छत्रपती संभाजीनगर : ‘मुंबई महापालिका हातातून गेली की, हंबरडा फोडा. जेव्हा हातात होते तेव्हा काही केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याचा नैतिक अधिकारच नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली. शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा अधिकारच नाही. एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यास एक लाख रुपयांची मदत करतो असे सांगून ती तुम्ही केली नाही. नुसतेच रिकाम्या हाताने येता. त्यामुळे हंबरडा फोडायचा असेल, तर मुंबई हातून गेली की मग फोडा! जेव्हा कोणी बरोबर राहिले नाही तेव्हाही तुम्ही तो फोडला होता, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढविला.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर येथे शनिवारी हंबरडा मोर्चा आयोजित करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने ‘हंबरडा’ शब्दावरून टीका केली.
मुंबईत ब्रिटनच्या पंतप्रधानांचे पोस्टर लावल्यावर टीका केली जात असल्याची दखल घेत ते म्हणाले, ‘पाहुण्यांचे स्वागत करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तिथे अनेक जण येतात. मुंबईत येणाऱ्यांचे स्वागत आम्ही करतो आहोत. पण एकनाथ शिंदे त्यांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी दिसतो. मुंबईला चालना देण्याचे काम तेव्हा केले. आपल्या ताब्यात असताना मुंबईतील खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा अशी अवस्था होती. पण मुंबईतील सर्व रस्ते सिमेंटचे करण्याचा निर्णय घेतला. आम्ही काम करतो. त्यामुळे आता हंबरडा फोडायचा असेल, तर मुंबई हातातून गेल्यावर फोडा, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
तत्पूर्वी खासदार संदीपान भुमरे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीची टर उडवली. ते म्हणाले, ‘अडीच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री आम्हाला भेटतील. मग त्यांना काम सांगू, असे आम्हाला वाटायचे. पण शेवटी कळायचे, मुख्यमंत्री आज ऑनलाइनच हजेरी लावतील. आम्ही अडीच वर्षे मुख्यमंत्र्यांना फक्त ऑनलाइन आणि ऑफलाइनच पाहत होतो. मुख्यमंत्री असताना आम्हाला कोणी ‘वर्षा’ बंगल्यावर येऊ दिले नाही. त्यामुळे तो बंगला ते मुख्यमंत्री असताना बघताही आला नाही. तुलनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर सर्वसामान्य शिवसैनिकही त्यांना भेटून येत होता.’
या वेळी समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट, आमदार रमेश बोरनारे यांचेही भाषण झाले.
भाजपविरोधातील तक्रार, पण हळूच सुरात !
विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी आमच्या विरोधात काम केले ते आता भाजपमध्ये गेले आहेत. ते तिकडून पदे मिळवतील. तेव्हा त्या वेळी आपण लक्ष घालावे अशी पदे देऊ नयेत अशी विनंती करावी असे या वेळी आमदार रमेश बोरनारे म्हणाले. डॉ. दिनेश परदेशी हे रमेश बोरनारे यांच्या विरोधात उमेदवार होते. ते आता वैजापूर नगरपालिकेत पुन्हा नगराध्यक्ष होण्याची तयारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार बोरनारे यांनी तक्रार केली. त्यास पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही उचलून धरले. काही जण महायुतीमध्ये तेढ निर्माण व्हावी असे प्रयत्न करत आहेत. त्यांना समज द्यायला हवी, अशी तक्रार करण्यात आली. पण महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल. कोणी तेढ निर्माण होईल, असे वागू नका. आम्ही कार्यकर्त्यांचा सन्मान होईल, याची काळजी घेऊ, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.