छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात तीन आठवड्यांपूर्वी पडलेल्या दरोड्यात साडेपाच किलो सोने व ३२ किलो चांदी पळवण्यात आली होती. यातील २० तोळेच सोने आतापर्यंत हस्तगत करण्यात आले असून, उर्वरीत सोन्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे एक पथक बुधवारी नांदेडमध्ये दाखल झाले होते.

यापूर्वी या दरोड्याच्या प्रकरणातील काही आरोपी हे अंबाजोगाईचेही आढळून आले आहेत. आता नांदेडमध्येही धागेदोरे मिळत असल्याच्या माहितीनंतर पोलीस तेथे पोहोचले आहेत. नांदेडमधील सराफा बाजारातील एका मोठ्या सराफा व्यावसायिकाकडे चौकशीसाठी पोलीस तासभर तळ ठोकून होते, अशी माहिती मिळाली. दरोड्याच्या घटनेनंतर आरोपी तिरुपती येथे गेले होते. तेथून परतताना ते नांदेडमध्ये थांबले होते. नांदेडमधील एका सराफा व्यावसायिकाकडे त्यांनी सोने ठेवल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळल्यानंतर गुन्हे शाखेने नांदेड गाठले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लड्डा यांच्या घरातील दरोडाप्रकरणी अमोल खोतकर याचा मागील आठवड्यात पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला असून, त्याच्या सोबतच्या उर्वरीत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय संतोष लड्डा यांचे मित्र म्हणून ओळख असलेल्या तीन व्यक्तींनाही अटक केलेली आहे. काही आरोपी हे अंबाजोगाईचे असून, आता नांदेडशीही धागेदोरे मिळत असल्याची माहिती आहे.