सुहास सरदेशमुख

छत्रपती संभाजीनगर : ‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या मयूर पवार या बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस त्याच्या मूळ वळण नावाच्या गावी परतावे लागले. दुष्काळामुळे त्याच्या वडिलांना गेल्या तीन महिन्यांपासून त्याच्या खासगी शिकवणीचे शुल्क भरता आले नाही. साडेतीन एकराचे मालक असणारे ज्ञानेश्वर बारकू पवार हतबल झाले आहेत. ‘‘कर्जबाजारी होतोच, उधार- उसनवारीवर कसेबसे दिवस ढकलत होतो, आता तेही शक्य होणार नाही. पीक चांगले असते तर पैशांचे चक्र फिरते राहिले असते. आता सारे काही ठप्प आहे’’, असे पवार म्हणाले. दुष्काळझळा बसू लागल्या असून, त्याचा पहिला फटका शेतकऱ्यांच्या शहरात शिकणाऱ्या मुलांना बसू लागला आहे.

एका बाजूला मराठवाडा मुक्तिसंग्राम समारंभाचा धडाका उडवून देण्याचे सत्ताधाऱ्यांचे नियोजन सुरू असताना मराठवाडय़ात नांदेड आणि हिंगोली हे दोन जिल्हे वगळता सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची हतबलता वाढू लागली आहे. खरे तर दुष्काळझळा बसण्यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या बळीराजा सर्वेक्षणात शेतीमुळे अडचणीत येऊन जगण्या-मरण्याच्या उंबरठय़ावर असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख पाच हजार ७५४ एवढी होती. त्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा >>>मराठवाडय़ात ऑगस्ट महिन्यात ९९ आत्महत्या; दुष्काळ, नापिकीचे परिणाम

ज्ञानेश्वर पवार म्हणाले, ‘‘आता विहिरीला पाणी राहिले नाही. पिके सुकून गेली हे सर्वाना दिसते आहे. पण, खरा प्रश्न मुलांच्या शिक्षणाचा आहे. महाविद्यालयाचे शुल्क कमी करून उपयोगाचे नाही. कारण मुलांच्या खासगी शिकवणीवर अधिक पैसे खर्च होत आहेत. शिवाय वसतिगृह, कपडालत्ता, घरचा किराणा असे अनेक खर्च अंगावर असतात’’. वळण गावच्या रस्त्यावरच गारज येथे राहणाऱ्या वालूबाई गोपीचंद कांदे यांनाही मुलींच्या शिक्षणाची चिंता आहे. त्या म्हणाल्या, ‘‘मुलगी देवगिरी महाविद्यालयात अभियांत्रिकीला आहे. तिच्या शिक्षणासाठी सव्वालाख रुपये लागतात. ती दोन महिन्यांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. दीड एकर शेती आणि अंगणवाडीसेविकेचे काम करत तिला वाढवली आहे. या वर्षी शेतीतून मिळणारा आधार संपल्यात जमा आहे. शेतीमध्ये पेरणीसाठी घातलेले आठ-दहा हजार रुपये वाया गेले आहेत. पुढे सगळे खर्च कमी करून मुलीला रक्कम पाठविताना कमालीची अडचण होत आहे.’’

हेही वाचा >>>‘चंद्रयान’, ‘आदित्य’ मोहिमांबरोबरच ‘लिगो इंडिया’चे वेध; गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासाचा प्रकल्प २०३० पर्यंत पूर्ण करण्याची तयारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रान हिरवे, पण दुष्काळमुळे ओसाड

कापसाची वाढ खुंटली आहे. मका वाळू लागला आहे. विहिरी कोरडय़ा पडल्या आहेत. नद्या पूर्णत: कोरडय़ा पडल्या आहेत. आता पिके येणारच नाहीत, असे लक्षात आल्यानंतर शेतकरीही शेतात फिरकत नाहीत. मैलोन् मैल शेतात मजूरही दिसत नाहीत. हाताला काम नसल्याने दुष्काळी पट्टय़ात सारे काही ठप्प झाले आहे. रानातील हिरवळ आता करपू लागली आहे. पिकांनी माना टाकल्याचे चित्र दिसत आहे.