छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर विमानतळावर शनिवारी सकाळी बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आल्याने खळबळ उडाली. २९ जून रोजी सकाळी सव्वादहा वाजता ‘आत बॉम्ब आहे’ अशा आशयाचा मजकूर विमानतळ संचालकांकडे आला. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढवली असून, हा मजकूर कोणी पाठवला याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील विमानतळ परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी तसेच विमानांमध्ये बॉम्ब असलेल्या पिशव्या ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.“तत्काळ इमारत रिकामी करा, अन्यथा आतमध्ये असलेल्यांचा मृत्यू होईल, त्यांचे हातपाय तुटतील किंवा डोकीही उडतील,” असे नमूद करण्यात आले होते. ‘रोडकिल’ आणि ‘क्यो’ या नावांनी स्वतःला दहशतवादी घोषित करत, हा संदेश देणाऱ्याने हा मजकूर प्रसारमाध्यमांना द्या, असेही सांगितले होते. हवाई सुरक्षा दलास ही माहिती देण्यात आली, या अनुषंगाने एक बैठकही घेण्यात आली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारतीय विमानतळ प्राधिकरण, स्थानिक पोलीस, बॉम्बशोधक व निकामी पथक आणि विविध विमान कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. या मजकुरानंतर विमानतळावर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. प्रवाशांची तसेच बॅगांची तपासणी, बॉम्बशोधक यंत्रणाना सतर्क करण्यात आले. या घटनेचा विमान सेवांवर परिणाम झालेला नाही, असे विमानतळ प्राधिकरणातील सूत्रांनी सांगितले.