छत्रपती संभाजीनगर : मदतीच्या पॅकेजचा शासन निर्णय गुरुवारी सायंकाळपर्यंत प्रसिद्ध होण्यापूर्वी भाजप नेत्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात पॅकेजच्या जाहिरातीचे फलक लावले आहेत. शुक्रवारी होणाऱ्या भाजप बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री अतुल सावे यांनी या कामी आघाडी घेतली.
तर दुसरीकडे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आवाज उंचावण्यासाठी हंबरडा मोर्चाच्या तयारीला वेग दिला आहे. अंबादास दानवे यांनी शहरात मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी रिक्षातून आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.
मराठवाड्यातील १३ लाख शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले. या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. राष्ट्रीय आपत्ती निवारणाच्या निकषापेक्षा अधिक रक्कम देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच केली. या पॅकेजच्या अंमलबजावणीचे शासन आदेश अद्याप निघालेले नाहीत.
मात्र, भाजपने त्याची जाहिरात करायला सुरुवात केली आहे. ‘ही मंडळी असेच वागणार’ अशी टीका शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तातडीची मदत म्हणून जाहीर करण्यात आलेल्या २१०० कोटी रुपयांपैकी १४१८ कोटी रुपये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी आले असून, त्यातील ३१६ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. पॅकेज जाहीर करण्यापूर्वीच्या निकषानुसार ही मदत वाटप होत असली तरी त्यात नव्याने जाहीर केलेल्या रकमेची तूटही दिली जाईल, असा दावा केला जात आहे.
दरम्यान, ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मोर्चातून शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, या मागणीसाठी तसेच हेक्टरी ५० हजारांच्या मदतीची मागणी करण्यासाठी उद्धव ठाकरे मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे शिवसेना नेतेही कामाला लागले आहेत. अंबादास दानवे म्हणाले, ‘प्रत्येक जिल्ह्यात मोर्चांच्या तयारीसाठी बैठका घेतल्या आहेत. गावनिहाय बैठकांचे ठरावही आहेत. त्याच बरोबर महसूल मंडलनिहाय तयारी करण्यात आली आहे. क्रांती चौकातून मोर्चा निघेल आणि गुलमंडीमध्ये त्याचा समारोप होईल.’
भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे म्हणाले, ‘लावलेले फलक ही काही जाहिरात नाही. पण लोकांना कळायला हवे आणि विरोधक नंतर फसवे काही सांगत असतात, त्यामुळे असे फलक लावले आहेत.’
दरम्यान, मराठवाड्यात पंचनामे करण्यास प्रशासनाने वेग दिला आहे. विशेषत: पॅकेजच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती शासनापर्यंत पोहचवली जात आहे. येत्या काही दिवसांत रक्कम खात्यावर जमा करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले जात असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे.