छत्रपती संभाजीनगर : अडथळ्यांची शर्यत आणि मध्यंतरी चमत्कारिक सुरस कथा ऐकत का असेना छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेचा एक टप्पा आता पूर्ण होतो आहे. डिसेंबरपर्यंत ही योजना पूर्णत्वास आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी आवश्यक असणारा निधी दिला जाईल. महापालिकेचा ८२२ कोटी रुपयांचा निधीही हुडकोमधून दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महापालिका निवडणुकीपूर्वी पाणी योजनेला वेग दिला जात असल्याचा संदेश त्यांनी शनिवारच्या कार्यक्रमातून दिला.

या योजनेचा समावेश युद्धपातळीवरील कामांमध्ये करण्यात आल्याने त्याचा आढावा राज्यस्तरावर घेतला जात आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत शहरातील ३० पाण्याच्या टाक्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शहराच्या ५६ दशलक्ष लिटर पुनरुज्जीवन योजनेच्या २६ दशलक्ष लीटर जलशुद्धीकरण केंद्र व यांत्रिकीकरणाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

२०१९ मध्ये निधी दिल्यानंतर पाणीपुरवठा योजनेची स्थिती केवळ १८ टक्के एवढी होती. आता ती ८२ टक्क्यापर्यंत गेली आहे. या योजनेवर आतापर्यंत १८१९ कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती या वेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी मनीषा पलांडे यांनी दिली. या कार्यक्रमास पालकमंत्री संजय शिरसाट, अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, कल्याण काळे, संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, नारायण कुचे, अनुराधा चव्हाण, सतीश चव्हाण, संजय केनेकर यांची उपस्थिती होती.

ऑक्टोबरपर्यंत २२ टाक्यांचे काम पूर्ण होईल. सध्या २६ दशलक्ष लिटर पाणी उपसा करणाऱ्या पंपाची कामे प्रगतिपथावर असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. डिसेंबरअखेरपर्यंत या योजनेचे काम पूर्ण होईल असे आश्वासन देऊ का, असे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना विचारत पाणीपुरवठा योजना महत्त्वाकांक्षी योजनेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

अतिक्रमित चेहऱ्याने कोणत्याही शहराचा विकास होत नसतो. शहरातील सर्व नेत्यांनी आणि प्रशासनाने मिळून अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही जणांना मावेजा देणे आवश्यक असल्याचे लक्षात आले आहे. तेवढी रक्कम राज्य सरकारकडून महापालिकेला दिली. पण अतिक्रमण काढण्याच्या निर्णयास राज्य सरकारचे पाठबळ असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.