छत्रपती संभाजीनगर : तुळजापूर आराखड्यातील तुळजाभवानीचे शिल्प दशभुजाधारिणीम् करून तीच ‘भारतमाता’ आहे, असा उल्लेख शासकीय पत्रव्यवहारात आल्यानंतर धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत मंगळवारी बोलावलेल्या बैठकीस तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दांडी मारली. दरम्यान, तुळजाभवानी मूर्तीचे रूप नव्या शिल्पातही आहे तसे कायम ठेवावे, तसेच विकास आरखड्यात पुजाऱ्यांचा सहभाग घ्यावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. आरखड्याच्या अंमलबजावणीच्या जिल्हास्तरीय बैठकीस राणाजगजीतसिंह पाटील यांची गैरहजेरी महायुतीतील मतभेदाचा दुसरा अंक असल्याचे मानले जात आहे.
अलीकडेच प्रताप सरनाईक यांनी राणाजगजीतसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली होती. जिल्हा आराखड्यातील निधीस मंजुरी देताना आक्षेप न घेणाऱ्या आमदार पाटील यांनी अजित पवार यांच्याकडून निधीस स्थगिती मिळविली. त्यामुळे विकास प्रक्रियेवर परिणाम होत असल्याची तक्रार प्रताप सरनाईक यांनी केली होती.
दरम्यान तुळजापूरच्या १८६५ कोटी रुपयांच्या आराखड्यातील कामे कशी व्हावीत, त्याचा वेग किती असावा, कोणती कामे कशी करावीत, याचा तपशील जाणून घेण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी मुंबईत बैठक बोलावली होती. या बैठकीत आराखडा तयार करणाऱ्या प्रकल्प व्यवस्थापन समितीच्या कंत्राटदाराने कोणती व कशी कामे केली जातील, याचे सादरीकरण जिल्हास्तरीय समितीसमोर केले. या वेळी तुळजाभवानी माता म्हणजे भारतमाता अशा पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या शब्दांवर आक्षेप घेण्यात आला. ती जगदंबा असल्याने नवी प्रतिमा करू नये, असे सांगण्यात आले. तसेच ज्या वेगाने विकास आरखड्यातील कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत आणि त्याचा सध्याचा वेग लक्षात घेता कामे रेंगाळू नयेत, याची काळजी घेण्याचे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
या बैठकीस शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचीही उपस्थिती होती. ते म्हणाले, ‘सध्या हा कारभार प्रकल्प व्यवस्थापन समिती आणि कंत्राटदार यांच्यामार्फत सुरू आहे. यामध्ये पुजाऱ्यांचा सहभाग वाढायला हवा, असे मत पालकमंत्र्यांकडे मांडले. त्यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. तुळजाभवानी आणि भारतमाता या दोन स्वतंत्र प्रतिमा आहेत. त्यामुळे त्यावर काही जणांचे आक्षेप आहेत. त्यावरही या बैठकीत चर्चा झाली.’
येत्या साडेतीन वर्षांत तुळजापूर विकासाची सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
अष्टभुजा प्रतिमेला भक्तगणांचा विरोध
श्रीक्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यांतर्गत १०८ फुटांचे शिल्प उभारले जाणार आहे. या शिल्पामध्ये तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. परंतु हे दाखवत असताना भवानी मातेची प्रतिमा ही अष्टभुजाकृती दाखवण्यात आलेली आहे. याला अनेक भक्तगण व पुजारी मंडळांनी आक्षेप नोंदवलेला आहे. त्यांच्या भावनांचा आदर राखत संकेतस्थळावरील विकास आराखड्याच्या संकल्प चित्रातून ही प्रतिमा काढून टाकण्यात यावी, तसेच शिल्प तयार करताना पुरातत्त्व विभाग, इतिहास तज्ज्ञ व आनुषंगिक घटकांशी चर्चा करून देवीची प्रतिमा कशी असावी याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री सरनाईक यांनी दिले. याबरोबरच यापुढे विकास आराखड्यासंदर्भात प्रसिद्धीसाठी द्यावयाची पत्रे, परिपत्रके ही परस्पर न देता अध्यक्षांच्या अनुमतीनेच देण्यात यावीत, असे निर्देश त्यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.