छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथील एका शेतकऱ्याने बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्यांविरुद्ध सात वर्षे न्यायालयीन लढाई लढली. याप्रकरणी अखेर औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. जोशी यांनी चार कंपन्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंड सुनावला आहे. कायगाव येथील शेतकरी याकूब अय्युब शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल केली होती.

याचिकेनुसार शेतकरी याकूब शेख यांनी आपल्या शेतीतील नऊ एकरमध्ये २०१८ मध्ये लावलेले कपाशीचे बियाणे बोगस निघाले. परिणामी पीक हातून गेले होते. या संदर्भाने पुण्याच्या कृषी आयुक्तांकडे दाद मागितली. त्यांनी प्रथम दखल घेतली नाही. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशावरून सुनावणी घेतली असता शेख यांना अत्यल्प म्हणजे केवळ २० हजार रुपयेच भरपाई देण्याचे आदेश दिले होते. याकूब यांनी कंपनीला धडा शिकविण्यासाठी न्यायालयीन लढा सात वर्षे सुरू ठेवला होता. अखेर खंडपीठाने शेतकऱ्याच्या याचिकेची दखल घेत आदेश पारीत केले.

याकूब शेख यांनी २०१८ मध्ये आपल्या शेतात नऊ एकरात राशी, आदित्य, तिअरा व नामधारी सिडस कंपन्यांची बियाणे लावली होती. संबंधित ७५० रुपयांची ४७५ ग्रॅम बियाणांची नऊ पाकिटे खरेदी केली होती. संबंधित बियाणांवर रोग पडणार नाही, रोगनाशक शक्ती अधिक असल्याचा दावा करण्यात आला होता. आमच्या वाणावर लाल्या पडत नसल्याचे पाकिटांवर लिहिलेले होते. असे असताना पिकावर रोग पडला. पीक हातचे गेले. हाती काहीच आले नाही. या फसवणुकीने याकूब यांनी कंपनीविरोधात राज्याच्या आयुक्तांकडे अर्ज केला. परंतु त्यांनी दुर्लक्ष केले, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

याप्रकरणी याचिका दाखल करून आव्हान दिल्यानंतर खंडपीठाने चारही कंपन्यांना पन्नास हजार रुपये प्रत्येकी दंड केला. दंडाची रक्कम याचिकाकर्त्या शेतकऱ्यास देण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. किशोर खाडे यांनी काम पाहिले.