न सुरू आहेत.

– अरुण उन्हाळे, संचालक औषधे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2020 12:04 am

Web Title: rush for oxygen in the state as the patient grows abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 प्राणवायू उत्पादक कंपन्यांच्या उत्पादनावर देखरेख करण्याची वेळ
2 घोंगडी उद्योगाची वीण उसवली
3 ढकलपासच्या शक्यतेने परीक्षार्थी वाढले
Just Now!
X