छत्रपती संभाजीनगर : मागील तीन दिवसांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये दहा विवाहितांकडून माहेराहून रक्कम आणण्यासह मानसिक, शारीरिक छळ केल्याच्या सासरच्यांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील दोन तक्रारींमध्ये प्रत्येकी ५० लाखांची मागणी विवाहितांकडे करण्यात आली असून, यामधील एक महिला ही व्यवसायाने वकील आहे.
क्रांती चौक, मुकुंदवाडी, एमआयडीसी वाळूज, हर्सूल, जिन्सी, सिटी चौक, फुलंब्री, वीरगाव, पिशोर या पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित विवाहितांकडून पतीसह सासरच्यांविरुद्ध छळाची तक्रार करण्यात आली आहे. यातील दाेन गुन्ह्यांमध्ये विवाहितांना थेट ५० लाखांची मागणी करण्यात आली आहे. त्यातही एक विवाहिता व्यवसायाने वकील आहे. यातील अन्य गुन्ह्यांच्या तक्रारीमध्ये एक लाख ते पाच लाखांची रक्क्म माहेराहून आणण्यासाठी छळ केल्याचे नमूद आहे.
फुलंब्रीतील चौकात एका महिलेला डांबून चटके दिले. तिच्या अंगावर सतरा जखमा आढळून आल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले असून, याप्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात महिलेच्या पतीसह दोन नणंदाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. तक्रारदार महिलेचे पतीसोबत आठ वर्षांपूर्वी विवाह झालेला असून, त्यांना पाच वर्षांचा एक मुलगाही आहे. हडको काॅर्नर येथील माहेर असलेल्या या महिलेच्या वडिलांनी अमानूष छळ समोर आल्यानंतर त्यांनी सोबत घेऊन तक्रार दाखल करण्यासाठी फुलंब्री ठाणे गाठले.