छत्रपती संभाजीनगर : परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा पूर्वाश्रमीचा सहकारी बाळू बांगरला माफीचा साक्षीदार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांच्याकडे दूरध्वनीद्वारे बोलताना केली आहे. तर पोलिसांकडून तपासात हयगय होत असेल तर जनतेतूनच उठाव करावा लागेल असे पवार माध्यमांसमोर बोलताना म्हणाले.
आमदार पवार यांनी मंगळवारी सायंकाळी परळीत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी पाेलीस अधीक्षक काॅवत यांच्याशी फोनवरून महादेव मुंडे प्रकरणातील तपासाबाबत चर्चा केली. बाळू बांगर याने वाल्मीक कराडसोबत असताना महादेव मुंडे यांचा खून प्रकरणातील काही तपशील माध्यमांसमोर मांडले आहेत. महादेव मुंडे यांच्या मानेचा तुकडा वाल्मीक कराडसमोर ठेवल्याचे आपण स्वत: पाहिल्याचे बाळू बांगर याने सांगितले असून, काही छायाचित्रेही सार्वजनिक केली आहेत. त्याआधारे पोलिसांनी बाळू बांगरचा जबाब नोंदवून त्याला माफीचा साक्षीदार करावे, असे आमदार रोहित पवार यांनी पोलीस अधीक्षक काॅवत यांच्याशी बोलताना म्हणाले.
बाळू बांगरने वाल्मीक कराडचे मुले श्री कराड, सुशील कराड व भाऊड्या कराड यांचीही नावे घेतली आहेत. त्यांनी मिळून महादेव मुंडे यांचा निर्घृणपणे खून केला असून, ही सर्व नावे पोलिसांच्या प्राथमिक अहवालात (एफआयआर) घ्यायला हवीत, विशेष तपास पथकात या प्रकरणात ज्यांच्याकडे माहिती आहे ते पोलीस निरीक्षक संतोष साबळे, वरिष्ठ अधिकारी कुमावत यांनाही समाविष्ट करावे, अशीही कुटुंबीयांची मागणी असल्याचे सांगितले. पोलीस अधीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोपही आमदार पवार यांनी केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रद्वयींनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना भेटीची वेळ द्यावी, अशी विनंती करणार आहोत. खासदार सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाठपुरावा करत असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, राजेसाहेब देशमुख, राजेंद्र म्हस्के, राजेभाऊ फड आदी नेते उपस्थित होते.
वाल्मीक कराडमुळे बीड, परळीचे नाव बदनाम
आमदार धनंजय मुंडे यांनी मागील आठवड्यात खासदार सुनील तटकरे यांच्या दौऱ्यात शेरोशायरी करत वैर माझ्याशी होते तर माझ्या मातीची बदनामी का, असा एक प्रश्न उपस्थित केला होता. त्याचा आधार घेत पण आमदार धनंजय मुंडेंचा नामोल्लेख टाळत आमदार रोहित पवार म्हणाले, काही लोक परळी, बीडचे नाव नाहक बदनाम केल्याचे सांगत आहेत. मात्र, परळी, बीडचे नाव वाल्मीक कराडमुळे बदनाम झाले आहे, असे सांगताना आमदार पवार यांनी वाल्मीक कराडने एक हजार कोटींची संपत्ती कशी मिळवली आणि त्यात कोण-कोण भागीदार आहेत, याच्या चौकशीसाठी स्वतंत्र तपास पथक स्थापन करावे, अशी मागणी केली.