बिपीन देशपांडे लोकसत्ता

औरंगाबाद : धम्मपदातील त्रिपिटक ग्रंथांसह पाली भाषेतील गौतम बुद्धांनी जगासमोर मांडलेल्या तत्त्वज्ञानाचे सुलेखन करताना त्यातील अक्षरांचा अर्थबोध, भावस्पर्श होऊन दृश्यमान रूपात ध्यानस्थ, चिवरसह तथागत, नालगिरी हत्तीच्या शरणागततेसारख्या प्रसंगांना कुंचल्यातून कागदावर उभे करण्याचे काम येथील कलाकाराकडून सुरू आहे.

मुंबईत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात प्रदर्शन सहायक म्हणून कार्यरत असलेले सुशीम नामदेव कांबळे, असे त्या कलाकाराचे नाव आहे. त्यांनी तथागतांच्या तत्त्वज्ञानाला सुलेखनातून मांडण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. सुशीम हे औरंगाबादचे. येथील शासकीय कला महाविद्यालयात त्यांचे बीएफए (उपयोजित कला) चे तर पुण्यात एमएफएचे शिक्षण झालेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गतवर्षी टाळेबंदीतील काळात सुशीम कांबळे यांनी वेळेचा सदुपयोग करत पाली भाषेतील बुद्ध धम्मपदातील विनय पिटक, सूक्त पिटक, अभिधम्म पिटक ग्रंथांसह गृहस्थ जीवनासाठीच्या दहा पारमिता, २४ वग्ग असे तत्त्वज्ञान सुलेखनातून त्यातला भावार्थ समजायला सोपा जाईल, अशा अक्षरांमधून मांडण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. अत्त दीप भव: मधून प्रकाशमान बुद्धांचे चित्र, नालगिरि गजवरं अतिमत्तभूतं सारख्या गाथेतून तथागतांपुढे शरणागत झालेला नालगिरी हत्ती, अशा प्रसंगांना कुंचल्यातून दृश्यमान रूपात उतरवले आहे. करोना काळातील टाळेबंदीतील वेळेचा सदुपयोग करण्यासाठी तथागतांचे पाली भाषेतील ग्रंथांमधील गाथांचे सुलेखन करण्याचा विचार सुचला. उपयोजित कलेचे शिक्षण घेतलेले असल्यामुळे हातात कला होतीच. सोबतीला पाली भाषेचा अभ्यास सुरू केला. प्रत्येक गाथेतील भावार्थ ओळखून त्यातून तथागतांचे जीवन दृश्यमान रूपात उभे करण्याचा प्रयत्न आहे. काम मोठे आहे. एक आयुष्यही पुरणार नाही. पण जेवढे केले, करत आहे, त्याचे जगभरातून स्वागत होत आहे. आता सुलेखनाचे डिजिटायझेशनही होणार आहे.  – सुशीम कांबळे